Tushar Gandhi: ‘दिमागी नक्सल, अर्बन नक्सल म्हणत आंदोलनाचं श्रेय हिरावण्याचा डाव’; तुषार गांधींचा केंद्रावर निशाणा!

Delhi Protest News: तुषार गांधी यांनी दिल्लीतील आंदोलनाला दुसरा स्वातंत्र्यलढा संबोधत केंद्र सरकारवर टीका केली. लोकशाही, संविधान, मताधिकार आणि सत्तेच्या केंद्रीकरणाच्या मुद्द्यांवर त्यांनी आंदोलनाचे समर्थन केले.
Tushar gandhi
Tushar gandhi Sarkarnama
Published on: 
Updated on: 

Delhi Protest News: दिल्लीत सध्या विरोधी पक्ष आणि सीजेपीकडून ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी आंदोलन केले जात आहे. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचे पणतू आणि सामाजिक कार्यकर्ते तुषार गांधी यांनी देशभरात होणाऱ्या या आंदोलनावर आपली मते व्यक्त केली. यावेळी त्यांनी केंद्र सरकावर जोरदार टीका केली. ‘सकाळ माध्यम समूहा’चे मुख्य संपादक नीलेश खरे यांनी ‘साम’या वृत्तवाहिनीसाठी गांधी यांची विशेष मुलाखत घेतली.

‘‘दिल्लीतील आंदोलनामागे परकी शक्तींचा हात असल्याचा दावा करून केंद्र सरकार आंदोलकांचे श्रेय हिरावून घेण्याचा प्रयत्न करत आहे. आमच्यासारखी मंडळी लोकशाहीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करतात म्हणून आम्हाला दिमागी नक्सल, अर्बन नक्सल आणि आंदोलनजीवी या नावाने हिणवले जाते. लोकांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा केंद्र सरकारचा डाव आहे,’’ अशी घणाघाती टीका सामाजिक कार्यकर्ते तुषार गांधी यांनी केली.

‘‘दिल्लीमध्ये आज जी मंडळी रस्त्यावर उतरली आहेत ते संविधान आणि देशप्रेमी आहेत. संविधानातील प्रत्येक कायदेशीर तरतूद ही लोकशाहीच्या आणि लोकांच्या अधीन आहे. केंद्र सरकार आंदोलक नेमके काय सांगू पाहात आहेत? हे ऐकून घेण्याच्या मनःस्थितीमध्ये नाही. अशा स्थितीमध्ये मग रस्त्यांवर उतरल्याशिवाय पर्यायच राहात नाही. लोकप्रतिनिधींना जनता निवडून देत असते, त्यांनी लोकांचे ऐकावे असे गृहीत धरलेले असते पण आता तसे कोठेच होताना दिसत नाही. सत्तेसाठी पक्ष फोडणे, आमदार आणि खासदारांना खरेदी करणे अशा प्रकारची कृत्ये केली जाऊ लागतात, तेव्हा नागरिकांकडे देखील रस्त्यावर उतरल्याशिवाय पर्याय शिल्लक राहात नाही, ’’ असेही तुषार गांधी यांनी नमूद केले.

‘पूर्ण स्वराज मिळालेच नाही’

दिल्लीतील आंदोलन हा दुसरा स्वातंत्र्यलढा असल्याचा दावा करताना तुषार गांधी म्हणाले, की मी याला दुसरा स्वातंत्र्याचा संग्राम म्हणतो कारण बापूंच्या कल्पनेतील ‘पूर्ण स्वराज’ अद्याप आपल्याला स्थापन करता आलेले नाही. जयप्रकाश यांची संपूर्ण क्रांती अधुरीच राहिली. सध्या सत्तेचे केंद्रीकरण सुरू आहे त्याला बदलून एक सच्ची लोकशाही व्यवस्था आणण्याचा जो लढा सुरू झाला आहे तो स्वातंत्र्य लढ्यापेक्षा कमी महत्त्वाचा नाही.

तुषार गांधी काय म्हणाले?

आता सुरू असलेले आंदोलन योग्यच आहे कारण, लोकांकडे दुसरा कोणताच पर्याय शिल्लक राहिलेला नाही. यामुळे थोडी अस्थिरता निर्माण होत असेल तर त्याला घाबरण्याचे कारण नाही. कोणताही मोठा बदल होताना थोडीफार उलथापालथ होतेच; लोकांना त्रासही सहन करावा लागतो.

Tushar gandhi
Krishna Khopde: बँकेत नोकरी लावून देतो म्हणून आमदारालाच गंडा घालण्याचा प्रयत्न! नागपूरच्या भाजप आमदारानं सांगितला खळबळजनक प्रकार

देशामध्ये स्वातंत्र्याचा लढा सुरू असताना ब्रिटिश हे आम्ही तुमचा विकास करत आहोत, असे सांगत होते. रेल्वे, टेलिग्राफ आणि शिक्षण आणल्याचा दावाही ते करत होते पण त्यामागे तुम्हाला गुलाम ठेवणे हाच एकमेव हेतू होता. म्हणून लोकांनी आंदोलनाचा मार्ग स्वीकारला.

आता आपलेच लोक हे जनतेला गुलाम बनवू पाहात आहेत, या सत्ताधाऱ्यांचे ह्रदयपरिवर्तन घडवूनच आपण त्यांना इकडे आणू शकू त्यासाठी दुसरा कोणताही मार्ग शिल्लक राहिलेला नाही. आपल्याला बदलांना सामोरे जावे लागेल. आंदोलनास टाळता येणार नाही.

आपण जेव्हा लोकशक्तीची ताकद दाखवून देऊ तेव्हा सरकार कोणतेही असो त्याला घाबरायलाच हवे. लोक आपले अधिकार आणि हक्कांसाठी आता भांडत आहेत हे जेव्हा सरकारला कळेल तेव्हा त्यालाही माघार घ्यावी लागेल. यंत्रणेलाही नमते घ्यावे लागेल.

लोकशाही व्यवस्थेमध्ये आंदोलने होतातच, व्यवस्था बदलली तर दुसरी व्यवस्था आपल्याला तयार करावीच लागेल. हा बदल राजकीय मार्गानेच करावा लागेल. सत्तेला दुसरा पर्याय शोधावा लागेल. तो राजकीय असेल म्हणून हे आंदोलन राजकीय आहे.

Tushar gandhi
Census 2027: शिक्षकांचे पुन्हा हाल सुरु होणार? परीक्षा काळात पडणार अतिरिक्त जबाबदारी; विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक नुकसानीची भीती

लोकांचा मताधिकारच हिसकावून घेण्याचे कारस्थान केंद्र सरकारने आखले आहे. लोकशाहीमध्ये पुन्हा आपल्याला गुलाम व्हावे लागते की काय, अशी भीती सतावते आहे. म्हणूनच मी या आंदोलनासाठी दुसरा स्वातंत्र्यलढा हा शब्द वापरला. लोकशाहीच्या आधारस्तंभासाठी हा लढा सुरू आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com