

Nashik Politics : नाशिक शहरातील रस्त्यांवरील खड्ड्यांवरुन सध्या राजकारण तापलं आहे. मंत्री छगन भुजबळ यांना पालकमंत्री करुन नाशिकला खड्ड्यातून बाहेर काढा अशा आशयाचे बॅनर राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसने लावले आहेत. शहरभर बॅनर लागल्याने चर्चेला उधाण आलं आहे.
दत्तक नाशिकचे पालक-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब भुजबळ साहेबांना पालकमंत्री करुन नाशिकला खड्ड्यातून बाहेर काढा.... ही सामन्य नाशिककरांच्या मनातील भावना आहे. अशी मागणी राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसच्या वतीने बॅनरद्वारे करण्यात आली आहे. होर्डिंगच्या माध्यमातून मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे ही मागणी करण्यात आली आहे.
नाशिक शहरातील वेगवेगळ्या चौकांमध्ये असे बॅनर लागले आहेत. शहरातील गंगापूर नाका, सिटी सेंटर मॉल, मायको सर्कल, चांडक सर्कल, जुना आडगाव नाका परिसर व शहरातील वेगवेगळ्या भागात हे होर्डिंग्ज लावले गेले आहेत.
फडणवीसांनी मागच्या निवडणुकीत नाशिकला दत्तक घेतलं होतं. म्हणून आम्ही त्यांच्याकडे मागणी केली की, नाशिकचे पालकमंत्रीपद रिक्त असून भुजबळ साहेबांना पालकमंत्री करा. प्रशासनावर चांगला वचक असलेला व भूमिपुत्र असलेला नेता नाशिकला पालकमंत्री म्हणून पाहीजे. त्या अनुषंगाने आम्ही होर्डिंग्ज लावून सीएम साहेबांकडे मागणी केल्याचे राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे अध्यक्ष अंबादास खैरे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.
याआधी नाशिकच्या खड्ड्यांवरुन मंत्री गिरीश महाजन व छगन भुजबळ यांच्यात वार-प्रतिवार झाले होते. शहरात खड्ड्यामुळे पाच जणांचा बळी गेल्यानंतर भुजबळांनी मंत्री महाजन यांना त्यांच्या जबाबदारीची जाणिव करुन देत सुनावलं होतं. याआधी नाशिकची इतकी बेकारस्थिती कधीही झाली नाही. कुंभमेळा शहरात व्हायला हवा पण तो आमच्या लोकांच्या मुळावर उठायला नको, कुभमेळामंत्र्यांनी नाशिकडे लक्ष द्यायला हवं.
महापालिका प्रशासनाचेही भुजबळांनी कान टोचले. मी मुंबईचा महापौर होतो. त्यामुळे मला सगळ्या गोष्टी माहित आहे. शहराची संपूर्ण जबाबदारी पालिका प्रशासनाची आहे. ती झटकून किंवा याच्या त्याच्यावर ढकलून चालणार नाही. जबाबदारी घ्यावी लागेल असं त्यांनी पालिका आयुक्तांना सुनावलं होतं. त्यानंतर तातडीने मंत्री महाजन यांनी नाशिकमध्ये बैठक घेऊन प्रशासनाला सूचना केल्या. आठवडाभराच्या आत शहरातील खड्डे बुजवण्याचे आदेश महाजन यांनी यंत्रणेला दिले.
मात्र, आता या सगळ्या घडामोडी घडत असताना नाशिकमध्ये अशाप्रकारे भुजबळांना पालकमंत्री करा अशा आशयाचे होर्डिंग लागल्याने राजकारण तापलं आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.