
Nashik Politics : महायुतीमध्ये नाशिकच्या पालकमंत्रीपदावरुन सुरु असलेला वाद काही लपून राहिलेला नाही. त्यात मंत्री गिरीश महाजन यांनी स्वातंत्र्यदिनी नाशिकमध्ये शासकीय ध्वजारोहण केल्याने या वादाला नवं तोंड फुटलं. कारण त्यानंतर महाजन हेच अघोषित पालकमंत्री असल्याचं बोललं जात आहे.
त्यावरुन राष्ट्रवादीचे नेते व अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी नाराजी व्यक्त केली. भुजबळांवर गोदिंया जिल्ह्यात ध्वजारोहण करण्याची जबाबदारी देण्यात आली होती. परंतु तब्येतीचे कारण देत गोंदिया येथे ध्वजारोहण करण्यास भुजबळांनी नकार दिला. जे करायचं ते नाशिकमध्येच करणार असं भुजबळांनी म्हटलं. त्यावरुन महायुतीमधील धुसफूस चव्हाट्यावर आली. त्यापार्श्वभूमीवर आता शिवसेनेचे मंत्री दादा भुसे यांनी भुजबळांना नाव न घेता टोला लगावला आहे.
नाशिकमध्ये क्रेडाईतर्फे प्रॉपर्टी एक्सपोच्या समारोपास उपस्थित असलेले दादा भुसे यांच्याशी माध्यमांनी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते. भुसे म्हणाले, आम्ही मुख्यमंत्र्यांच्या आदेशाचे पालन केलं. आदेशानुसार राज्यात दिलेल्या ठिकाणी ध्वजारोहण केले आहे. रायगड व नाशिकच्या पालकमंत्रीपदाचा निर्णय मुख्यमंत्री घेतलीच. परंतु पद राहील तरच प्रश्न सुटतील असे नाही. मुख्यमंत्री जे जे निर्णय घेतील त्याची अंमलबजावणी आम्ही महायुती म्हणून नक्कीच करू, असा टोला शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी नाव न घेता मंत्री छगन भुजबळ यांना लगावला.
राज्य शासनाने जाहीर केलेल्या यादीनुसार शिक्षणमंत्री दादा भुसे यांच्यावर अमरावती येथील ध्वजारोहणाची जबाबदारी सोपविण्यात आली होती. त्यानुसार त्यांनी भुसे यांनी अमरावतीत जाऊन ध्वजारोहण केले होते. मात्र त्याचवेळी राष्ट्रवादीचे भुजबळ यांनी गोंदियाला न जाता नाशिकमध्येच राष्ट्रवादीच्या कार्यालयाबाहेर ध्वजारोहण केलं. त्यापार्श्वभूमीवर भुसे यांनी नाव न घेता एकप्रकारे भुजबळांना चिमटा काढल्याचं बोललं जात आहे.
दादा भुसे हे देखील शिवसेनेच्या वतीने नाशिकच्या पालकमंत्रीपदासाठी पहिल्यापासून इच्छुक आहेत. सुरुवातीला गिरीश महाजन यांच्या नावाची घोषणा ज्यावेळी पालकमंत्री म्हणून झाली. त्यावेळी दादा भुसे यांना डावलण्यात आल्याने शिवसैनिकांनी महाजन यांच्या नावाला विरोध केला. त्यातून मुख्यमंत्र्यांनी रायगडसह नाशिकच्याही पालकमंत्रीपदाला स्थगिती दिली होती.
त्यानंतर मंत्रिमंडळात नंतर छगन भुजबळ यांची एण्ट्री झाल्याने पालकमंत्रीपदाच्या रिंगणात एक प्रकारे तिसरा भिडू उतरला. त्यातून रस्सीखेच अधिक वाढली. त्यात आता भुजबळांनी उघडपणे भूमिका घेतली आहे. जिल्ह्यात राष्ट्रवादीचे सात आमदार आहेत. त्यामुळे पालकमंत्रीपद राष्ट्रवादीला मिळावं अशी आग्रही भूमिका भुजबळांनी घेतल्याने पेच आणखी वाढला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.