

Nashik Guardian Minister : नाशिकच्या पालकमंत्रीपदाचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आला आहे. शहरातील रस्त्यांवरील खड्ड्यांच्या प्रश्नावरून राष्ट्रवादी युवक काँग्रेसने आक्रमक भूमिका घेत मंत्री छगन भुजबळ यांना पालकमंत्री करुन नाशिक खड्डेमुक्त करा अशा मागणीचे बॅनर शहरभर लावले. मुख्यमंत्री फडणवीसांकडे बॅनरद्वारे कार्यकर्त्यांनी तशी मागणी केली.
परंतु स्वत: भुजबळांनी यावर नाराजी व्यक्त करत हे बॅनर काढून घेण्याचे आदेश कार्यकर्त्यांना दिल्याने भुजबळांनी पालकमंत्रीपदाच्या रेसमधून माघार घेतल्याचे दिसत आहे.
नाशिकमध्ये रस्त्यांची समस्या निर्माण झाली आहे. खड्डयांमुळे चार ते पाच लोकांचा मृत्यू झाला आहे. म्हणून नाशिकबद्दल यासंदर्भात बरच काही बोललं जात आहे. याचा अर्थ मला पालकमंत्री करा असा होत नाही. तर व्यवस्थित काम करुन घेणं हा मुद्दा आहे. मला पालकमंत्री करा असे ज्यांनी फ्लेक्स लावले, त्यांच्यापर्यंत मी माझी नापसंती व्यक्त केली असून माझ्या नावाचे फ्लेक्स काढायला लावल्याचं भुजबळांनी माध्यमांशी बोलताना स्पष्ट केलं.
नाशिक जिल्ह्यात कुंभमेळामंत्री म्हणून गिरीश महाजन सध्या काम बघत आहे. मात्र, पालकमंत्रीपद आजूनही रिक्त आहे. भुजबळही सुरुवातीपासून पालकमंत्रीपदाच्या रेसमध्ये होते. भुजबळांनी मला पालकमंत्री पद द्यायचं असेल तर ते नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री पद द्यावं, अशी आग्रही भूमिका घेतली होती. त्यासाठी त्यांनी इतर जिल्ह्याचे पालकत्व स्विकारले नाही.
दरम्यान, राज्यात फडणवीस सरकार स्थापन झाल्यानंतर मंत्री गिरीश महाजन यांना नाशिकचे पालकमंत्री पद दिलं गेलं. मात्र, शिवसेना-राष्ट्रवादी दोन्ही पक्षांनी पालकमंत्रीपदावर दावा केल्याने वाद निर्माण झाला. सरकारला गिरीश महाजन यांना दिलेलं पालकमंत्रीपद रद्द करावं लागलं. तेव्हापासून आतापर्यंत नाशिकला पालकमंत्री नाही.
दरम्यान नाशिक शहरात पालकमंत्रीपद नसल्याने समस्या वाढल्याचे चित्र आहे. शहरात रस्त्यांची अवस्था वाईट झाली आहे. लोकांचे बळी जात आहे. नाशिक जिल्ह्यातील मंत्री या समस्यांची जबाबदारी घ्यायला किंवा त्या सोडवायला तयार नाही. दुसरीकडे मंत्री गिरीश महाजन हे नाशिकचे पालकमंत्री नसले तरी ते पालकमंत्री असल्याच्या आविर्भावात आहे. यासगळ्यात नाशिकरांचे हाल होत आहेत.
शहरात निर्माण झालेल्या प्रश्नांच्या पार्श्वभूमीवर भुजबळ समर्थकांनी पुन्हा एकदा शहरात बॅनरबाजी करत भुजबळांना पालकमंत्री करावं अशी मागणी पुढे आणली. अशात भुजबळही ही संधी ओळखतील असं वाटत होतं. मात्र, भुजबळांनी त्यावर नाराजी व्यक्त करत आपल्या कार्यकर्त्यांना हे बॅनर हटवण्याचे आदेश दिल्याने भुजबळांनी पालकमंत्रीपदाच्या रेसमधून माघार घेतल्याचे दिसत आहे.
कार्यकर्त्यांवर लावलेल्या बॅनरवर 'तो मी नव्हेच' अशी भूमिका भुजबळांनी घेतली आहे. भुजबळ इतक्या घाईघाईत बॅकफूटवर कसे आले अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. यामागे नेमकं भुजबळांना पक्षातून कुणी रोखलं की भाजपकडून रोखण्यात आलं...नेमकं कुणामुळे भुजबळ बॅकफूटवर आले असा प्रश्न उपस्थितीत केला जात आहे.
नाशिकमध्ये कुंभमेळा मंत्री म्हणून गिरीश महाजन काम करत असून तेच अघोषित पालकमंत्री आहेत. अशात भुजबळांनी पालकमंत्री पदाची इच्छा व्यक्त करणं म्हणजे भाजपला आव्हान देण्यासारखं आहे. सध्या राष्ट्रवादीमधील समीकरणे बदलली असून राष्ट्रवादीला भाजपला आव्हान देणं सोयीचे होणार नाही म्हणूनच भुजबळ बॅकफूटवर आले तर नाही? अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली नसती तरच नवल.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.