

Sujat Ambedkar News : देशभरात नीट पेपरफुटीच्या घटनांमुळे विद्यार्थ्यांचे मोठे शैक्षणिक नुकसान झाले असताना, आता महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (TET) पेपरफुटीची घटना समोर आल्याने राज्यातील परीक्षा व्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीचे नेते सुजात आंबेडकर यांनी राज्य सरकारवर तीव्र टीका करत शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी जबाबदारी स्वीकारून तात्काळ राजीनामा द्यावा, अशी मागणी केली आहे. चाळीसगाव येथे आयोजित बहुजन संवाद महासभेत ते बोलत होते.
यावेळी सुजात आंबेडकर म्हणाले की, देशभरात नीट पेपर फुटीमुळे आधीच लाखो विद्यार्थ्यांचे मानसिक, शैक्षणिक आणि आर्थिक नुकसान झाले आहे. त्यातून विद्यार्थी आणि पालक अजूनही सावरलेले नसतानाच महाराष्ट्रातील TET परीक्षेचाही पेपर फुटल्याची घटना घडली. या परीक्षेसाठी सुमारे ६ लाख विद्यार्थी बसणार होते. अनेक विद्यार्थ्यांनी वर्षानुवर्षे अभ्यास करून, आर्थिक अडचणींवर मात करत या परीक्षेची तयारी केली होती. मात्र पेपरफुटीमुळे त्यांच्या मेहनतीवर पाणी फेरले गेले आहे.
ते पुढे म्हणाले की, पेपरफुटी ही केवळ प्रशासकीय चूक नसून विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ करणारा गंभीर गुन्हा आहे. वारंवार होणाऱ्या पेपरफुटीच्या घटनांमुळे विद्यार्थ्यांचा परीक्षा व्यवस्थेवरील विश्वास उडत चालला आहे. सरकार प्रत्येक वेळी चौकशी आणि कारवाईची घोषणा करते; मात्र अशा घटना थांबत नसल्याने प्रशासनाचे अपयश स्पष्ट होत आहे.
"जेव्हा एखाद्या परीक्षेचा पेपर फुटतो, तेव्हा केवळ प्रश्नपत्रिका फुटत नाही, तर लाखो विद्यार्थ्यांची स्वप्ने, त्यांची मेहनत आणि त्यांच्या कुटुंबाच्या अपेक्षाही उद्ध्वस्त होतात. त्यामुळे या गंभीर घटनेची जबाबदारी स्वीकारून राज्याचे शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी तात्काळ आपल्या पदाचा राजीनामा द्यावा," अशी मागणी सुजात आंबेडकर यांनी केली. यावेळी बहुजन संवाद महासभेला मोठ्या संख्येने नागरिकांची उपस्थिती होती.
टीईटी पेपरफुटीची घटना घडल्याने ही परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. या प्रकरणाची राज्य शासनाने गंभीर दखल घेतली असून दोषींवर कठोर कारवाई केली जाईल, अशी माहिती शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी दिली आहे.
ते म्हणाले की, भिवंडी येथे काही संशयितांकडे टीईटी परीक्षेची प्रश्नपत्रिका असल्याची गोपनीय माहिती पोलीस प्रशासनाला मिळाली होती. या माहितीच्या आधारे भिवंडी पोलिसांनी धाड टाकून संबंधित संशयितांना ताब्यात घेतले. पोलिसांनी जप्त केलेल्या प्रश्नपत्रिकेची महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या अधिकाऱ्यांकडून पडताळणी करण्यात आली.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.