

Maharashtra Legislative Council news : विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांनी, त्यांच्या मतदारसंघातील एका कार्यक्रमात जोरदार टोलेबाजी केली. 'ज्याच्यासंदर्भात हक्कभंग झाला, तोच व्यक्ती शिक्षा द्यायला, हे शंभर वर्षांच्या इतिहासात विधान परिषदेत पहिल्यांदा झालं आहे, असे सांगताना महाराष्ट्रातील सर्व पक्ष चालवण्याची जबाबदारी माझी आहे. त्यामुळे उजव्या अन् डाव्या बाजूला, दोन्हीकडे बघावं लागतं,' अशीही प्रा. राम शिंदे यांनी टिप्पणी केली.
प्रा. राम शिंदे यांनी राज्यातील सर्व पक्ष चालवण्याबाबत केलेली टिप्पणी, सभागृहापर्यंत ठीक असली, तरी ती महाराष्ट्राच्या अनुषंगाने केलेली अतिशयोक्ति ठरणारी असून, त्यावर विरोधकांकडून पलटवार होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
सभापती प्रा. राम शिंदे (Ram Shinde) मतदारसंघातील एका कार्यक्रमात सहभागी झाले होते. त्यावेळी त्यांनी मतदारसंघातील राजकारणावर भाष्य करताना, तसंच सभागृहातील कामकाज कसं चालतं हे सांगताना, राज्यातील सर्व पक्ष मीच चालवतो, असं विधान केल्यानं प्रा. राम शिंदे यांची ही टिप्पणी चर्चेत आली आहे.
विधान परिषदेच्या सभापती पदावर अन् सदस्यांवर, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (NCP) शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांचे कट्टर कार्यकर्ते सूर्यकांत मोरे यांनी, गंभीर टिप्पणी केली होती. या प्रकरणात पुढे हक्कभंग, शिक्षा, शिक्षेला माफी, असं बरचं काही घडलं. पण यावरून बेरजेचं राजकारण अन् राज्यांतील पक्षाचा कारभार मीच चालवतोय, अशी जोरदार टोलेबाजी सभापती प्रा. राम शिंदे यांनी या कार्यक्रमात केली.
प्रा. राम शिंदे म्हणाले, "पद हे शोभेची वस्तू असते, असे समजण्याचं काहीच कारण नाही. पण पद मिळाल्यानंतर, लोकांच्या कामाला आपण उत्तरदायित्व असतं अन् कामातून ते मिळू शकतं. सर्व पक्ष असल्यामुळे, काही गोष्टी बोलण्यास मर्यादा येतात. कारण की सर्व पक्ष चालवण्याची जबाबदारी माझ्यावर आहे."
'महाराष्ट्रातील सर्व पक्ष चालवण्याची जबाबदारी माझी आहे. त्यामुळे उजव्या अन् डाव्या बाजूला, दोन्हीकडे बघावं लागतं. कोणाचाही आक्रोश होणार नाही, कोणाचाही मानसन्मान कमी होणार नाही. सार्वभौम सभागृह लोकशाहीपद्धतीने, राज्यघटना अन् लोकशाहीने सर्वांचा मानसन्मान ठेवावा लागतो,' असे प्रा. राम शिंदे यांनी म्हटलं.
मतदारसंघातील सूर्यकांत मोरे यांच्याविरोधात दाखल हक्कभंगावर बोलताना, प्रा. राम शिंदे यांनी, "राजकारणात सातत्याने बेरजेचं राजकारण करावं लागतं. बेरजेच्या राजकारणात अनेक गोष्टी घडतात. यात माझा राजकीय आलेख चढताच राहिला आहे."
'हक्कभंग प्रस्तावावर विशेषाधिकार समितीने शिक्षा ठोठावली. शंभर वर्षाच्या इतिहासात, विधान परिषदेत, ज्याच्या संदर्भात हक्कभंग झाला, तोच व्यक्ती शिक्षा द्यायला आहे, हे शंभर वर्षात पहिल्यांदा झालं. प्रस्ताव समोर आल्यानंतर शिक्षा असताना देखील माफ केलं अन् सोडून दिलं. शिक्षा केल्यानं माणसं सुधारत नाहीत, अशीही टिप्पणी प्रा. राम शिंदे यांनी केली.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.