SharanKumar Limbale: 'बेळगाव काय पाकिस्तानात आहे का?' शरणकुमार लिंबाळेंच्या एका वक्तव्याने वाद; राजीनाम्यासाठी महाराष्ट्र एकीकरण समिती आक्रमक

SharanKumar Limbale's remarks on Belgaum Border Row:बेळगाव सीमावादावर शरणकुमार लिंबाळेंच्या वक्तव्याने वाद; महाराष्ट्र एकीकरण समितीकडून राजीनाम्याची मागणी, दीपक पवार यांचाही हल्लाबोल.
SharanKumar Limbale's remarks on Belgaum Border Row
SharanKumar Limbale's remarks on Belgaum Border RowSarkarnama
Published on: 
Updated on: 

100th Marathi Sahitya Sammelan Pune News: पुण्यात होऊ घातलेल्या शंभराव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे नवनियुक्त अध्यक्ष शरणकुमार लिंबाळे यांच्या महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादाविषयीच्या वक्तव्यावरून नवा वाद निर्माण झाला आहे.

मराठी माणूस केवळ बेळगावमध्येच नाही, तर जगभरात विखुरलेला आहे. म्हणून सगळे जग महाराष्ट्रात आणणार आहोत का? बेळगाव काय पाकिस्तानात आहे का, असा सवाल लिंबाळे यांनी उपस्थित केला आहे. त्यांच्या या वक्तव्यावर महाराष्ट्र एकीकरण समितीने तीव्र आक्षेप घेत थेट त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.

शंभराव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर शरणकुमार लिंबाळे यांनी बीबीसी मराठी या वृत्तवाहिनीसोबत बोलताना महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नावर आपली भूमिका मांडली. सीमावाद हा न्यायप्रविष्ट विषय आहे. न्यायदेवता कधी डोळे उघडेल, हे मला माहिती नाही. बेळगावमध्ये मराठी माणूस आहे, त्यामुळे बेळगाव महाराष्ट्रात आले पाहिजे, अशी आपण मागणी करतो. मात्र, मराठी माणूस केवळ बेळगावमध्येच आहे, असे नाही. अमेरिका, ब्रिटन, ऑस्ट्रेलियासह तमिळनाडू, केरळमध्येही मराठी माणूस आहे. म्हणून काय सगळे जग आपण महाराष्ट्रामध्ये आणणार आहोत का? ते आणू शकत नाही, असे लिंबाळे म्हणाले.

'बेळगाव काय पाकिस्तानात आहे का?'

पुढील काळात स्थलांतर अटळ आहे. एका भाषेची माणसे दुसऱ्या भागात जाणार आहेत. कामासाठी, मजुरीसाठी माणसे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाणार आहेत. त्यांचे प्रश्न गंभीर आहेत. भाषा आणि कला या एका प्रांतात बंदिस्त करता येणार नाहीत. या वैश्विक गोष्टी असून, त्या वैश्विक पद्धतीनेच समजून घेतल्या पाहिजेत, अशी भूमिका लिंबाळे यांनी मांडली. ''बेळगाव काय पाकिस्तानात आहे का? बेळगाव भारतातच आहे. भारताविषयी आपल्या मनात जेवढी आत्मीयता असेल, प्रेम असेल, तेवढेच बेळगावमधील कन्नड माणसाविषयी आपल्या मनात प्रेम असले पाहिजे,'' असे लिंबाळे म्हणाले.

SharanKumar Limbale's remarks on Belgaum Border Row
NDA Gets Stronger: अकाली दलाची घरवापसी, तीन मित्रपक्षांची साथ; लोकसभेत एनडीएची ताकद 42 खासदारांनी वाढली!

'माझी मातृभाषा कन्नड होती, पण आज मी मराठीचा लेखक आहे'

आपली स्वतःची पार्श्वभूमी सांगताना लिंबाळे म्हणाले, ''माझी मातृभाषा कन्नड होती. आज मी मराठीचा लेखक आहे. मला कन्नड बोलता येत नाही. माझी आई कन्नड होती, पण मी कन्नड विसरून गेलो. कारण मला महाराष्ट्रात राहायचे आहे. ज्या भागात राहायचे आहे, त्या भागाची भाषा आणि संस्कृती आपण स्वीकारली पाहिजे. आपली माणसे ज्या भागात गेली आहेत, त्या भागातील भाषा आणि संस्कृतीविषयी त्यांनी आदर दाखवला पाहिजे.''

