
महाराष्ट्र भाजपने आतापर्यंत तब्बल 1 कोटी 44 लाख सदस्य नोंदणी पूर्ण केली आहे. येत्या सहा दिवसांमध्ये आणखी सहा लाख सदस्य नोंदणी करून 1 कोटी 50 लाखांपर्यंत सदस्य संख्या नेण्याचा पक्षाचा प्रयत्न आहे. सहा दिवसांत हा आकडा निश्चित गाठू असा विश्वास नेते व्यक्त करत आहेत. महाराष्ट्रात सदस्यसंख्येचा असा विशाल आकडा आतापर्यंत कोणत्याही पक्षाला गाठता आला नव्हता, त्यामुळे ही भाजपची ऐतिहासिक कामगिरी ठरणार आहे.
ही ऐतिहासिक कामगिरी करण्यामागे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्यासह माधवी नाईक यांनीही पडद्यामागून या अभियानाची सूत्र फिरवली. नागरिकांनी मिस कॉल देणे किंवा ऑनलाइन नोंदणी करून पक्ष सदस्यत्व घ्यायचे होते. मध्यंतरीच्या काळात उद्दिष्टपूर्तीसाठी काही आमदारांनी काम बाहेर देण्यासाठी संस्था शोधून काढली होती. पण त्यातील गोंधळानंतर दक्षता घेण्यात आली.
माधवी नाईक या भाजपच्या ज्येष्ठ नेत्या आहेत. त्या नव्वदीच्या दशकात ठाणे महापालिकेत सलग 10 वर्षे नगरसेवक होत्या. पण त्यांच्या तिसऱ्या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला आणि काही दिवस त्या अज्ञातवासात गेल्या. त्यानंतर त्यांना राज्याच्या राजकारणात सक्रिय करण्यात आले. त्यांची थेट महाराष्ट्र महिला मोर्चाच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. पुढे प्रदेश उपाध्यक्षपदावर त्यांना बढती दिली गेली. याच काळात ‘एअरपोर्ट ॲथोरेटी ॲाफ इंडिया’च्या केंद्र सरकार नियुक्त संचालकपदी त्यांची वर्णी लागली. सध्या त्यांच्याकडे प्रदेशाच्या सरचिटणीस पदाची जबाबदारी आहे.
सुरुवातीला भाजपने राज्यात एक कोटी सदस्य संख्या करण्याचे उद्दिष्ट आधी दिले होते. नंतर भाजपच्या राष्ट्रीय नेत्यांनी 50 लाखांनी वाढवून दीड कोटी केले. ही दरी येत्या सहा दिवसांत पूर्ण करून 1 कोटी 50 लाख सदस्यसंख्या गाठण्याचा विश्वास पक्षनेते व्यक्त करीत आहेत. या सदस्य नोंदणी मोहिमेत पूर्व विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाडा या चार विभागांची कामगिरी अत्यंत लक्षणीय झाली आहे. या सर्व भाजप सदस्यांना ओळखपत्र देखील देण्यात येणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.