Advay Hire News: शिवसेना उपनेते डॉ अद्वय हिरे यांना मुंबई उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला. त्यामुळे मालेगाव बाह्य मतदारसंघातील विधानसभा निवडणुकीच्या हालचाली एकदम गतिमान झाले आहेत.
शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे आगामी विधानसभा निवडणुकीसाठी मालेगाव बाह्य मतदार संघात धोरण ठरले आहे. या मतदारसंघात आता शिवसेना मुख्यमंत्री शिंदे गटाचे दादा भुसे हे महायुतीचे उमेदवार असतील. शिवसेना ठाकरे गटाचे उपनेते अद्वय हिरे मंत्री भुसे यांना आव्हान देतील.
पालकमंत्री दादा भुसे यांचे जुने सहकारी बारा बलुतेदार संघटनेचे नेते बंडू काका बच्छाव यांनी आगामी विधानसभा निवडणुकीची तयारी गेले सहा महिने सुरू केली आहे. अपक्ष उमेदवारीचा देखील त्यांचा संकल्प आहे. त्यामुळे आता या मतदारसंघात तिरंगी लढत होणार का? हा उत्सुकतेचा विषय आहे.
नव्या राजकीय घडामोडी बंडूकाका बच्छाव यांचे राजकारण विस्कटणार आहेत. शिवसेना उपनेते डॉ अद्वय हिरे यांच्या विरोधात पालकमंत्री भुसे यांनी दाखल केलेल्या खटल्यांमुळे हिरे यांना जेलमध्ये जावे लागले होते. नऊ महिन्यानंतर त्यांना जामीन मिळाला आहे. जामिनावर बाहेर येताच त्यांनी पालकमंत्री भुसे यांना थेट आव्हान दिले आहे.
डॉ हिरे यांनी काल शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची मुंबईत भेट घेतली. यावेळी शिवसेनेचे विविध नेते उपस्थित होते. मालेगाव बाह्य मतदारसंघातून डॉ हिरे हेच शिवसेना ठाकरे पक्षाचे उमेदवार असणार यावर आता जवळपास शिक्कामोर्तब झाले. त्यामुळे हिरे देखील अतिशय उत्साहाने कामाला लागले आहेत.
मालेगाव बाह्य मतदारसंघात गद्दारीचा शिक्का पुसून टाकण्यासाठी निवडणुकीत उतरणार आहोत, असे सांगत हिरे यांनी पालकमंत्री दादा भुसे यांना थेट गद्दार असे म्हटले आहे. त्यामुळे येत्या निवडणुकीत गद्दार विरुद्ध खुद्दार असा प्रचार रंगणारआहे.
या मतदारसंघातील मतदार भ्रष्ट आणि सत्तेचा दुरुपयोग करणाऱ्या लोकांना बाजूला करतील. फक्त गद्दारीचा शिक्का पुसणे एवढेच नव्हे तर मालेगाव बाह्य मतदार संघातून निवडणूक जिंकणारच. शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना पुन्हा एकदा मुख्यमंत्री करण्याचा आमचा संकल्प आहे, असा दावा त्यांनी केला.
सर्व कार्यकर्ते आणि पदाधिकारी पूर्ण ताकतीनिशी मैदानात उतरले आहेत. आपल्यावर राजकीय कटकारस्थान करून गुन्हा दाखल करण्यात आला. त्यात सरकारी अधिकाऱ्यांनी देखील पदाचा दुरुपयोग केला. याबाबत मतदारांमध्ये जाऊन सत्यस्थिती मांडणार असल्याचे हिरे म्हणाले. त्यामुळे निवडणुकीची घोषणा होण्या आधीच मालेगाव बाह्य मतदारसंघात हिरे आणि पालकमंत्री दादा भुसे दोघांचाही प्रचार सुरू झाला आहे.
पक्षप्रमुख ठाकरे आणि सौ रश्मी ठाकरे यांच्याशी यावेळी चर्चा झाली. ठाकरे यांनी हिरे यांना पूर्ण पाठिंबा व्यक्त करीत झालेल्या राजकीय आणि कायदेशीर खटल्यांच्या ससेमिऱ्यामुळे त्रासाविषयी या नेत्यांनी सहानुभूती व्यक्त केली. यावेळी शिवसेना पक्ष नेते खासदार संजय राऊत, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, सुभाष देसाई, मिलिंद नार्वेकर, सचिन अहिर, प्रसाद खैरनार आदी उपस्थित होते.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.