Bhujbal Vs Godse: शिवसेना एकनाथ शिंदे पक्ष आज अचानक आक्रमक झाला. त्यांनी मंत्री छगन भुजबळ यांच्यावर थेट आणि बेछुट आरोप केले. त्यामुळे अनेकांना आश्चर्य वाटले आहे. अचानक झालेल्या या राजकीय आरोप-प्रत्यारोपांच्या मुळाशी कोणते कनेक्शन आहे?
शिवसेना शिंदे पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनाही गेले अनेक दिवस मौनात असलेल्या माजी खासदार हेमंत गोडसे यांचे आक्रमक रूप आश्चर्यकारक वाटले आहे. याबाबत महायुतीच्या अनेक नेत्यांनी आश्चर्य व्यक्त केले आहे.
आज देवळाली मतदारसंघात शिंदे पक्षाचा मेळावा झाला. यावेळी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी अचानक नांदगाव मतदार संघातील माजी खासदार समीर भुजबळ यांच्या बंडखोरीवर आक्षेप घेतला. वस्तुतः माजी खासदार भुजबळ हे राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे नेते होते.
या पक्षाने त्यांना पद दिले. माजी खासदार भुजबळ यांनी त्या सर्व पदांचा राजीनामा दिला. त्यानंतर नांदगाव विधानसभा मतदारसंघात आपली अपक्ष उमेदवारी केली आहे. यावर माजी खासदार गोडसे यांनी घेतलेला आक्षेप अनेकांना अनाठायी वाटतो. राष्ट्रवादी काँग्रेसचे भुजबळांवर एव्हढे प्रेम का? असा गोडसे यांचा आक्षेप आहे.
देवळाली येथे झालेल्या बैठकीत आणि तेथील विषय प्रामुख्याने देवळाली मतदारसंघाबाबत होता. या मतदारसंघात महायुतीच्या जागा वाटपात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाला तो सोडण्यात आला आहे. ते नैसर्गिक राजकारण देखील आहे. विद्यमान आमदार म्हणून सरोज अहिरे यांना येथे उमेदवारी जाहीर करण्यात आली.
आमदार अहिरे यांनी प्रचार देखील सुरू केला आहे. असे असताना उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी राजश्री अहिरराव यांना शिवसेना शिंदे गटाने उमेदवारी दिली. राजश्री अहिरराव यांचा शिवसेना शिंदे पक्षाचा काडीचाही संबंध नाही.
श्रीमती अहिरराव या भारतीय जनता पक्षात होत्या. त्याचे कारण तो पक्ष सत्ताधारी होता, हे वेगळे सांगण्याची आवश्यकता नाही. गेली अनेक दिवस त्या उमेदवारीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष आणि अनेक नेत्यांच्या संपर्कात होत्या.
श्रीमती अहिरराव यांचे एकमेव उद्दीष्ट देवळाली मतदारसंघाची उमेदवारी एवढेच होते. उमेदवारी कोणत्याही पक्षाचीचालेल मात्र त्यासाठी त्या भाजप सोडायला तयार नव्हत्या. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने त्यांचा विचार केला नाही.
असे असताना उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी शिवसेना शिंदे पक्षाने कोणत्या धोरणाने आणि काय विचाराने अहिरराव यांना उमेदवारी दिली, याचेच अनेकांना आश्चर्य वाटते. मुळात श्रीमती अहिरराव या देवळालीशी संबंधित नाहीत. त्या धुळे जिल्ह्याच्या आहेत.
मात्र आज याच श्रीमती अहिरराव यांच्या निमित्ताने माजी खासदार गोडसे यांनी थेट मंत्री भुजबळ यांच्यावर शरसंधान केले आहे. यातील राजकारण काय? असा प्रश्न पडतो. यामध्ये अप्रत्यक्षरीत्या नांदगाव मतदार संघात शिवसेना शिंदे गटाचे आमदार सुहास कांदे हे उमेदवार आहेत, हे त्याचे कनेक्शन आहे.
शिवसेना शिंदे गटाचे जिल्ह्यात पालकमंत्री दादा भुसे आणि आमदार कांदे हे अवघे दोन उमेदवार आहेत. त्यातील एक जागा माजी खासदार भुजबळ यांच्या उमेदवारीमुळे अडचणीत आल्याने तर हा संताप देवळाली मतदारसंघाच्या महायुतीच्या उमेदवाराबाबत व्यक्त झाला नाही ना? अशी चर्चा आहे.
माजी खासदार गोडसे यांनी छगन भुजबळ यांच्यावरील टीका प्रामुख्याने नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने केली आहे. या निवडणुकीत खासदार गोडसे यांना पराभव स्वीकारावा लागला होता. त्यात त्यांची उमेदवारी जाहीर करण्यास विलंब झाल्याने पराभव झाला, असे अनेकांना वाटते. वस्तुतः महायुतीच्या अंतर्गत राजकारणातून उमेदवारी जाहीर करणयास झालेला विलंब हा त्यांच्यावर अन्यायच होता.
त्यांची उमेदवारी खूप आधीच खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांनी जाहीर केली होती. खासदार शिंदे यांच्या निर्णयाला खोडा कोणी घातला? हा चर्चेचा आणि चिंतनाचा विषय आहे. मुख्यमंत्री शिंदे आपल्या विद्यमान खासदाराची जागा सहकारी पक्षाला मंत्री छगन भुजबळ यांच्यासाठी सोडणार होते, हे देखील लपून राहिलेले नाही. यात माजी खासदार गोडसे यांच्यावर तो देखील अन्यायच झाला असता.
----
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.