Lok Sabha Election 2024: महायुतीने दिंडोरी आणि नाशिक लोकसभा (Dindori and Nashik Lok Sabha) मतदारसंघासाठी उमेदवार जाहीर केल्यानंतर पक्षात नाराजी होती. काही इच्छुक अद्यापही प्रचारात सहभागी झालेले दिसत नाहीत. त्यामुळे गेले दोन दिवसांपासून महायुतीच्या नेत्यांची डॅमेज कंट्रोलसाठी जोरदार फील्डिंग लागली आहे.
दिंडोरी लोकसभा मतदारसंघासाठी केंद्रीय राज्यमंत्री भारती पवार (Bharti Pawar) यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण नाराज होते. त्यांनी उमेदवारी अर्ज देखील दाखल केला होता. मात्र वरिष्ठांच्या शिष्टाईने त्यांनी अर्ज मागे घेतला. आता त्यांनी प्रचारात सक्रिय व्हावे यासाठी पक्षांच्या नेत्यांनी प्रयत्न सुरू केले आहेत.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
आज सकाळी भाजपचे प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) तसेच उमेदवार केंद्रीय राज्यमंत्री डॉक्टर भारती पवार यांनी माजी खासदार चव्हाण यांची भेट घेतली. यावेळी दिंडोरी लोकसभा मतदारसंघात (Dindori Lok Sabha Constituency) चव्हाण यांनी आपल्या समर्थकांना सूचना द्याव्यात, प्रचारात सहभागी व्हावे. पक्षाच्या विजयासाठी प्रयत्न करावेत. अशी विनंती करण्यात आल्याची माहिती आहे. याला चव्हाण यांनीही मान्यता दिल्याने महायुतीच्या उमेदवार भारती पवार यांच्या प्रचाराला आता गती येण्याचे संकेत मिळाले आहेत.
महायुतीच्या नाशिकच्या उमेदवाराबाबतही भारतीय जनता पक्षाचे काही कार्यकर्ते आणि पदाधिकारी सक्रिय नव्हते. त्यामुळे रविवारी नाशिकच्या दौऱ्यावर असलेले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी माजी नगरसेवक दिनकर पाटील यांची भेट घेतली. दिनकर पाटील यांनी उमेदवार हेमंत गोडसे (Hemant Godse) यांच्या प्रचारासाठी सक्रिय व्हावे. मतदारसंघातील वातावरण शेवटच्या टप्प्यात अनुकूल होऊ लागले आहे. त्याला अधिक चांगली साथ मिळावी म्हणून भाजप आणि शिवसेना शिंदे गट हे सर्वच नेते आता सक्रिय झाले आहेत. महायुतीमध्ये प्रचारातील सुसूत्रता वाढण्यासाठी त्याची चांगलीच मदत होईल असे दिसत आहे.
आमदार देवयानी फरांदे, जिल्हा अध्यक्ष सुनील बच्छाव, शंकरराव वाघ, गिरीश पालवे यांसह विविध पदाधिकारी भाजपचे प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांच्या समवेत माजी खासदार चव्हाण यांच्या निवासस्थानी गेले होते. यावेळी अतिशय सकारात्मक चर्चा झाली. विशेष म्हणजे काल रात्री मुख्यमंत्र्यांनी केलेल्या सूचनेनंतर माजी नगरसेवक दिनकर पाटील हे देखील सक्रिय झाले आहेत.
(Edited By Jagdish Patil)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.