
बंधु भेटीचा तो अनुपम्य सोहळा अवघ्या महाराष्ट्राने पाहिला. काय तो अंधार... मोबाईलचे फ्लॅश... दोन्ही बंधूंचे प्रकाशझोतात मंचावरील काय ते नाट्यमय आगमन... या मनोमिलनाला महाराष्ट्राचे ‘कारभारी’च कारणीभूत असल्याचे श्रेय दोन्ही बंधूंनी एकमतानं दिलं. नंतर त्यांनी कारभारी पंतांना आभारपत्रेही लिहिली. कारभाऱ्यांनीही त्यांना पत्रोत्तर दिले. हा पत्रव्यवहार खास आमच्या वाचकांसाठी देत आहोत...
राजमान्य राजश्री(अनाजी)पंत कारभारी,
जय महाराष्ट्र!
आज जवळपास २० वर्षांनी आम्ही बंधू एकत्र आलो. याचे सर्वस्वी श्रेय तुम्हालाच. आमचे तीर्थरूपही यात अपयशी ठरले तिथे तुम्ही हा चमत्कार घडवलात पंत. त्याबद्दल तुमचे आभार... नव्हे धन्यवाद... नव्हे कृतज्ञता... खरं तर आम्हा बंधूंना एकत्र आणल्याबद्दल अवघा महाराष्ट्रच तुमचा ऋणी आहे. आम्हा बंधूंबाबत काहीही होवो, महाराष्ट्राशीच त्याचा संबंध असतोच.
आम्ही म्हणजे महाराष्ट्र अन् महाराष्ट्र म्हणजे आमचे घराणे. तेवढा संघर्ष अन् समर्पण आमच्या घराण्यानेच फक्त केलंय. खरं तर मला तुमच्यामुळेच मुख्यमंत्रिपदाच्या खुर्चीवर विराजमान होता आलं. अन् तुमच्यामुळेच मी या पदावरून पायउतारही झालो. तुम्ही रात्री-अपरात्री हुडहुडी भरणाऱ्या थंडीतही ‘हुडी’ घालून (त्या वेळच्या) आमच्या ठाणेकर भाईंकडे जाऊन जी खलबते केली अन् नंतर आमच्यावर खलबत्ता चालवलात. असो. (असल्या स्वस्त कोट्या करण्याचा मोह काही जात नाही अजून) पण आम्हीही तुमच्या ‘मी पुन्हा येईन’ला ब्रेक लावलाच. हमने बाजी मारी...(तुमच्या हिंदीप्रेमासाठी हिंदीत वदलो. बाकी काही नाही)
आपण हिंदीचा अध्यादेश काढला अन् माझी विझू पाहणारी ‘मशाल’ धडाडू लागली. तिकडे आमच्या बंधुराजांचेही ‘सायडिंग’ला पडलेले रेल्वे इंजिन धडधडू लागले. मग काय आम्ही दोघेही डरकाळ्या फोडू लागलो. मी केला हात टाळीसाठी पुढे. (हात कसला तो. नव्हे, पंजाच तो. नव्हे, वाघाचा पंजाच तो. एक नव्हे, दोन वाघांचे पंजेच ते) दोन वाघ एकत्र राहत नाही म्हणतात. पण आम्ही दोन्ही वाघ या महाराष्ट्रासाठी, मराठीसाठी एकत्र आलो.
‘महापालिकेसाठी एकत्र आलो,’ असे फक्त तुम्हीच म्हणा. असले क्षुद्र विचार तुमच्याच मनात येणार. मातोश्री, माँसाहेब, मराठी माणूस, मराठी माती अन् महाराष्ट्रासाठीच आम्ही एकत्र आलो बेलाशक. पुढेही एकत्र येणारच (बंधुराज म्हणालेत ‘वाट बघा’) म्हणजे फक्त ‘टाइम प्लीज’ मागून घेतलाय. पण आमचंच रक्त ते. येऊच एकत्र. तुम्ही बसा हात चोळत. असो.
(कधी काळी) तुमचा,
‘मातोश्री’वाला बांद्रेकर
सन्माननीय कारभारी,
जय महाराष्ट्र!
