

Congress MP Shobha Bachhav Mobile Hacked : आजकाल सायबर चोरट्यांचा सुळसुळाट वाढला असून या सायबर भामट्यांनी आपला मोर्चा आमदार-खासदारांकडे वळवल्याचे दिसत आहे. महिनाभरापूर्वी नाशिक पश्चिम विधानसभा मतदार संघाच्या भाजप आमदार सीमा हिरे यांचा मोबाइल हॅक झाला होता. आता या सायबर भामट्यांच्या तावडीत चक्क कॉंग्रेसच्या धुळ्यातील खासदार शोभा बच्छाव सापडल्या.
सायबर भामट्यांनी गुरुवारी (दि. ३) काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या आणि धुळ्याच्या खासदार डॉ. शोभा बच्छाव यांचा मोबाईल हॅक केला. संबंधित अज्ञात सायबर भामट्याने खासदार बच्छाव यांच्या नावाने त्यांच्या कुटुंबियांसह अनेक व्यक्तींकडे ६२ हजार रूपयांची मागणी केली. ही बाब खासदार बच्छाव यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी सायबर पोलिसांत तक्रार दिली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, खासदार शोभा बच्छाव यांचा मोबाईल हॅक करण्यात आल्यानंतर त्यांच्या नावाने त्यांच्या मोबाइल क्रमांकावरून अनेक व्यक्तींना व्हॉट्सअॅपवर ६२ हजार रूपयांची मागणी करण्यात आली. माझ्या खात्यात ६२ हजार रुपये जमा करशील का, मी ते दोन तासात परत करेन, माझे यूपीआय काम करीत नाही, हे खूप तातडीचे काम आहे असे मॅसेज अनेकांना मिळाले. खासदारांच्या नावाने व त्यांच्या मोबाईल क्रंमाकावरुन हा मेसेज आल्याने काही जणांनी त्यावर विश्वास देखील ठेवण्याची शक्यता निर्माण झाली होती.
दरम्यान चक्क खासदारांना पैशांची गरज भासली म्हणून अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले तर काहींना संशय आल्याने त्यांनी लगेचच शोभा बच्छाव यांना फोन केला. काही काळ त्यांचा फोनदेखील लागत नव्हता. दरम्यान, खासदार बच्छाव हा प्रकार लक्षात आल्यानंतर त्यांनी पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांची भेट घेतली. त्यांनी सायबर पोलिसांना कळवल्यानंतर पोलिसांनी तत्काळ कारवाई केली आणि डॉ. बच्छाव यांचा फोन सुरू करून दिला.
दरम्यान, गेल्या काही दिवसांत लोकप्रतिनिधींना सायबर भामट्यांकडून लक्ष्य केले जात असल्याचे समोर येत आहे. नाशिक पश्चिमच्या भाजप आमदार सीमा हिरे यांच्यानंतर आता काँग्रेसच्या धुळे खासदार डॉ. शोभा बच्छाव यांचा मोबाइल हॅक झाल्याने लोकप्रतिनिधींच्या डिजिटल सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
त्यामुळे नागरिकांनी लोकप्रतिनिधी किंवा परिचित व्यक्तीच्या नावाने पैशांची मागणी करणारे मेसेज आल्यास त्यावर तातडीने विश्वास न ठेवता संबंधित व्यक्तीशी थेट संपर्क साधून खात्री करावी, तसेच संशयास्पद प्रकार आढळल्यास त्वरित सायबर पोलिसांशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.