

Maharashtra State Board decision: महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दहावी-बारावीच्या परीक्षांमधील गैरप्रकार रोखण्यासाठी मोठे पाऊल उचलण्याची तयारी सुरू केली आहे. आतापर्यंत परीक्षांमध्ये प्रश्नपत्रिका फुटणे, कॉपी करणे किंवा पेपरमध्ये छेडछाड यांसारख्या प्रकारांवर कारवाई केली जात होती. मात्र, आता उत्तरपत्रिकांमध्ये होणाऱ्या गैरप्रकारांवरही कठोर नजर ठेवण्याचा निर्णय घेण्यात येत आहे.
काही ठिकाणी उत्तरपत्रिका तपासणीदरम्यान गुण वाढवून देणे, फेरफार करणे, बनावट गुणपत्रिका तयार करणे किंवा मूल्यांकन प्रक्रियेत हस्तक्षेप केल्याच्या तक्रारी राज्य मंडळाकडे आल्या आहेत. त्यामुळे केवळ परीक्षा केंद्रांवरील गैरप्रकार थांबवून चालणार नाही, तर उत्तरपत्रिका आणि निकाल प्रक्रियेलाही अधिक पारदर्शक बनवणे आवश्यक असल्याचे मंडळाचे मत आहे.
यासाठी मंडळाने विद्यमान नियमांमध्ये बदल करण्याचा प्रस्ताव तयार केला आहे. महाराष्ट्र माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ अधिनियम १९६५ अंतर्गत गैरप्रकारांच्या व्याख्येत बदल करून उत्तरपत्रिकांतील छेडछाड, गुणांमध्ये फेरबदल, बनावट मूल्यांकन किंवा गुणपत्रिकांशी संबंधित फसवणूक यांचा स्पष्ट समावेश करण्याची तयारी सुरू आहे. त्यामुळे अशा प्रकारांना थेट गुन्हा मानून संबंधितांवर अधिक कठोर कारवाई करता येणार आहे, असे राज्य मंडळाचे अध्यक्ष डॉ. त्रिगुण कुलकर्णी यांनी स्पष्ट केले आहे.
या बदलामुळे शिक्षक, परीक्षक, कर्मचारी किंवा इतर संबंधित व्यक्तींनी गैरप्रकार केल्यास त्यांच्यावर थेट कायदेशीर कारवाई होण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. तसेच विद्यार्थ्यांनाही निकाल प्रक्रियेबाबत अधिक विश्वास वाटेल, असा दावा मंडळाकडून करण्यात येत आहे.
राज्य मंडळाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, परीक्षा प्रक्रिया पूर्णपणे स्वच्छ, पारदर्शक आणि विश्वासार्ह ठेवण्यासाठी हे बदल आवश्यक आहेत. सध्या या प्रस्तावावर विचार सुरू असून, लवकरच सुधारित नियम लागू करण्याबाबत निर्णय घेतला जाऊ शकतो.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.