

Mumbai News: विधानसभा निवडणुकीत पराभवाचा धक्का सहन कराव्या लागलेल्या प्रहार संघटनेचे नेते बच्चू कडू यांना राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुन्हा एकदा आमदारकी दिली. त्यासाठी कडूंना विधानपरिषद निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेत पक्षप्रवेश करावा लागला होता. आता बच्चू कडू यांनी एकनाथ शिंदे लवकरच मोठं गिफ्ट देण्याच्या तयारीत असल्याची माहिती समोर येत आहे.
विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशन सध्या सुरू आहे. या अधिवेशनाच्या काळातच विधानपरिषदेच्या उपसभापतीपदाची निवड होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. मात्र,या निवडणुकीच मोठा ट्विस्ट येण्याची शक्यता आहे. उपसभापतीपदासाठी एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेकडून ऐनवेळी दमदार नेते असलेल्या बच्चू कडूंसह आणखी एका नेत्याचं नाव पुढे येण्याची शक्यता आहे.
राज्याचे उपमुख्यमंत्री व शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे हे विधानपरिषदेच्या उपसभापतीपदासाठी नवा डाव टाकण्याची शक्यता आहे. ते यावेळी शिवसेनेच्या आमदार नीलम गोऱ्हे यांच्याऐवजी विधान परिषदेच्या उपसभापती पदासाठी नवनिर्वाचित आमदार बच्चू कडू किंवा चंद्रकांत रघुवंशी यांना संधी देण्याच्या विचाराधीन असल्याची माहिती समोर येत आहे. आगामी काळात शिंदे नेमकं कोणाला उपसभापतीपदाची संधी देतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
प्रहार जनशक्ती पक्षाची स्थापना करणारे बच्चू कडू यांनी विधानपरिषद निवडणुकीच्या तोंडावर एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत अधिकृतपणे शिवसेनेत प्रवेश केला होता.त्यानंतर ते या निवडणुकीत बिनविरोध निवडूनही आले. यापूर्वी कडू यांनी महाविकास आघाडी सरकारमध्ये राज्यमंत्री म्हणून काम पाहिले आहे. तसेच, ते दिव्यांग मंत्रालयाचे अध्यक्ष (कॅबिनेट मंत्री दर्जा) होते. आता त्यांचं नाव विधानपरिषदेच्या उपसभापती पदाच्या शर्यतीत समोर येत आहे.
चंद्रकांत रघुवंशी यांना एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेकडून 2025 च्या विधान परिषदेच्या निवडणुकीत संधी देण्यात आली होती. त्याआधी ते काँग्रेस पक्षात असताना धुळे-नंदुरबार स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून लागोपाठ दोन वेळेस विधान परिषदेवर निवडून गेले होते. नंतर ते आमदारांमधून निवडून येत पुन्हा विधान परिषद सदस्य बनले होते.
त्यानंतर रघुवंशी हे उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वातील शिवसेनेत असताना राज्यपाल यादीला स्थगिती मिळण्याचा प्रकार घडला. तसेच एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत दाखल झाले, तेव्हा पक्षानं अक्कलकुवा येथील आमशा पाडवी यांना विधान परिषदेची उमेदवारी जाहीर केली होती.
त्यानंतर शिंदेचे विधान परिषद सदस्य आमशा पाडवी हे नुकत्याच पार पडलेल्या 2024 च्या निवडणुकीत विधानसभेवर निवडून गेले. त्यांच्या रिक्त झालेल्या जागेवर चंद्रकांत रघुवंशी यांची वर्णी लागली होती.त्यांना तीन वर्षांची मुदत असणार आहे. आता त्यांच्या नावाची विधानपरिषदेच्या उपसभापती पदासाठी जोरदार चर्चा आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.