महाराष्ट्र एकीकरण समिती आक्रमक; थेट राजीनाम्याची मागणी

लिंबाळे यांच्या या वक्तव्यावर महाराष्ट्र एकीकरण समितीने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. शंभराव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या नवनियुक्त अध्यक्षांनी सीमाप्रश्नाचा आणि मराठी भाषेचा अपमान केल्याचा आरोप समितीने केला आहे.

१९४६ मध्ये बेळगाव येथे झालेल्या मराठी साहित्य संमेलनात संयुक्त महाराष्ट्राचा ठराव करण्यात आला होता. २००० मधील साहित्य संमेलनामुळे सीमाप्रश्न सर्वोच्च न्यायालयात गेला. आजवरच्या साहित्य संमेलनांमध्ये सीमाप्रश्न तातडीने सोडविण्याची मागणी करणारे ठराव करण्यात आले. त्याच साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी संयुक्त महाराष्ट्राच्या भूमिकेला विरोध करणाऱ्या व्यक्तीची निवड होणे दुर्दैवी असल्याची टीका समितीने केली आहे.

''आज ठिणगी बेळगावातून पडत आहे. जोपर्यंत लिंबाळे यांचा राजीनामा येत नाही, तोपर्यंत आम्ही शांत होणार नाही,'' असा इशारा देत महाराष्ट्र शासन आणि महाराष्ट्र साहित्य परिषदेने याबाबत तातडीने निर्णय घ्यावा, अशी मागणी समितीने केली आहे.

SharanKumar Limbale's remarks on Belgaum Border Row
CET Exam: पहिल्या परीक्षेत कमी गुण मिळाले? चिंता नको! वर्षातून दोनदा CET देण्याची संधी; पहिली सीईटी अनिवार्य, दुसरी ऐच्छिक

'जगभरातील स्थलांतर आणि सीमाप्रश्न यातील फरक कळतो का?'

मराठी भाषा चळवळीचे कार्यकर्ते डॉ. दीपक पवार यांनीही लिंबाळे यांच्या वक्तव्यावर कठोर शब्दांत टीका केली आहे. अमेरिकेत गेलेले मराठी लोक भाषावार प्रांतरचनेचा भाग म्हणून गेले आहेत, असे लिंबाळे यांना वाटते का? जगभरातील स्थलांतर आणि भाषावार राज्य पुनर्रचनेतून निर्माण झालेला सीमाप्रश्न यातील फरक त्यांना कळतो का, असा सवाल पवार यांनी उपस्थित केला आहे.

सीमाप्रश्न हा राज्य पुनर्रचनेतील अनुत्तरित प्रश्न आहे. महाराष्ट्रातील राजकीय वर्गाच्या नाकर्तेपणामुळे हा प्रश्न सुटू शकलेला नाही. अशा परिस्थितीत सीमाभागातील लोकांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम लिंबाळे यांनी करायला नको होते, अशी टीका पवार यांनी केली.

SharanKumar Limbale's remarks on Belgaum Border Row
Teacher News: शिक्षकांचा 1 डिसेंबरपासून 'डिजिटल असहकार'! प्रशासकीय WhatsApp ग्रुप सोडणार; ऑनलाइन कामांनाही नकार

लिंबाळे यांच्या वक्तव्याची सीमाभागात, तसेच सीमाभागातून रोजगारासाठी महाराष्ट्रात आलेल्या नागरिकांमध्ये तीव्र प्रतिक्रिया उमटल्याचे पवार यांनी म्हटले आहे. पुण्यात महाराष्ट्र साहित्य परिषद आणि अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे कार्यालय आहे. लवकरच मराठीप्रेमी संबंधित पदाधिकाऱ्यांना भेटून याबाबत जाब विचारणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.