

Sushma Andhare: ठाकरेंच्या शिवसेनेतील बिनीचे शिलेदार एकामागून एक साथ सोडून जात आहेत. नुकतेच सचिन अहिर हे देखील निघून गेले, त्यानंतर अहिर यांना भाऊ म्हणणाऱ्या सुषमा अंधारे यांच्याबाबतही लोक चर्चा करु लागले आहेत. काल त्यांचा फोन पत्रकारांना नॉटरिचेबल लागत असल्यानं या चर्चांना उधाण आलं होतं. पण यासर्व चर्चांवर आज त्यांनी पत्रकार परिषद घेत सविस्तर उत्तरं दिली. तसंच पक्षातील सर्वच नेत्यांची आता जबाबदारी तपासली गेली पाहिजे अशी भूमिका त्यांनी मांडली. तसंच काहीतरी मिसिंग असल्याचा संशयही त्यांनी व्यक्त केला आहे.
संजय राऊत म्हणतात की, आता आत्मपरिक्षण केलं पाहिजे यावर बोलताना अंधारे म्हणाल्या, पक्षाला आत्मपरीक्षणाची गरज नाही. पण काय होतंय की, पक्ष नेतृत्वाच्या साधेपणाचा गैरफायदा घेतला जातो. पक्ष नेतृत्वानं प्रत्येकावर जो विश्वास टाकलेला आहे मग तो माझ्यावर असेल, अहिरांवर असेल किंवा दानवेंवर असेल असा प्रत्येकावर हा विश्वास टाकलेला आहे. या विश्वासामुळं आमच्या सर्वांवर एक जबाबदारी असते त्यामुळं आम्ही त्या विश्वासाला पात्र ठरण्यासाठी झगडलं पाहिजे.
पण हा विश्वास पात्र ठरण्यासाठी आम्ही झगडलं पाहिजे. पण तो विश्वास आमच्यावर दाखवलेला असतानाही आमच्याकडून चुका होत असतील तर त्याचं अकाऊंटिंग पक्षाकडून झालं पाहिजे, माझ्यासह प्रत्येकाचं झालं पाहिजे. म्हणजे आम्ही कोणाला भेटतो, आम्ही नेमकं काय करतो? आम्ही नेमक्या कुठल्या कार्यक्रमांमध्ये भाग घेतो यावर लक्ष ठेवलं पाहिजे. समजा दानवेंना विरोधीपक्ष नेता केलं असेल आणि ते जर महायुतीकडून फॉर्म भरत असतील तर त्याचं अकाऊंटिंग झालं पाहिजे. पक्षाच्या बैठकीत निश्चितपणे यावर चर्चा देखील झाली पाहिजे. या गोष्टी अचानक होत नसतात त्या टप्प्याटप्प्यानं होत असतात. त्यामुळं पडद्यामागं काय घडतंय हे तपासण्याची यंत्रणा पक्षात असायला हवी.
अंधारे पुढे म्हणाल्या, कदाचित सचिन अहिर यांनी मला फोन करुन सांगायचं असेल पण २९ तारखेला आमचं भेटायचं ठरलं होतं पण मी भेटायला गेलेच नाही. त्या भेटीत त्यांना एकनाथ शिंदेंकडं जायचं किंवा नाही हे त्यांना मला सांगायचं होतं किंवा नाही याची मला कल्पना नाही. पण माझ्याबाबतीत बोलायचं झाल्यास मी इथंच आहे. काल तुम्ही मला फोन करत होतात तेव्हा मी आपले फोन कट करत होते कारण मी मातोश्रीवर होते.
पुण्यातील पदाधिकाऱ्यांची मुंबईत बैठक बोलावली होती. आम्ही सगळे तिकडे होतो, काल संपूर्ण दिवस मी पक्ष प्रमुखांच्या संपर्कात होते. पण आता अडचण अशी आहे की, इतके सगळे विश्वासून बिनीचे शिलेदार अशा पद्धतीनं दिसत आहेत की कुणावरही शंका येणं हे स्वाभाविक आहे. तासाभरापूर्वी जर आपला विश्वासू सहकारी अचानक तासाभरानंतर पक्षाच्या विरोधात जात असेल तर अशा प्रत्येक गोष्टीत ब्लँक अँड व्हाईट असण्याचं कारण नाही. त्यामध्ये ग्रे शेडही असू शकते, पण नेमकं काय घडलंय ते मात्र कळत नाही. आमदारांचं काय चाललंय हे आमदारांना माहिती की काय खरं काय खोटं? पण उद्धव ठाकरेंनी आमदारांची बैठक घेतली होती त्या बैठकीला सचिन भाऊ उपस्थित नव्हते.
जे गेलेत त्यांना ठाकरेंनी भरभरुन दिलं तरी ते गेले. त्यामुळं माणूस पारखायला चूक झाली असं समजण्याऐवजी मधली ग्रे शेड काही आहे का? कुठे ना कुठे काहीतरी मिसिंग आहे. हे मिसिंग शोधलं पाहिजे. निश्चितपणे ज्यांना ज्यांना दिलंय किंबहुना दिल्यामुळं त्यांची बार्गेनिंग पावर वाढली या जोरावरच त्यांनी आपापल्या जागा वेगळ्या पक्षात जाऊन काबिज केल्या आहेत. त्यामुळं ज्यांना कधीच काही मिळालं नाही ते शिवसैनिक आजही इथं लढत आहेत. त्यामुळं या शिवसैनिकांना संधी मिळाली पाहिजे.
कारण लोकसभा निवडणुकीवेळी नागेश आष्टीकरण यांना उमेदवारी दिली जाऊ नये असा माझा आग्रह होता. कारण हा माणूस कधीही फुटू शकतो. त्यामुळं फिल्डवरच्या कार्यकर्त्याला फिडबॅक घेतला गेला पाहिजे. कारण आम्ही आमच्या पद्धतीनं कितीही कष्ट केले आणि कितीही घागरीनं पाणी टाकायचं ठरवलं तर हौदच गळका असेल तर भरणार कसा. त्यामुळं मेंटेनन्सला या गोष्टी काढाव्या लागतील त्याची दुरुस्ती करावी लागेल, अशी भूमिका यावेळी सुषमा अंधारे यांनी मांडली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.