Urban Naxal Controversy : विधान परिषदेमध्ये शिवसेनेच्या आमदार मनिषा कायंदे यांनी आषाढी वारीमध्ये अर्बन नक्षल घुसल्याचे म्हटले. ते म्हणाल्या, संविधान दिंडी, पर्यावरण वारी, लोकायत यासारख्या वेगवेगळ्या नावाखाली हे वारीमध्ये जाऊन पथनाट्य करतात, भाषणं करतात आणि लोकांचा बुद्धीभेद करण्याचा प्रयत्न करतात. त्यांच्या या वक्तव्यानंतर त्यांच्यावर टीका करण्यात येत आहे. आता थेट 'संविधान दिंडी'चे शामसुंदर महाराज सोन्नर यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिले आहे.
एक दिवस तरी वारी अनुभवावी आणि संविधान समता दिंडी विषयी पसरवण्यात येत असलेल्या अफवा आणि गैरसमजाबाबत संबंधितांवर कारवाई करण्यात यावी असे पत्रात म्हटले आहे. या पत्रात मनिषा कायंदे यांनी केलेल्या आरोपांचा समाचार घेण्यात आला आहे.
'संविधानाचा विचार मान्य नसलेले काही लोक समाजात आहेत. त्या लोकांना संत विचारातील प्रेम, करुणा, मानवता मानवत नाही. ते लोक वारी आणि वारकरी संप्रदाय परंपरेला अनिष्ट सनातनी वैदिक ब्राह्मणी धर्मात बंदिस्त करू पाहत आहेत. संतांच्या व्यापक, समतेच्या आणि बंधुतेच्या विचारांना नाकारणारे हे लोक विकृतीने ग्रस्त होऊन कार्यरत आहेत.हे लोक ‘एक दिवस तरी वारी अनुभवावी’ आणि ‘संविधान समता दिंडी’ला विरोध करत आहेत.', असे पत्रात म्हटले आहे.
पुढे म्हटले आहे की, ‘संविधान समता दिंडी’ आणि ‘एक दिवस तरी वारी अनुभवावी’वर टीका करताना 'अर्बन नक्षल' या सहज सोप्या आणि पुरावा देण्याची कोणतीही अट नसलेल्या संकल्पनेचा वापर केला जात आहे. इतकेच नव्हे तर या टीकेच्या माध्यमातून हे लोक इतक्या महत्वाच्या संवैधानिक राष्ट्रीय कार्यामध्ये विघ्न घालू पाहत आहेत. संतांच्या काळात संत ज्ञानेश्वर माऊली, संत तुकाराम महाराज, संत नामदेव महाराज, संत चोखोबा महाराज, संत जनाबाई महाराज यांना त्रास देणाऱ्या मंबाजीसारख्या प्रवृती आजही समाजात वावरत आहेत.
विद्वेषाच्या विकृतीने ग्रस्त झालेली ही मंडळी, ज्या लोकांची किंवा संघटनांची अर्बन नक्षलवादी म्हणून नावे घेत आहेत, असे कोणीही 'एक दिवस तरी वारी अनुभवावी' आणि 'संविधान समता दिंडी' आयोजनात नाहीत. किंबहुना अशा लोकांचा किंवा संघटनांचा आमच्या आयोजनात संबंध नाही. याउलट संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्याचे चोपदार हभप राजाभाऊ चोपदार, ज्येष्ठ कीर्तनकार हभप ज्ञानेश्वर महाराज वाबळे , कैकाडी महाराज मठाचे अधिपती हभप भारत महाराज जाधव, हभप धम्मकीर्ती महाराज आदी मंडळी या संविधान दिंडीत सहभागी होत असतात, असे पत्रात सांगितले आहे.
भारतीय संविधानाला अभिप्रेत राष्ट्र उभारणी व संवर्धनाच्या चांगल्या विचाराला आणि उपक्रमाला थांबविण्यासाठी आणि आपली राजकीय सांस्कृतिक पोळी भाजून घेण्यासाठी हे विकृत लोक समाजाची दिशाभूल करून समाजात द्वेष आणि अशांतता तयार करत आहेत. हे लोक आम्हाला बदनाम करून स्वतःच समाजात दुही माजवतील. तसेच हेच लोक वारीमध्ये अनिष्ट प्रकार करतील आणि त्याचा पुन्हा आमच्यावर आरोप लावतील, अशी आम्हास त्यांच्या जाहीर वक्तव्यावरून, बोलण्यावरून शंका येत आहे. त्यांचे आजवरचे वर्तनव्यवहार पाहिल्यास समाजात अशांतता निर्माण करणे, समाजाची दिशाभूल करणे, अशी त्यांची प्रवृत्ती राहिली आहे. तरी आपण या प्रवृत्तींची आणि अशा लोकांची चौकशी करावी, त्यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई करुन त्यांना वेळीच थांबवावे, अशी आम्ही मागणी पत्राद्वारे संविधान दिंडीच्या मार्फत करण्यात आली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.