

Raigad Fort : ऐतिहासिक किल्ले रायगडवर 6 जून रोजी शिवराज्याभिषेक दिन दिमाखात साजरा झाला. पण या सोहळ्यादरम्यान किल्ल्यावर आलेल्या लाखो शिवप्रेमींची प्रचंड गैरसोय झाल्याचे दिसून आले. सोयी-सुविधा पुरवण्यासाठी कोट्यवधी रुपये खर्च करूनही शौचालयाची नीट सोय नव्हती. जागोजागी ठेवण्यात आलेल्या पिण्याच्या पाण्याच्या टाक्या रिकाम्याच असल्याने शिभक्तांचा घसाही कोरडाच राहिला. या गैरसोयीनंतर गत 9 वर्षांपासून गडाच्या संवर्धन आणि विकासासाठी काम करणाऱ्या रायगड विकास प्राधिकरण आणि जिल्हा प्रशासनावर जोरदार टीका होत आहे.
सध्या सोशल मीडियावर रायगडवर झालेल्या शिवभक्तांच्या गैरसोयीवर बरीच टीका होत आहे. शौचालयाशी संबंधित काही वर्षांमधील विविध निविदांचे फोटो व्हायरल होत आहेत. यानुसार किल्ल्यावर तात्पुरत्या स्वरुपात शौचालय उभारण्यासाठी जवळपास 10 कोटी रुपयांचा खर्च झाल्याचा दावा करण्यात येत आहे. यानंतरही शिवभक्तांना शौचालयाची सुविधा मिळाली नसल्याची टीका होत आहे. शिवाय गडावर रस्त्याकडेला ठेवलेल्या मोजक्या टाक्या सोडल्या तर इतर टाक्या कोरड्याच होत्या.
यंदा पावसाने ओढ दिल्याने गडावर पाण्याची भीषण टंचाई आहे. 6 जूनपर्यंत दुरुस्तीचा गाजावाजा केलेल्या हत्ती तलावात एक थेंबही पाणी नव्हते. गंगासागरने तळ गाठल्याने अन्य तलावातील पाणी यामध्ये आणून सोडावे लागले. यामुळे ६ जूनच्या सोहळ्यासाठी लाखोंच्या निविदा काढून सीलबंद पिण्याच्या पाण्याच्या बाटल्या मागवण्यात आल्या. शिवाय टँकरद्वारे पाणी मागवण्यात आले. मात्र ५ जूनच्या संध्याकाळपर्यंत पाण्याच्या बाटल्या आणि टँकर पोहोचलेच नाहीत. यामुळे पिण्याच्या पाण्याच्या बाटल्या शिवभक्तांना विकतच घ्याव्या लागल्या.
यापूर्वीही झाला होता वाद :
शिवराज्याभिषेक दिनाच्या आठवडाभर आधी सोशल मीडियावर अॅड. अर्चना मारणे यांनी एक व्हिडीओ शेअर केला होता. यात त्यांनी गडावरील स्वच्छतागृहांच्या दयनीय अवस्थेबद्दल संताप व्यक्त केला होता. विशेषतः महिलांसाठी आवश्यक असलेल्या स्वच्छतागृहांची अवस्था अत्यंत खराब असल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले होते. “पर्यटकांकडून शुल्क आकारलं जातं, मग सुविधा कुठे आहेत?” असा थेट सवाल करत त्यांनी पुरातत्त्व विभागाच्या कर्मचाऱ्यांना जाब विचारला होता.
त्याचवेळी रायगड बचाव समितीनेही याबाबत पत्रकार परिषद घेऊन गंभीर आरोप केले होते. रायगडाच्या संवर्धन आणि विकासाच्या नावाखाली मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार होत आहे. गेल्या 9 वर्षात सुमारे 603 कोटी रुपयांचा निधी मंजूर असूनही आजही गडावर समाधानकारक काम दिसत नसून अपेक्षित कामे पूर्ण झालेली नाहीत. शौचालय, स्वच्छता, पिण्याच्या पाण्याची सुविधा, गडावरील पायऱ्यांचे बांधकाम यासंबंधित कामांवर टीका करत संभाजीराजे छत्रपती यांच्या नेतृत्वातील रायगड विकास प्राधिकरण बरखास्त करावे आणि SIT चौकशी करावी अशी मागणी केली होती.
त्यानंतर रायगड विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष संभाजीराजे छत्रपती यांनी याबाबत स्पष्टीकरण दिले होते. या सगळ्या प्रकारासाठी गडावर तिकीट आकारणी करणारा पुरातत्व विभाग व रायगड जिल्हा परिषद यांचा बेजबाबदारपणा कारणीभूत असून यासाठी विनाकारण रायगड विकास प्राधिकरणाला रोषास सामोरे जावे लागत आहे. रायगड विकास प्राधिकरणाची कार्यकक्षा केवळ संवर्धन व मूलभूत सुविधांची निर्मिती इतकीच मर्यादित असून याची देखभाल करण्यासाठी प्राधिकरणाचा निधी खर्च करता येत नाही.
केवळ बांधकाम करून ते पुरातत्त्व विभाग व जिल्हा प्रशासनाकडे हस्तांतरित करणे, हे प्राधिकरणाचे काम असताना त्याच्या देखभालीसाठी प्राधिकरणास दोषी धरणे योग्य नाही. शासनाच्या निर्णयानुसार, प्राधिकरणाने अशा सुविधा उभारल्यानंतर त्या मूळ यंत्रणेकडे अथवा संबंधित शासकीय यंत्रणेकडे म्हणजेच जे गडावर तिकिट आकारणे करतात, त्या पुरातत्व विभागाकडे किंवा जिल्हा परिषदेकडे हस्तांतरित करावयाच्या आहेत. व त्यांनी याची देखभाल करावयाची आहे, असे त्यांनी स्पष्ट केले होते.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.