
Nagpur News : नागपूर जिल्ह्यातील दिग्गज नेते, माजी मंत्री सुनील केदार यांच्या मतदारसंघातून कोण लढणार, त्यांचे वारसदार कोण, काँग्रेस कोणाला उमेदवारी देणार याचे उत्तर मतदारांना मिळाले आहे. केदारांच्या पत्नी अनुजा केदार यांनी सावनेर विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज भरला आहे.
विशेष म्हणजे काँग्रेसच्या उमेदवारांची अधिकृत यादी अद्याप जाहीर व्हायची आहे. उमेदवारांच्या नावांचीही घोषणा व्हायची आहे.नागपूर जिल्ह्यात केदारांचे राजकीय वर्चस्व आहे. लोकसभेच्या निवडणुकीत त्यांनी एका सरपंचाला थेट खासदार करून संसदेत पाठवले आहे. त्यामुळे त्यांचे महाविकास आघाडीच वजन आणखीच वाढले आहे.
केदारांना त्यांच्या सावनेर मतदारसंघात पराभूत करण्याचे अनेकदा प्रयत्न भाजपने केले. वेगवेगळे प्रयोग केले. अमित शहा यांच्या सारख्या बड्या नेत्याला प्रचारात आणले. मात्र, केदारांना आजवर भाजपला पराभूत करता आले नाही.
नागपूर जिल्हा मध्यवर्ती बँक घोटाळ्यात त्यांना न्यायालयाने दोषी ठरवल्याने त्यांचे सदस्यत्व रद्द करण्यात आले आहे. उच्च व सर्वोच्च न्यायालयाने दोषसिद्धीला स्थगिती देण्यास नकार दिला आहे. त्यामुळे पुढील पाच वर्षे सुनील केदारांना (Sunil Kedar) निवडणूक लढता येणार नाही. त्यामुळे केदार सावनेरमधून कोणाला उमेदवारी देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते.
सावनेर कळमेश्वर विधानसभा निवडणुकीसाठी अनुजा सुनील केदार यांनी उमेदवारी अर्ज गुरुवारी सावनेर तहसील कार्यालयात दाखल केला. काँग्रेस कार्यकर्त्यांच्या प्रश्नांची उत्तरे दिली. आता त्यांच्या विरोधात भाजप कोणाला रिंगणात उतरवते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. काँग्रेसच्या (Congress) छाननी समितीच्या बैठकीत सावनेर विधानसभा मतदारसंघ सुनील केदार जो उमेदवार देतील तो असा निर्णय घेण्यात आला होता.
नागपूर जिल्ह्यात महाविकास आघाडीचे उमेदवार ठरवण्यात केदारांची भूमिका महत्त्वाची आहे. शरद पवार यांच्या राष्ट्रवादीकडे असलेला हिंगणा विधानसभा मतदारसंघ केदारांनी काँग्रेससाठी मागितला होता. तो त्यांना देऊ केला असून त्या बदल्यात नागपूर शहरातील पूर्व नागपूर विधानसभा मतदारसंघ राष्ट्रवादीला देण्यात आला आहे. त्यामुळे शहरातील नेते चांगलेच चिडले आहेत. केदारांनी ग्रामीणचे बघावे शहरात लुडबूड करू नये, असे त्यांचे म्हणणे आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसकडे गेलेला पूर्व नागपूर विधानसभा मतदारसंघ सोडवून आणण्यासाठी शहरातील काँग्रेसचे नेते दिल्लीला रवाना झाले आहेत. त्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.