

Maharashtra Politics : महिला बालविकास मंत्री अदिती तटकरे यांचे खाजगी सचिव राजेश गायकवाड यांच्यावर काही गंभीर आरोप करण्यात आले आहेत. महिला व बालविकास राज्यपत्रित अधिकारी संघटनेने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे लेखी तक्रार दाखल करत गायकवाड यांच्याविरोधात गंभीर आरोप केले आहेत.
या तक्रारीत गायकवाड यांनी आपल्या पदाचा गैरवापर केल्याचं म्हटलं आहे. गायकवाड यांनी महिला अधिकाऱ्यांना अपमानास्पद वागणूक दिली. त्यांच्याशी बोलताना अश्लील आणि घाणेरड्या भाषेचा वापर केला तसेच अधिकाऱ्यांना मानसिक त्रास दिल्याचा आरोप करण्यात आला आहे.
याप्रकरणात आता राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे यांनी उडी घेतली आहे. याप्रकरणावरुन रोहिणी खडसे यांनी थेट आदिती तटकरे यांना काही सवाल केले आहेत. त्यांनी यासंदर्भात एक्स पोस्ट केली आहे.
महिला बालविकास मंत्री आदिती तटकरे यांचा खाजगी सचिव राजेश गायकवाड यांच्याबाबत अनेक तक्रारी समोर आल्या आहेत. जळगाव जिल्हा महिला आणि बालविकास अधिकारी यांनी @CMOMaharashtra यांच्याकडे लेखी तक्रारही केली आहे. राजेश गायकवाड हा महिला अधिकाऱ्यांना अश्लील भाषेत बोलतो, नोकरीवरून काढण्याच्या धमक्या देतो. इतकेच नाही तर मोठमोठ्या रकमा घेऊन बदल्यांचे रॅकेटही हा गायकवाड चालवतोय.
महिला व बालविकास सारख्या संवेदनशील विभागात असा प्रकार घडत असेल तर हा प्रकार धक्कादायक तसेच निंदनीय आहे. गायकवाड हा २०१९ सालापासून खासगी सचिव म्हणून या विभागात कार्यरत आहे, अनेक महिलांनी अनेकदा त्याच्या तक्रारी केल्या आहेत. पण मंत्री आदिती तटकरे यांनी अद्यापही त्याच्यावर कोणतीही कारवाई केली नाही. प्रश्न आहे का ? अदिती तटकरे यांचा या गायकवाडला वरदहस्त आहे का ? अदिती तटकरे यांचे या गायकवाड सोबत काही आर्थिक लागेबांधे आहेत का ? याचे उत्तर मिळाले पाहिजे असे रोहिणी खडसे यांनी म्हटले आहे.
दरम्यान यासंदर्भात स्पष्टीकरण देताना, राजेश गायकवाड यांनी आपल्यावरील आरोप फेटाळले आहेत. सदर तक्रार पूर्णपणे निराधार, तथ्यहीन आणि चुकीच्या उद्देशाने प्रेरित असल्याचे त्यांनी म्हटले आहे. विभागांतर्गत झालेल्या काही प्रशासकीय आणि धोरणात्मक बदल्यांनंतर, केवळ वैयक्तिक हितसंबंध दुखावल्या गेल्यामुळे काही घटकांकडून जाणीवपूर्वक अशा स्वरूपाच्या खोट्या आणि संभ्रम निर्माण करणाऱ्या तक्रारी विविध माध्यमांतून केल्या जात आहेत. प्रशासकीय पारदर्शकता आणि नियमांनुसार सुरू असलेल्या प्रक्रियेला विनाकारण बदनाम करण्याचा हा प्रयत्न आहे. या पत्रात किंवा तक्रारीत कोणताही ठोस आधार नसल्याचं राजेश गायकवाड यांनी म्हटलं आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.