
आमदार निवासातील कॅन्टिन चालकाने शिळे जेवण दिल्याने शिवसेना आमदार संजय गायकवाड मारहाण केली. या मारहाणीचा व्हिडीओ सध्या चांगलाच व्हायरल होत आहे. या मारहाणाचे पडसाद अधिवेशनातही उमटले. विधान परिषदेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही गायकवाड यांचे कृत्य भूषणावह नसल्याचे म्हणत फटकारले. तसेच त्यांच्यावर कारवाई करण्याचीही मागणी केली आहे.
गायकवाड यांनी केलेली मारहाण नक्कीच समर्थनीय नाही, पण त्यांना हे शिळे जेवण दिले तरी कोणी? अधिवेशन काळात आमदारांच्या जेवणाची व्यवस्था कोण करते?
अधिवेशन काळात आमदारांच्या निवासाची आणि जेवणाची व्यवस्था करण्यासाठी स्वतंत्र अस्थायी समित्या असतात. यात जेवणाची व्यवस्था करण्यासाठी आहार व्यवस्था समिती काम करत असते. आमदारांच्या सोईसाठी मुंबई आणि नागपूर येथील आमदार निवासामध्ये उपहारगृहाची व्यवस्था करण्यात येते. त्यावर आहार व्यवस्था समितीमार्फत नियंत्रण ठेवले जाते.
आहार व्यवस्था समितीमध्ये एकूण 15 सदस्य असून त्यापैकी 11 सदस्य विधानसभेच्या अध्यक्षांकडून तर 4 सदस्य विधानपरिषदेच्या सभापतींकडून प्रत्येक वर्षी नियुक्ती केले जातात. विधानसभा सदस्यांमधून समिती प्रमुखाची नामनियुक्ती विधानसभेचे अध्यक्ष करतात. हे सदस्य सर्वपक्षीय असतात. यातून एकाची अध्यक्ष म्हणून नियुक्ती करतात.
सध्या शिवसेनेचे अंबरनाथचे आमदार बालाजी किणीकर हे आहार व्यवस्था समितीचे अध्यक्ष आहेत. यांच्याशिवाय विधानसभेतून भाजप आमदार शंकर जगताप यांच्यासोबत अन्य 9 सदस्य आहेत. तर विधान परिषदेतून आमदार सदाशिव खोत, विक्रम काळे, राजेश राठोड आणि सचिन अहिर हे या समितीचे सदस्य आहेत.
आमदार निवास उपाहारगृहात करण्यात येणाऱ्या सदस्यांच्या आहार व्यवस्थेसाठी खाद्यपेय प्रबंधकाकडून निविदा मागविणे व खाद्यपेय प्रबंधकाची निवड करणे, उपाहारगृहातील खाद्यपेय पदार्थांचे दर ठरविणे, सदस्यांना उपाहारगृहात चांगले खाद्यपदार्थ तसेच चविष्ट, सकस आणि उत्कृष्ट प्रतीचे भोजन मिळेल याची दक्षता घेणे, उपाहारगृहात सदस्यांना असुविधा होणार नाही यासाठी खाद्यपेय प्रबंधकावर निगराणी ठेवणे, उपाहारगृहासंदर्भांत सदस्यांकडून आलेल्या तक्रारींची व सूचनांची दखल घेणे अशी जबाबदारी या समितीवर असते.
आमदार गायकवाड यांनी शिळे जेवण दिले म्हणून कॅन्टिन चालकाला मारहाण करण्यापेक्षा स्वतःच्याच पक्षाचे आमदार अध्यक्ष असलेल्या समितीकडे तक्रार करणे ही योग्य पद्धत होती. या समितीकडून तक्रारीची शहानिशा करून पुढील कारवाई करण्याबाबत शिफारस केली असती. पण गायकवाड यांनी संतप्त होत थेट मारहाण करणे योग्य समजले. यामुळे त्यांच्यावर सर्वच स्तरातून टीका होत आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.