चोपडा : प्रेमप्रकरणातून (Love Affaire) सख्या भावाने (Brother) बहिणीची गळा आवळून तर तिच्या प्रियकराची गोळी झाडून हत्या केल्याची धक्कादायक घटना शहरात उघडकीस आली असून, पुन्हा ‘सैराट’ची प्रचिती देणाऱ्या या ‘ऑनर किलिंग’ घटनेने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. सख्खे व चुलत अशा पाच भावंडांकडून ही हत्या करण्यात आल्याची प्राथमिक माहिती समोर आली असून, यातील तरुणीचा १७ वर्षीय अल्पवयीन भाऊ स्वतः गावठी कट्ट्यासह शहर पोलिस ठाण्यात (Police station) हजर होऊन त्याने घटनेची माहिती पोलिसांना दिली. यातील पाचही संशयिताना शहर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. (Police arrested all five suspects honor killing)
जळगाव जिल्ह्याला हादरून टाकणारी ही घटना चोपडा शहरापासून अवघ्या काही किलोमीटर अंतरावर वराड येथे घडली.
वराड रस्त्यावरील नाल्यात शुक्रवारी रात्री दहाच्या सुमारास घडली. यात प्रेमप्रकरणातून वर्षा समाधान कोळी (वय २०, रा. पुंडलिकनगर, चोपडा), राकेश संजय राजपूत (वय २२, रा. रामपुरा, चोपडा) यांची हत्या करण्यात आली. राकेश राजपूत हा वर्षा कोळी हिच्या शहरातील पुंडलीकनगर येथील घरी गेला होता. तिथे राकेश व वर्षा हिच्या भावंडांमध्ये वाद झाला. राकेश वारंवार घरी येतो, यामुळे आपल्या घराची समाजात बदनामी होते, या रागातून भाऊ, बहिणीत वाद झाला.
त्यानंतर भावाने राकेश व वर्षाला घेऊन करण ऊर्फ कुणाल समाधान कोळी (वय १७, पुंडलिकनगर, चोपडा), नीलेश समाधान कोळी (वय १५, पुंडलिकनगर,चोपडा), भरत संजय रायसिंग (२१, रा सुंदरगढी, चोपडा), तुषार आनंदा कोळी (२३, रा. माचले, ता. चोपडा), बंटी ऊर्फ जय शांताराम कोळी (१९, रा. बोरोलेनगर, चोपडा) यांनी मोटारसायकलवरून शहरातील चिंच चौकाकडून जुन्या वराड रस्त्याकडे नेले. तिथे पुन्हा बाचाबाची झाली.
त्यानंतर राकेशने रस्त्याकडेला असलेल्या नाल्याकडे पळ काढला. तिथे राकेशला गाठत संशयित कुणाल कोळी व तुषार कोळी याने गावठी कट्ट्यातून राकेशवर गोळी झाडत हत्या केली तर वर्षा हिचा रुमालाने गळफास देत खून केला.
यानंतर कुणाल कोळी याने स्वतः शहर पोलिस ठाण्यात हजर होऊन घटनेची माहिती दिली. त्यानंतर चोपडा उपविभागीय पोलिस अधिकारी ऋषिकेश रावले, पोलिस निरीक्षक अवतारसिंग चव्हाण, उपनिरीक्षक घनश्याम तांबे, पोलिस ताफ्यासह घटनास्थळी दाखल होत तपासाचे चक्र फिरवली.
त्यानंतर अवघ्या १२ तासांत घटनेतील नीलेश कोळी, भरत रायसिंग, तुषार कोळी, बंटी ऊर्फ जय कोळी यांना ताब्यात घेतले. वरील पाचही जणांवर कुणाल कोळी याच्या माहितीवरून खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उपविभागीय पोलिस अधिकारी ऋषिकेश रावले पुढील तपास करीत आहेत.
वर्षाची अंत्ययात्रा बंदोबस्तात
मृत वर्षाचे चोपडा उपजिल्हा रुग्णालयात मोठ्या पोलिस बंदोबस्तात विच्छेदन करण्यात आले. त्यानंतर तिच्या राहत्या घरी दुपारी बाराला तिचा मृतदेह नेण्यात आला. या वेळी वर्षाच्या आईसह नातेवाइकांनी हंबरडा फोडला होता. तिथून स्मशानभूमीत पोलिस फौजफाट्यात अंत्यविधी करण्यात आला. अंत्ययात्रेदरम्यान नागरिकांनी ठिकठिकाणी गर्दी केल्याचे दिसून आले. प्रियकर राकेश राजपूतचे शव धुळे येथील वैद्यकीय महाविद्यालयात फॉरेन्सिक लॅबकडे पाठविण्यात आले आहे.
फॉरेन्सिक टीम घटनास्थळी
जळगाव येथील फॉरेन्सिक टीम व श्वानपथक रात्री दोनला घटनास्थळी दाखल झाली. या वेळी तपासात टीमला घटनेबद्दल भक्कम पुरावे मिळाले आहेत. रात्रीच चाळीसगाव विभागाचे अप्पर पोलिस अधीक्षक रमेश चोपडे यांनी घटनास्थळी धाव घेत घटना जाणून घेतली.
---
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.