Dada Bhuse Politics : 'इंग्रजी शाळेत मुलं घालणाऱ्यांना मराठीवर बोलण्याचा अधिकार...', दादा भुसेंच्या टार्गेटवर ठाकरे
Dada Bhuse News: राज्यात सध्या हिंदी भाषेवरून राजकीय रणकंदन माजले आहे. हिंदी भाषा सक्तीची करण्याबाबत विविध राजकीय पक्षांनी आंदोलनाची तयारी सुरू केली आहे. यावर शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे चांगलेच संतापले आहेत.
भुसे यांनी हिंदी भाषेच्या सक्ती बाबत राजकारण सुरू असल्याचा दावा केला. यासंदर्भात राजकीय पक्षांनी केलेलं विरोध समजण्यापलीकडचा आहे. विशेषतः शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला त्यांनी टार्गेट केले.
मंत्री भुसे म्हणाले, ज्यांची मुले मराठी शाळेत शिकत नाहीत. जे आपल्या मुलांना मराठी शाळेत शिकवत नाहीत. बऱ्याच नेत्यांचे मराठी भाषेत शिक्षण झालेले नाही. ते लोक भाषेवर बोलत आहेत. त्यांना याबाबत काय अधिकार आहे?
आपण राज्य शासनाची त्रिभाषा सूत्र हा विषय मनसे प्रमुख राज ठाकरे यांची भेट घेऊन त्यांना समजावून सांगितला आहे. शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे याबाबत राजकारण करीत आहे. त्यांचे राजकारण हे केवळ स्वार्थासाठी आणि स्वतःचा पक्ष टिकवण्यासाठी आहे.
त्रिभाषासुत्रीसाठी ज्यावेळी समिती नियुक्त करण्यात आली होती तेव्हा उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते. त्यांच्या समितीने जो अहवाल केला त्याची सध्या अंमलबजावणी होत आहे. विरोधकांनी याची जाण ठेवलेली नाही. ज्यांचे शिक्षणच मराठी भाषेत झालेले नाही त्यांना भाषेवर बोलण्याचा नैतिक अधिकार आहे का? असे सांगत त्यांनी ठाकरे बंधूंना आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करण्याचा प्रयत्न केला.
शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे नेते संजय राऊत याबाबत करीत असलेले आरोप अज्ञानातून आहेत. राज्य शासनाने याबाबत आपली भूमिका स्पष्ट केली आहे. त्यानंतर हिंदीच्या शिक्षणाबाबत काढलेला अध्यादेशाची होळी करणे कितपत योग्य आहे? असे ते म्हणाले.
राज्यातील सर्व शिक्षण मंडळांना मराठी भाषा सक्तीची करण्यात आली आहे. देशभरातील शालेय अभ्यासक्रमात छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास शिकविण्याची मागणी केंद्र शासनाने मान्य केली आहे. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांची भेट घेऊन लवकरच आपण छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास शिकविला जावा, अशी मागणी करणार असल्याचे, मंत्री भुसे यांनी म्हटले आहे.
राज्य शासनाने त्रिभाषा सूत्रे स्वीकारली आहे. बाबतचा अध्यादेश देखील काढण्यात आला आहे. त्यावरून भाषा तज्ञ तसेच विरोधी पक्षांकडून तीव्र विरोध होत आहे. राज्य शासनातील काही मंत्र्यांचा देखील हिंदी भाषा पहिलीपासून शिकविण्यास विरोध आहे. या पार्श्वभूमीवर दादा भुसे यांनी भाषा धोरणाला विरोध करणाऱ्या नेत्यांचा समाचार घेतला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.