

Maharashtra Assembly: एखादी सेवा देणारी, सर्टिफिकेट देणारी व्यक्ती उद्योजक कशी होऊ शकते? संगणक चालकांना उद्योजक ठरवून सरकार, आम्ही वीस हजार उद्योजक घडवले असे सांगून स्वतःची पाठ थोपटवून घेणार असेल तर ही दिशाभूल आहे. अध्यक्ष महाराज तुम्ही वकील आहात, मला उद्योजकाची व्याख्या समजावून सांगा, या शब्दात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार राहूल पाटील यांनी विधीमंडळ अधिवेशनात सरकारला धारेवर धरले.
संगणक चालकांना उद्योजक ठरवून वेठबिगारासारखे फक्त दहा हजार रुपये मानधन दिले जाते. बारा- बारा तास त्यांना राबवून घेतले जाते त्यांना किमान वेतन कायद्यानूसार १७ हजार रुपये मानधन सरकार देणार का? आणि उद्योजकाची व्याख्या मला मंत्र्यांनी समजावून सांगावी, असेही राहुल पाटील म्हणाले. संगणक ऑपरेटरांना 'उद्योजक' म्हणत शासन स्वतःची पाठ थोपटत असेल, पण वास्तव पूर्णपणे वेगळं आहे. संगणक ऑपरेटरांना 'उद्योजक' संबोधत शासनाने २० हजार उद्योजक घडविल्याचा दावा केला. हा दिशाभूल करणारा दावा असल्याचे पाटील यांनी सभागृहात सांगीतले.
मंत्री महोदय म्हणतात, ही व्यावसायिक सेवा आहे. मग हा नेमका कोणता व्यवसाय आहे? ग्रामपंचायतीत नागरिकांना जन्म, मृत्यू, उत्पन्न, रहिवासी अशी विविध प्रमाणपत्रे काढून देणे ही सेवा झाली, पण त्याला व्यापार कसा म्हणायचा? आणि ही सेवा देणाऱ्या तरुणांना उद्योजक कसं म्हणायचं? केवळ कंत्राटी पद्धतीने काम करून घेऊन त्यांच्यावर 'उद्योजक' हा शिक्का मारणे म्हणजे त्यांच्या वास्तवापासून पळ काढण्याचा प्रयत्न आहे. संगणक ऑपरेटरांना उद्योजक म्हणणे ही लाजिरवाणी बाब असून, अशा शब्दांचा वापर करून त्यांची दिशाभूल करू नका.
मोठ्या कंपन्यांचे प्रशिक्षण किंवा प्रमाणपत्र मिळाले म्हणून कोणी उद्योजक होत नाही. महिन्याला केवळ १० हजार रुपयांवर, दिवसाचे १२ -१२ तास काम करणाऱ्या तरुणांना उद्योजक म्हणणे म्हणजे त्यांच्या संघर्षाची थट्टा करण्यासारखे आहे. जर हे खरोखरच कामगार नाहीत, तर मग त्यांच्याकडून एवढे तास काम का करून घेतले जाते? आणि जर ते कामगार आहेत, तर त्यांना Minimum Wages Act अंतर्गत संरक्षण का दिले जात नाही? असा सवालही राहुल पाटील यांनी केला.
संगणक ऑपरेटरांना किमान १७ हजार रुपये वेतन देण्याची ठाम मागणीही त्यांनी केली. तरुणांच्या घामाची किंमत घोषणांनी नाही, तर न्याय्य वेतनानेच ठरते. सरकारने दिखाऊ दावे सोडून संगणक ऑपरेटरांना न्याय द्यावा, असेही ते म्हणाले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.