
Nashik, 21 December : मंत्रिपद नाकारल्याने माजी मंत्री छगन भुजबळ अस्वस्थ झाले आहेत. या अस्वस्थतेतून त्यांच्या समर्थकांनी नाशिक आणि येवल्यात शक्तिप्रदर्शन करून थेट पक्ष नेतृत्वालाच आव्हान देण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्याकडे सपशेल दुर्लक्ष केल्याचे चित्र आहे.
नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात मंत्रिमंडळाचा विस्तार झाला. यामध्ये गेली चार टर्म मंत्री असलेल्या छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांना राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी वगळले, त्यामुळे भुजबळ आणि त्यांचे समर्थक संतप्त झाले होते. या संदर्भात भुजबळ यांनी आक्रमक होत येवल्यात आणि नाशिकमध्ये समर्थकांचा मेळावा घेतला, त्या मेळाव्यातून त्यांनी थेट पक्षनेतृत्वालाच आव्हान दिले.
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख, उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्यावर त्यांनी दोषारोप केले. मात्र, पक्षाच्या नेतृत्वाने त्याकडे दुर्लक्ष करीत कोणतीही प्रतिक्रिया व्यक्त केली नव्हती. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांच्या सावध भूमिकेमुळे छगन भुजबळ यांनी घेतलेला आक्रमक पवित्रा गेली दोन दिवस दिसून आला नाही.
गेली दोन दिवस भुजबळ नाशिकमध्येच मुक्कामाला होते. त्यांनी नागपूरच्या हिवाळी अधिवेशनाकडे पाठ फिरवली होती. मंत्रिपद मिळावे यासाठी त्यांनी केलेल्या आक्रमक खेळीला काय प्रतिसाद मिळतो, याची त्यांच्या समर्थकांना उत्सुकता होती. मात्र, पक्षाच्या स्थानिक नेत्यांनी यावर काहीही प्रतिक्रिया व्यक्त केली नाही, त्यामुळे छगन भुजबळ सेटलमेंटच्या मूडमध्ये असल्याचे बोलले जात आहे.
माजी मंत्री भुजबळ शुक्रवारी मुंबईला रवाना झाले, यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधण्याचे टाळले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार आणि अन्य नेत्यांनीही भुजबळ यांच्याशी थेट संपर्क करण्याचे टाळले. मात्र, मनोज जरांगे फॅक्टरमुळे भारतीय जनता पक्षाला माजी मंत्री भुजबळ यांचे उपयुक्तता वाटते आहे, त्यामुळेच भुजबळ यांना सबुरीचा सल्ला दिल्याचा दावा त्यांच्या समर्थकांनी केला आहे.
एकंदरच हिवाळी अधिवेशनाचे सूप वाजल्यानंतर बहुतांशी नेते आणि मंत्री आता मुंबईत परतणार आहेत. या पार्श्वभूमीवर भुजबळ हे देखील काल सायंकाळी मुंबईत दाखल झाले आहेत. यादरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाच्या नेत्यांकडून त्यांच्याशी संपर्क साधला जाईल का, याची सगळ्यांना उत्सुकता आहे. विशेष म्हणजे भुजबळ समर्थकांनी या संदर्भात भाजपने पुढाकार घ्यावा, यासाठी प्रयत्न चालविण्याचे बोलले जाते. एकंदरच मंत्रिपद न मिळाल्याने नाराज झालेले भुजबळ आता कुठेतरी पुनर्वसन व्हावे; म्हणून सेटलमेंटच्या तयारीत असल्याचे सूत्रांनी सांगितले
यासंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी मत व्यक्त केलेले नाही. यातील बहुतांशी पदाधिकाऱ्यांची नियुक्ती माजी मंत्री भुजबळ यांनीच केलेली आहे. मात्र, राष्ट्रवादीच्या काही नेत्यांनी या विषयावर आक्रमक होत आंदोलनाचा निर्णय दोन दिवसांपूर्वी घेतला होता.
शुक्रवारी या संदर्भात काही पदाधिकाऱ्यांनी पत्रकारांशी संपर्क केला होता, हे पदाधिकारी भुजबळ यांच्या विरोधात भूमिका घेणार होते. जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने माणिकराव कोकाटे आणि नरहरी झिरवाळ यांना मंत्री केले आहे, त्यामुळे पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये सध्या सेलिब्रेशनचा मूड आहे.
याबाबत अजित पवार यांच्या निकटवर्तीयांनी संबंधितांना सबुरीचा सल्ला दिला आहे. मुंबईत शनिवारी संपर्क साधला जाऊन त्यांचे समाधान करण्याचा प्रयत्न असेल. यासंदर्भात भुजबळ यांच्या समर्थकांनीही पुढाकार घेतला असल्याने एकंदरच नाशिक जिल्ह्यात भुजबळ यांनी घेतलेल्या आक्रमक पावित्र्याला आता कोणते वळण मिळते, याची सगळ्यांना उत्सुकता आहे.
Edited By : Vijay Dudhale
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.