Hire Vs Bhuse News: शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी त्यांचे विरोधक अद्वय हिरे यांचा सोपा झेल घेतला. त्यांना मालेगावच्या राजकारणातून आऊट केले. यानिमित्ताने हिरे यांच्याकडे असलेली शेवटची सत्ताही गेली आहे.
मालेगावच्या राजकारणात शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे आणि त्यांचे परंपरागत विरोधक हिरे यांच्यातील वैर सर्वश्रुत आहे. मात्र आपल्या सरंजामी राजकारणाचा फटका हिरे यांना सतत बसत आला आहे. याच राजकारणाच्या लहरीपणामुळे हिरे यांची बाजार समितीतील दणकट बहुमत असलेली सत्ताही त्यांना गमवावी लागली.
मालेगाव बाजार समितीमध्ये शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे उपनेते अद्वय हिरे गटाचे १४ संचालक होते. शालेय शिक्षण मंत्री यांचे अवघे चार संचालक होते. यांच्या चार पैकी तीन संचालक हमाल मापारी आणि व्यापारी गटातील होते. त्यामुळे भुसे यांच्या चार पैकी तीन संचालकांना नियमानुसार अध्यक्ष उपाध्यक्ष पदाची संधी नव्हती. अशा प्रतिकूल स्थितीतही त्यांच्या गटाचे चंद्रकांत शेवाळे सभापती झाले.
हा चमत्कार अद्वय हिरे गटाचे दहा संचालक कोणतीही अपेक्षा न ठेवता भुसे गटाला मिळाल्याने घडला. या राजकीय घडामोडीत हिरे गटाच्या अरुणा सोनजकर यांची उपसभापती पदी निवड झाली. शिवसेना ठाकरे गटाचे उपनेते अद्वय हिरे यांना त्यांच्या `डायनेस्टी` राजकारणाचा हा फटका बसला आहे.
दोन महिन्यांपूर्वी बैठकांना सतत अनुपस्थित राहिल्याने अद्वय हिरे यांचे संचालक पद तांत्रिक मुद्द्यांवर रद्द झाले होते. तेव्हापासून अद्वय हिरे हे कोणाच्याही संपर्कात नव्हते. त्यांच्या गटाच्या संचालकांचेही दूरध्वनी ते घेत नव्हते. हिरे यांचा कोणाशीच संपर्क न राहिल्याने असहाय झालेल्या या संचालकांनी भुसे यांचा झेंडा हाती घेण्याचा निर्णय घेतला.
मला विधानसभा निवडणुकीत शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे हिरे यांचा पराभव झाला होता. त्यानंतर मतदार संघातील बाजार समितीवर मात्र त्यांचे निर्विवाद वर्चस्व होते. मात्र समितीचे संचालक पद रद्द झाल्यावर आणि आपल्या चिरेबंदी वाडा संस्कृतीच्या राजकारणामुळे ते कोणाच्याही संपर्कात नव्हते.
नेत्याचा संपर्क नसल्याने अद्वय हिरे गटाचे १३ संचालक सैरभैर झाले होते. या संचालकांना मंत्री भुसे यांच्याशी वैर का घ्यावे असा प्रश्न पडला होता. त्यातूनच त्यांनी राजकीय सोय म्हणून हिरे यांना सोडचिठ्ठी दिली. परिणामी अद्वय हिरे यांची मालेगाव मतदारसंघातील शेवटची सत्ता देखील आयतीच भुसे यांच्याकडे आली आहे.
श्री हिरे यांचे संचालक पद तांत्रिक कारणाने रद्द झाले होते. ते त्यावर अपील करून पुन्हा संचालकपदी राहू शकत होते. मात्र त्यांनी ते का टाळले, हे समजू शकले नाही. यानिमित्ताने मालेगावच्या राजकारणात अद्वय हिरे यांच्या वाडा संस्कृतीच्या राजकारणामुळे भुसे यांनी त्यांचा `इझी कॅच` घेत त्यांना हिट आउट केले आहे, असेच म्हणता येईल.
------
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.