

Rahuri Election Updates: राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी न करण्याच्या निर्णयामुळे भाजप आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या 'गुडबुक'मध्ये गेलेले माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी पुन्हा एकदा टायमिंग साधताना दिसत आहे.
तनपुरे यांच्या या टायमिंगमुळे अहिल्यानगरमधील राजकीय गणितं बदलतील, अशी चर्चा सध्याच्या राजकारणात रंगली आहे. मुख्यमंत्री फडणवीस सोमवारी (ता. 20) राहुरीत प्रचारसभा होत असतानाच, त्याच दिवशी प्राजक्त तनपुरे यांनी निर्णायक मेळाव्याचं आयोजन केलं आहे. फडणवीस अन् तनपुरे यांच्या या टायमिंगची राहुरी पोटनिवडणुकीपेक्षा सर्वाधिक चर्चा आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांची राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीसाठी सोमवारी (ता. 20) राहुरीत सायंकाळी सहा वाजता, प्रचारसभा होत आहे. मंत्री पंकजा मुंडे, महामंत्री विजय चौधरी यांच्यासह अहिल्यानगरमधील प्रमुख नेते उपस्थित राहणार आहेत. मुख्यमंत्री फडणवीसांच्या प्रचार सभेवेळीच माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी निर्णायक मेळावा ठेवला आहे.
माजी मंत्री प्राजक्त तनपुरे (Prajakt Tanpure) यांनी राहुरी पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी न करण्याचा निर्णय घेतला. मुख्यमंत्री फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची शिष्टाई महत्त्वाची ठरली. मुख्यमंत्री फडणवीस यांना तनपुरेंशी थेट दूरध्वनीवर संपर्क करून चर्चा केली. त्यानंतर त्यांनी उमेदवारी न करण्याचा निर्णय जाहीर केला. यानंतर तनपुरे हे भाजपमध्ये येतील अशी चर्चा सुरू आहे.
प्रदेशाध्यक्ष चव्हाण यांची काल राहुरी, जेऊर (ता. नगर) इथं प्रचारसभा झाली. त्यावेळी त्यांनी तनपुरे यांचं भाजपमध्ये स्वागत होईल, असं सांगितले. प्रा. राम शिंदे आणि उमेदवार अक्षय कर्डिले यांनी देखील तनपुरेंना साद घातली. भाजप नेत्यांकडून तनपुरेंना साद घातली जात असतानाच, विखे पाटील पिता-पुत्रांनी यावर अधिकृत भूमिका न घेता, प्रदेशाध्यक्ष विचार करतील, असे सांगितले.
तत्पूर्वी सुजय विखे पाटील यांनी भाजपमध्ये येण्यास अनेक इच्छुक आहेत, गाडी फुल असताना आणखी कोणा-कोणाला घ्यायचं, असे सूचक तनपुरेंच्या पक्ष प्रवेशाबाबत बोलून अप्रत्यक्षपणे विरोध दर्शवला होता. पण आता भाजपमधून तनपुरेंच्या स्वागताचा सूर अळवला जात आहे अन् मुख्यमंत्री फडणवीस यांच्या प्रचारसभेवेळीच तनपुरेंची होत असलेल्या निर्णायक मेळाव्याच्या टायमिंगमुळे, तनपुरेंच्या प्रवेशांच्या चर्चांना अधिक जोर धरला आहे.
फडणवीस अन् तनपुरे यांचे यापूर्वी एकदा टायमिंग हुकल्याची देखील चर्चा आहे. राहुरी इथल्या महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या पदवीग्रहण समारंभावेळीच तनपुरेंचा मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थित पक्ष प्रवेश ठरला होता. परंतु त्यावेळी टायमिंग जुळून आला नाही. आता मात्र येत्या सोमवारी (ता. 20) तो जुळून येईल, असे सांगितले जाते.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.