

Ahilyanagar political clash : अहिल्यानगर महापालिकेची निवडणूक प्रभाग क्रमांक 15 मुळे लक्षवेधी ठरू लागली आहे. इथं भाजपविरुद्ध एकनाथ शिंदे शिवसेनेत फाइट रंगली आहे. दोन दिवसापूर्वी एकनाथ शिंदे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख तथा उमेदवार यांच्या घरावर निवडणूक यंत्रणेने हवाला पैसा आल्याच्या संशयावर छापा घातला.
यानंतर आता याच प्रभागात भाजप अन् एकनाथ शिंदे शिवसेनेचे उमेदवारांच्या कार्यकर्त्यांमध्ये तुंबळ हणामारी झाली. यात धारदार शस्त्रांचा वापर झाला. पाच गंभीर जखमी झाले आहेत. विशेष म्हणजे, उमेदवार एकमेकांचे नातेवाईक आहेत. त्यामुळे ही निवडणूक नेमकी कोणत्या दिशेला चालली आहे, यावरून जिल्ह्यात चर्चा रंगली आहे.
महापालिकेच्या निवडणुकीसाठी मतदानाला काही तास राहिले आहेत. यामुळे उमेदवारांच्या धाकधूक वाढली असून, झोप उडाली आहे. मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी छुप्या प्रचार सुरू असतानाच, यातून राजकीय तणाव वाढला आहे. प्रभाग 15 मध्ये भाजप (BJP) अन् एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत थेट लढत आहे. या प्रभागात पुतणी अन् काकामध्ये लढत आहे. पैशांचे वाटप अन् एकमेकांमध्ये बघण्यावरून या काका-पुतणीच्या कार्यकर्त्यांमध्ये तुंबळ हणामारी झाली.
या हाणामारीत, धारदार शस्त्राचा वापर झाला. यात एका महिलेसह पाच जण गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सिद्धांत देवकर, आर्यन एकाडे, स्वाती विजय गाडळकर, अभिजित दळवी आणि हिमांशु जाधव हे जखमी असल्याचे समजते. इतर काही कार्यकर्तेही किरकोळ जखमी झाले आहे.
या प्रभागातील एकनाथ शिंदे (Eknath Shinde) शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अनिल शिंदे यांच्या घरावर निवडणूक यंत्रणेच्या पथकाने पोलिसांच्या मोठ्या फौजफाट्यासह हवाला पैसा आल्याच्या संशयावरून छापा घातला होता. याचा धक्का बसल्याने अनिल शिंदे यांची प्रकृती खालवली. यातून त्यांना रुग्णालयात कृत्रिम श्वासोच्छवास यंत्रणेवर ठेवून उपचार सुरू आहेत. यानंतर लगेच अनिल शिंदेबरोबर पॅनलमध्ये असलेले उमेदवार आणि भाजपचे उमेदवार यांच्या कार्यकर्त्यांमध्या चांगलाच राडा झाला.
याप्रकरणी कोतवाली पोलिसांनी गुन्ह्याची नोंद घेतली आहे. दरम्यान, जखमींची भाजपचे माजी खासदार सुजय विखे पाटील यांनी भेट घेतली. विखे म्हणाले, "भाजप उमेदवार दत्ता गाडळकर यांच्या कुटुंबियांवर प्राणघातक हल्ला करण्यात आला. तसंच दिवंगत माजी खासदार दिलीप गांधी यांच्या सुनबाई दिप्ती गांधी यांचे पती सुवेंद्र गांधी यांचे वाहन फोडण्यात आले. पोलिसांना विनंती आहे की, हे आवरा, नाहीतर आम्हाला आमच्यापद्धतीने हाताळावा लागेल. कायदा-प्रशासनाला मानतो. त्यांनी निवडणूक शांततेपणे पार पाडावी. सर्व पक्षांना आवाहन आहे की, निवडणूक निवडणुकीच्या पद्धतीने होऊ द्या. काल चार जणांना अटक केली. त्यातील एक जण आष्टीचा गुंड होता. बाहेरून जिल्ह्यातून गुंड आणून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केल्यास, आम्ही जशास तसं उत्तर देऊ."
खासदार नीलेश लंके यांनी शहरातील निवडणुकीत सुरू असलेल्या राजकीय राड्यावरून प्रतिक्रिया देताना म्हटले की, "पिक्चरसारखं इथं खाकीमधला गुंडाराज सुरू आहे. शहर पोलिस उपअधीक्षक यांच्याअख्यारीत हा कारभार सुरू आहे. कालच्या राड्यात एकाच्या डोक्यातून रक्त वाहत होते. दुसऱ्या मुलाच्या पोटात चाकू लागला. रात्री दहा वाजल्यापासून ते सकाळपर्यंत कोणत्याही गुन्ह्याची नोंद नव्हती. नंतर केला, तर अतिशय नाॅर्लम केसेस दाखल झाल्या आहेत. रुग्णालयाने गंभीर जखमीचे अहवाल दिला. पण स्थानिक पोलिसांनी तो देखील घेतला नाही." पोलिस अधीक्षकांशी बोललो, त्यानंतर जखमींचा देखील आम्हीच अहवाल पाठवला. गृहमंत्र्यांना त्यांच्या पक्षाचं पडलं आहे. त्यांच्याकडून मदत मिळणार नाही. आम्ही सर्व पुरावे आयजींना देणार आहोत. यानंतर दोन दिवसात आंदोलन देखील छेडणार आहोत, असेही नीलेश लंके यांनी सांगितले.
एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे प्रवक्ते संजीव भोर म्हणाले, "या राड्यानंतर आमच्या उमेदवाराच्या कुटुंबियांविरोधात कोतवाली पोलिसांनी तत्काळ गुन्ह्याची नोंद घेतली. जेवढे गंभीर कलम लावता येतील, ती लावली. आमच्या उमेदवाराकडून असलेल्या फिर्यादी अभिजीत दळवी यांच्यावर तीक्ष्ण हत्याराने वार झाले आहे. त्याने दिलेल्या फिर्यादीत समोरच्याविरोधात एकही गंभीर कलम लावलं नाही." इथले पोलिस प्रशासन काही लोकांचं रखेल असल्यासारखं वागत आहे. शहराचा बिहार नाही, तर पुढं गेलं आहे. कोतवाली पोलिस ठाणे काही नेत्यांनी विकत घेतलं आहे का? असा गंभीर सवाल केला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.