
Mumbai News : मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीची घोषणा लवकरच होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सर्वच पक्षाने मुंबई महापालिका निवडणूक जिंकण्यासाठी प्लॅनिंग सुरु केले आहे. या महापालिकेवर गेल्या 25 वर्षांपासून अधिककाळ एकसंध शिवसेनेचे वर्चस्व राहिले आहे. मात्र, शिवसेनेत फूट पडल्यापासून भाजपने आक्रमकपणे तयारी सुरु केली आहे.
हिंदी सक्तीच्या विरोधात ठाकरे बंधू एकत्र आले आहेत तर निवडणुकीसाठी एकत्रित येण्याची शक्यता आहे. त्यामुळे महापालिका निवडणूक चुरशीची होणार आहे. त्यातच आता उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे एक पाऊल पुढे टाकत वेगळे प्लँनिंग केले आहे. मुंबईतील विधानसभा मतदारसंघनिहाय या युवा नेत्यावर मोठी जबाबदारी सोपवली आहे.
मुंबई महानगरपालिका निवडणुकांच्या तयारीसाठी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या शिवसेनेची रणनीती ठरली आहे. त्या दृष्टीने संघटनानात्मक तयारी केली जात आहे. त्यातच काही दिवसांपूर्वी विधानसभा क्षेत्रांसाठी निरीक्षक नेमण्यात आले होते. आता ठाकरे गटाच्या युवासेनेनेही कंबर कसली आहे. मुंबईतील 11 विधानसभा मतदारसंघांत युवासेनेच्या निरीक्षकांची नेमणूक करण्यात आली आहे. या सर्व निरीक्षकांना स्थानिक पातळीवरच्या कामाचा आढावा घेण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या 11 विधानसभा मतदारसंघापैकी बहुतांश ठिकाणी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे व भाजप आमदारांचे मतदारसंघ आहेत.
येत्या काळात मुंबई महापालिका निवडणुकांच्या अनुषंगाने युवासेनेचे नवे निरीक्षक प्रत्येक मतदारसंघात जाऊन युवासेनेच्या कामकाजाची तपासणी करणार आहेत. महानगरपालिका निवडणुकीच्या तयारीसाठी युवासेनेच्या संघटनात्मक स्थिती कशी आहे, याबद्दलची माहिती मिळणार आहे. त्यासोबतच निरीक्षकांना मतदारसंघातील शाखांची आणि त्यांच्या पदाधिकाऱ्यांची माहिती जमा केली जाणार आहे. यामध्ये शाखा अधिकारी किती वर्षांपासून कार्यरत आहेत, त्यांच्या कामाचा अनुभव, आणि त्यांची वये यांसारख्या गोष्टींची माहिती घेतली जाणार आहे.
युवासेनेने नेमलेले निरीक्षक
दहिसर विधानसभा: संदीप वरखडे, सतीश नरसिंग
मागाठाणे विधानसभा: हेमंत दूधवडकर, इमरान शेख
चारकोप विधानसभा: मयूर कांबळे, संतोष धोत्रे
अनुशक्ती नगर विधानसभा: मुकेश कोळी, पोपट बेदरकर
शिवडी विधानसभा: गीतेश राऊत, विश्वास पाटेकर
दिंडोशी विधानसभा: प्रथमेश सकपाळ, जसप्रीत सिंग वडेरा
अंधेरी पूर्व: संकेत सावंत, निलेश गवळी
वांद्रे पूर्व: बाळा लोकरे, दुर्गेश वैद्य
विक्रोळी: अजिंक्य धात्रक, रितेश सावंत
चांदिवली: अजित गावडे, आदित्य महाडिक
निरीक्षक घेणार आढावा
महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर निरीक्षकांनी त्यांच्या दौऱ्यात कोणत्या गोष्टींचा आढावा घ्यायचा, याची एक विस्तृत यादी तयार करण्यात आली आहे. यात शाखा अधिकारी आणि गट अधिकारी त्यांच्या पदावर कधीपासून आहेत, त्यांची वये आणि इतर पदाधिकाऱ्यांची स्थिती तपासली जाईल. त्यासोबतच आवश्यक असल्यास नवीन पदाधिकाऱ्यांची नेमणूक करण्यासाठी शिफारसी केल्या जाणार आहेत.
बैठकीची घेतली जाणार माहिती
यासोबतच स्थानिक पातळीवर युवासेना आणि शिवसेना (Shivsena) यांच्यात योग्य समन्वय आहे की नाही, हे देखील तपासले जाईल. त्यासोबतच शाखा स्तरावर नियमित बैठका होतात का, शेवटची बैठक कधी झाली आणि एका महिन्यात किती वेळा बैठका होतात, याची माहिती घेतली जाईल.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.