

Private vehicle : खासगी कार, दुचाकी किंवा अन्य वाहनावर ‘पोलिस’ असे लिहून फिरणाऱ्यांनो सावधान! आता अशा वाहनधारकांची खैर नाही. पोलिस असल्याचा आभास निर्माण करण्यासाठी खासगी वाहनांवर पोलिस नाव, पाटी किंवा लोगोचा वापर करणाऱ्यांविरोधात राज्य पोलिस विभागाने कडक कारवाईचे आदेश दिले आहेत. नियम मोडणाऱ्यांना 500 रुपयांपासून 5,000 रुपयांपर्यंत दंड होऊ शकतो. एवढेच नाही, तर या नावाचा गैरवापर करून फसवणूक किंवा बेकायदेशीर कृत्य केल्यास थेट फौजदारी गुन्हाही दाखल केला जाणार आहे.
राज्याचे अपर पोलिस महासंचालक (वाहतूक) यांनी याबाबत राज्यातील सर्व जिल्हा पोलिस अधीक्षक आणि महामार्ग पोलिस अधीक्षकांना स्पष्ट निर्देश दिले आहेत. खासगी वाहनांवर ‘पोलिस’ नाव किंवा पोलिसांचा लोगो लावून फिरणाऱ्यांविरोधात राज्यभर धडक मोहीम राबवण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.
गेल्या काही दिवसांत राज्यातील विविध भागांमध्ये अशा वाहनांचा गैरवापर वाढल्याचे समोर आले आहे. विशेषतः टोल नाक्यावर टोल चुकवणे, नाकाबंदीच्या ठिकाणी पोलिसांची दिशाभूल करणे, अवैध प्रवासी किंवा मालवाहतूक करणे आणि बेकायदेशीर कामांसाठी पोलिस नावाचा धाक दाखवणे, असे प्रकार आढळून आले आहेत. बीज जिल्हातही अशा घटनांमध्ये वाढ झाल्याची माहिती समोर आली आहे.
पोलिस दलातील अधिकारी किंवा कर्मचाऱ्यांच्या मुलांकडून, नातेवाईकांकडून किंवा ओळखीच्या व्यक्तींकडूनही खासगी वाहनांवर ‘पोलिस’ पाटी लावली जात असल्याचे निदर्शनास आले आहे. नाकाबंदी किंवा रात्रीच्या गस्तीवेळी अशा वाहनांची तपासणी टाळली जाते, याचा फायदा काही जण घेत असल्याचे प्रशासनाच्या निदर्शनास आले आहे.
नियमांचे उल्लंघन केल्यास संबंधित वाहनधारकावर मोटार वाहन कायद्यानुसार 500 ते 5,000 रुपयांपर्यंत दंड होऊ शकतो. तर ‘पोलिस’ नावाचा वापर करून सामान्य नागरिकांवर दबाव टाकणे, फसवणूक करणे किंवा कोणतेही बेकायदेशीर कृत्य करणे आढळल्यास भारतीय न्याय संहितेनुसार फौजदारी कारवाई केली जाणार आहे. त्यामुळे खासगी वाहनावर पोलिस नाव किंवा लोगो लावून रुबाब मिरवणाऱ्यांसाठी हा निर्णय मोठा इशारा मानला जात आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.