तुम्ही आमचा मेळावा पाहिलाच. आम्ही दोघे बंधू एकत्र आल्याबद्दल मी मानलेले आभारही तुम्ही स्वीकारलेत. धन्यवाद. खरं तर हिंदीचा मुद्दा तुम्ही ताणला नसता तर हा प्रसंग आलाच नसता बरं का. चला, तुम्ही अध्यादेश रद्द करून माझी होणारी पंचाईत रोखलीत. नाय तर मोर्चा काढावा लागला असता. त्यासाठी नियोजन, खस्ता खाणं आलं.
भल्या सकाळी उठून रस्त्यावर यावं लागलं असतं. ते सगळं टळलं ते एक बरं झालं. याच आमच्या बंधूंची टाळी मिळेल, या आशेनं मी मागच्या वेळी टाळीसाठी हात पुढे करून बसलो होतो. पण हात दुखायला लागला तरी टाळी मिळेनाच. उमेदवारी अर्ज भरायची वेळ टळू लागली. टाळी मिळालीच नाही बरं का. ती टाळाटाळ पाहून मी वैतागलो होतो. तरीही अलीकडे महाराष्ट्रापुढे आमचे मतभेद बाजूला ठेवू, असं मी म्हणालो पण यावेळी बंधुराजांनी ते मनावरच घेतलं अन् टाळीसाठी हात पुढे केलाय. आता त्याला थांबू देत थोडं.
तूर्तास आम्ही त्या मेळाव्यात फक्त मराठीहितासाठी एकत्र आलोय. पुढचं पुढं पाहू. बंधुराज मात्र पुढेही एकत्र येण्याच्या गोष्टी करत होते. मला विचार करावा लागेल. (माझ्या हातात विचार करण्याशिवाय बाकी सत्ता नाहीच म्हणा) मी आमच्या पदाधिकाऱ्यांनाही तंबी दिलीये, की युतीबाबत काहीबाही आत्ताच बोलायचं नाहीये.
आमच्या युतीला आमच्या बंधुराजांच्या घरच्यांचाही पाठिंबा यावेळी दिसतोय. यावेळी वहिनीसाहेबही मागच्या वेळी मी ‘बटाटेवड्या’चा जाहीर उल्लेख केल्याचा राग विसरून, ‘घरी बटाटेवडे खायला या’ असं हसून म्हणाल्या. मीही ‘हिला विचारून सांगतो’ वगैरे बोलून वेळ मारून नेली. (मागच्या वेळी ‘तिनं’ नजरेनंच दटावून, ‘डोण्ट माईंड, चल सोबत’ असं खुणावल्यापासून, माझ्या हिनं फारच ‘माईंड’ला लावून घेतलंय. त्यामुळे हिला विचारल्याशिवाय मी गॅलरीतही जात नाही). असो. थोडक्यात आम्ही एकत्र येण्याविषयी मी माझं मत राखून ठेवलंय.
तुमचाही,
‘कृष्णकुंज’वाला दादरकर
बांद्रेकर, दादरकर बंधूद्वय,
सप्रेम नमस्कार!
तुम्हा बंधूंच्या भेटीचा सोहळा पाहून पुढील ओळी मनात गुंजत आहेत त्या अशा...
बंधुभेटीचे दर्शन साठवी डोळां हो
सैनिक धरती परतवारीची वाट हो
तुमचीच माणसं हो, तुमचीच नाती
थोरली-धाकली जाहली एक पाती
भुंगा शंकेचा फिरे ‘कमळा’भोवती
विठ्ठलाऽऽ घेणार का, हे झेंडा एकहाती?
डाव साधून फेकू की हुकमाचे अस्त्र
‘ईडी’पीडेने भले भले होई निःशस्त्र
फुंकरून विझवू ‘मशाली’ची ज्योती
चक्रव्यूह भेदण्याची आमची ख्याती
विठ्ठलाऽऽ घेणार का हे झेंडा एकहाती?
तुमचाच, ‘वर्षा’निवासी पंत
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.