
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष विरोधी पक्षनेतेपदासाठी आग्रही आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशन संपले, आता पावसाळी अधिवेशनाचेही आठ दिवसच बाकी आहेत. पण अद्याप विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सकारात्मक प्रतिसाद दिलेला नाही. ठाकरेंच्या पक्षाचं हे दुखणं असतानाच ठाकरे आणि शरद पवार यांच्या आमदारांना अद्यापही विधिमंडळात कार्यालय मिळालेले नाही. या दोन्ही पक्षांना कार्यालयासाठी सरकारकडे याचना करावी लागत आहे.
एकनाथ शिंदे यांना शिवसेनेत फूट पडल्यानंतर तातडीने त्यांना पूर्वीचे शिवसेनेचे कार्यालय देण्यात आले होते. विधानसभा अध्यक्षांनी त्यांच्या गटाला मूळ शिवसेना असल्याचा निकाल दिल्यानंतर तर हे कार्यालय शिवसेनेचे अधिकृतच झाले. आता शिवसेनेचे कार्यालय दिमाखदार बनवण्यात आले आहे. शिंदे मुख्यमंत्री असताना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला विधान भवनात कार्यालयच मिळाले नव्हते.
दरम्यान, विधानसभेच्या निवडणुका झाल्या. यात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सर्वाधिक 20 आमदार आहेत. तरीही त्यांना कार्यालयासाठी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे वारंवार मागणी करावी लागत आहे. या अधिवेशनात हे आमदार राहुल नार्वेकर यांना भेटले. कार्यालय द्या, असे पत्र दिले. याआधीही अशी पत्रे दिली. पण काही झाले नाही.
आता अधिवेशनानंतर कार्यालय देऊ, असे आश्वासन दिले आहे. सध्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा कारभार विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या कार्यालयातून चालत आहे. पण त्यांच्या आमदारकीची मुदत ऑगस्ट 2025 मध्ये संपणार आहे. त्यामुळे ठाकरेंच्या आमदारांवर सध्या कुणी कार्यालय देते का कार्यालय असे म्हणण्याची वेळ आली आहे.
जी अवस्था शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची आहे तशीच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचीही आहे. त्यांनाही विधान भवनात कार्यालय नाही. अजित पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेस मात्र कार्यालय आहे. शरद पवार यांच्या पक्षाला कार्यालय देऊ असे सांगण्यात आले आहे. ठाकरेंच्या पक्षाप्रमाणे शरद पवार यांच्या पक्षाकडे संवैधिकानिक पद नाही. त्यामुळे कामकाज करायचे कुठून असा प्रश्न आमदारांपुढे आहे.
विरोधी पक्षात सध्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सर्वाधिक 20 आमदार आहेत. तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे 10 आमदार आहेत. पण सत्ताधारी गटात असलेल्या जनसुराज्य पक्षाचे केवळ 2 आमदार आहेत. पण त्यांना स्वतंत्र कार्यालय देण्यात आले आहे. नुकतेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या कार्यालयाचे उद्घाटन झाले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.