

NCP Delimitation Bill:राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरदचंद्र पवार पक्षात मतदारसंघ पुनर्रचना अर्थात डिलिमिटेशन विधेयकावरून अंतर्गत नाराजी उफाळून आली आहे. या विधेयकाला पक्षाने एनडीएला पाठिंबा देण्याचे संकेत दिल्यानंतर सोशल मीडिया सेलच्या माजी प्रदेश सरचिटणीसांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.
पक्षाच्या भूमिकेशी वैचारिक मतभेद असल्याचे स्पष्ट करत रामेश्वर खामकर यांनी हा निर्णय घेतला. शिव-शाहू-फुले-आंबेडकर विचारधारेशी तडजोड करणे शक्य नसल्याचे त्यांनी राजीनामा पत्रात नमूद केले आहे.
शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस हा इंडिया आघाडीतील प्रमुख घटक पक्ष आहे. मात्र, डिलिमिटेशन विधेयकाच्या मुद्द्यावर पक्षाने घेतलेल्या भूमिकेमुळे राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे. विरोधी पक्ष म्हणून भाजपच्या अनेक निर्णयांना विरोध करणाऱ्या कार्यकर्त्यांसमोर आता पक्षाची भूमिका जनतेपर्यंत कशी पोहोचवायची, असा प्रश्न निर्माण झाल्याचे खामकर यांनी म्हटले आहे.
पक्षाच्या निर्णयामुळे कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली असून, विचारधारेला प्राधान्य देणाऱ्या पदाधिकाऱ्यांची कोंडी होत असल्याचे त्यांच्या राजीनाम्यातून दिसून येते. सत्ताधाऱ्यांच्या निर्णयांना पाठिंबा देताना पक्षाच्या मूळ वैचारिक भूमिकेचे काय, असा सवालही उपस्थित केला जात आहे.
रामेश्वर खामकर यांनी राजीनामा पत्रात आपल्या नाराजीची सविस्तर कारणे मांडली आहेत. सोशल मीडिया सेलच्या प्रदेश सरचिटणीस पदावर काम करताना पक्षाची भूमिका लोकांपर्यंत पोहोचविण्यासह पुरोगामी विचारांचा प्रचार करण्याचा प्रामाणिक प्रयत्न केल्याचे त्यांनी सांगितले. मात्र, भाजपला डिलिमिटेशन विधेयकाच्या मुद्द्यावर पाठिंबा देण्याचा निर्णय आपल्या विचारांशी विसंगत असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.
राजकीय सोयीनुसार बदलणाऱ्या भूमिका आणि त्यामुळे कार्यकर्त्यांच्या भावनांकडे होणारे दुर्लक्ष यावरही त्यांनी आक्षेप घेतला आहे. कालपर्यंत ज्या विचारसरणीविरोधात संघर्ष केला, त्याच विचारसरणीला आज पाठिंबा देण्यामागची वैचारिक भूमिका काय, असा थेट प्रश्न त्यांनी पक्ष नेतृत्वाला विचारला आहे.
खामकर यांनी आपल्या पत्रात पद, सत्ता आणि राजकीय निष्ठेपेक्षा विचार, स्वाभिमान आणि संविधाननिष्ठा महत्त्वाची असल्याचे म्हटले आहे. डिलिमिटेशन विधेयकाला दिलेला पाठिंबा म्हणजे सरकारच्या व्यापक राजकीय भूमिकेला मूक संमती ठरू नये, अशी भूमिकाही त्यांनी मांडली.
यापुढे पक्षाने सत्ताधारी भाजपच्या निर्णयांचे समर्थन करायचे की पुरोगामी विचारांची कास धरायची, हा पक्षाचा निर्णय असल्याचे त्यांनी म्हटले आहे. मात्र, आपण पदावर असलो किंवा नसलो तरी संविधान, लोकशाही आणि पुरोगामी विचारांच्या रक्षणासाठी संघर्ष सुरूच ठेवणार असल्याचे स्पष्ट करत त्यांनी प्रदेश सरचिटणीस पदाचा राजीनामा स्वीकारण्याची विनंती केली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.