

राज्याच्या राजकारणात सध्या एका वेगळ्याच घटनेवरून राजकीय वातावरण तापले आहे. सोनिया गांधी यांच्या पुस्तकाचा निषेध करण्यासाठी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत शिवसेना (शिंदे गटाच्या) प्रवक्त्या शायना एनसी यांच्याकडून चुकून शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचाच फोटो फाडला गेला. या घटनेचा व्हिडिओ समोर आल्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना सुरुवात झाली असून ठाकरे गटानेही या प्रकारावर तीव्र संताप व्यक्त केला आहे.
सोनिया गांधी यांच्या 'Belonging: A Journey of Love' पुस्तकातील स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविषयीच्या मजकुरावर आक्षेप घेत शिंदे गटाच्या 6 प्रवक्त्यांनी पत्रकार परिषद आयोजित केली होती. या पुस्तकातून सावरकरांचा अवमान करण्यात आल्याचा आरोप करत शिवसेनेकडून पुस्तकावर बंदी घालण्याची मागणी करण्यात आली. याच निषेधाचा भाग म्हणून पत्रकार परिषदेत सोनिया गांधी यांच्या पुस्तकाच्या प्रती फाडण्यात येत होत्या.
मात्र, पुस्तक फाडत असताना शायना एनसी यांच्या हातून जवळच असलेला बाळासाहेब ठाकरे यांचा जुना फोटोही फाडला गेला. विशेष म्हणजे, सावरकरांच्या समर्थनार्थ बाळासाहेबांनी पूर्वी केलेल्या आंदोलनाचा हा फोटो होता. ही बाब लक्षात आल्यानंतर शायना एनसी यांनी आपली चूक अनवधानाने झाल्याचे स्पष्ट केले. माझा आक्षेप केवळ सोनिया गांधी यांच्या पुस्तकावर होता आणि पुस्तक फाडताना चुकून बाळासाहेबांचा फोटो फाडला गेला, असे त्यांनी स्पष्टीकरण दिले.
दरम्यान, ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी या घटनेवरून शिंदे गटावर जोरदार टीका केली. त्या म्हणाल्या की, "पत्रकार परिषदेतील या लोकांचा मुळात पुस्तकांशी काहीही संबंध नाही ही सर्व माणसे सतत टेंडर, कमिशन, दलाली, टक्केवारी आणि खोके याच्या पलीकडे विचार करणारी नाहीत."
पुढे त्यांनी बाळासाहेबांचा फोटो फाडल्याबद्दल संताप व्यक्त करत लाखो शिवसैनिकांच्या भावना दुखावल्याचे म्हटले. त्यांच्या मते, ज्या बाळासाहेबांच्या विचारांमुळे या नेत्यांना ओळख मिळाली, त्यांचाच फोटो फाडला जाणे ही गंभीर बाब आहे.
या घटनेमुळे आता महाराष्ट्रात सावरकरांचा अवमान आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या फोटोच्या अवमानाचा नवा राजकीय वाद निर्माण झाला आहे. शायना एनसी यांच्या स्पष्टीकरणानंतरही शिवसेना ठाकरे गटाची नाराजी कायम आहे. त्यामुळे शिवसेना (शिंदे गट) यावर काय भूमिका घेतो आणि या प्रकरणाचे राजकीय पडसाद आणखी किती उमटतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.