

Nashik Crime : महिला लैगिंक शोषण प्रकरणात अटकेत असलेल्या नाशिकच्या भोंदू अशोक खरात प्रकरणाला आता नवं वळण मिळण्याची शक्यता आहे. गेल्या वर्षी नाशिकमधील कथित ‘हनी ट्रॅप’ प्रकरणात जे हॉटेल चर्चेत आलं होतं त्याच अलिशान हॉटेलशी भोंदू खरातचे कनेक्शन असल्याची माहिती पुढे आली आहे.
नाशिक शहरातील तिडके कॉलनी येथे असलेल्या या आलिशान हॉटेलचे मालक शैलेश कुटे यांची SIT ने तब्बल सहा तास कसून चौकशी केली. कुटे यांच्या हॉटेलमध्ये अशोक खरात पीडित महिलांना घेऊन जात असे, अशा तक्रारींचा SIT कडून तपास केला जात आहे.
अशोक खरात सध्या पोलिस कोठडीत असून त्याच्या विरोधातील एकूण ९ गुन्ह्यांचा तपास सध्या एसआयटीकडून सुरू आहे. दरम्यान हॉटेलमालक शैलेश कुटे आणि खरात यांच्यातील संपर्काबाबत एसआयटीला एक लिखित तक्रार अर्ज प्राप्त झाला होता. त्यामध्ये गंभीर आरोप नमूद करण्यात आले होते. याच पार्श्वभूमीवर कुटे यांना चौकशीसाठी बोलावण्यात आलं होतं.
कुटे यांचे तिडके कॉलनीतील हेच हॉटेल मागील वर्षी कथित ‘हनी ट्रॅप’ प्रकरणामुळे चर्चेत आले होते. या प्रकरणाचे पडसाद राज्याच्या अधिवेशनातही उमटले होते. राज्यातील तब्बल 72 आजी-माजी अधिकारी, राजकीय नेते तसेच मंत्रिमंडळातील काही मंत्री यांना हनीट्रॅपच्या जाळ्यात अडकविण्याचा प्रयत्न झाल्याचे उघड झाल्यानंतर सोशल मीडिया व इतर प्रसार माध्यमांमध्ये यावर बरीच चर्चा झाली होती.
मात्र, त्या वेळी कोणताही गुन्हा दाखल झाला नव्हता. त्या घटनेनंतर हॉटेल व्यावसायिक काही काळ शहरातून गायब होते. आता पुन्हा खरात प्रकरणामुळे हेच हॉटेल आणि त्याचे मालक चर्चेत आले आहे.
कुटे यांच्या तिडके कॉलनीतील या आलिशान हॉटेलमध्ये अशोक खरात मुक्कामाला राहत असल्याची माहिती तपासात समोर आली आहे. त्यामुळे भोंदू खरातकडून पीडित महिलांना त्या ठिकाणी नेले जात होते का, त्याठिकाणी काही गैरकृत्ये घडली का याचा तपास एसआयटीकडून केला जात आहे.
दरम्यान, लैगिंक शोषणच नव्हे तर खरातने लोकांची फसवणूक करुन कोट्यावधींची मालमत्ता जमवली आहे. या व्यवहारांमध्ये कुटे यांचा काही सहभाग आहे का, याचाही तपास केला जात आहे. कारण कुटे हे राजकीय क्षेत्राशी संबंधित आहे. तसेच शिर्डी साई संस्थानचे माजी अध्यक्ष राहिले आहेत. ते रिअल इस्टेट व्यवसायातही सक्रिय असल्याने, खरातच्या कथित गैरव्यवहारांमध्ये त्यांचा काही संबंध आहे का, याचाही तपास सुरू आहे. दरम्यान कुटे व खरात या दोघांमधील संवाद आणि चॅटिंगचे तपशीलही तपासले जात असल्याची माहिती आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.