

Nandgaon Politics : नांदगाव तालुक्यातील राजकारणात सोमवारी मोठी घडामोड घडली. येथील बाजार समितीचे सभापती दर्शन आहेर यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मनमाड येथील सभेत शिवसेनेत प्रवेश केला. काँग्रेसचे येथील नेते माजी आमदार अॅड. अनिल आहेर यांचे ते पुत्र असून त्यांच्या संमतीने हा निर्णय घेतल्याचे स्पष्ट होताच स्थानिक राजकारणात खळबळ उडाली.
काँग्रेसचा गड अनेक वर्षे सांभाळणारे अॅड. आहेर यांनी स्वतःच्या एकुलत्या मुलाला शिवसेनेत पाठवल्याने तालुक्यातील समीकरणेच बदलण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.
सुहास कांदे यांच्या विरोधात गेल्या दोन-अडीच वर्षांपासून विविध नेत्यांची एकत्रित मोहीम सुरू होती. या मोहीमेचे सूत्र छगन भुजबळ यांनी हाती घेतले होते आणि अॅड. जगन्नाथ धात्रक, राजेंद्र देशमुख, अॅड. अनिल आहेर, संजय पवार आणि पंकज भुजबळ — हे पाचही माजी आमदार एकाच व्यासपीठावर आणण्यात ते यशस्वी झाले होते. भुजबळ नंतर महायुतीत गेले तरी स्थानिक स्तरावर भुजबळ विरुद्ध कांदे हा संघर्ष कायम राहिला.
या गटातील देशमुख आणि पवार हे शिवसेनेत परत येत सुहास कांदे यांच्या नेतृत्वामागे उभे राहिले. विरोधात टिकून राहिलेले फक्त दोन जण — अॅड. जगन्नाथ धात्रक आणि अॅड. अनिल आहेर. विधानसभा निवडणुकीपर्यंत त्यांनी आपली भूमिका कायम ठेवली. दोन दिवसांपूर्वी भाजपात प्रवेश केलेले अॅड. धात्रक यांचे पुत्र व मनमाडचे माजी नगराध्यक्ष गणेश धात्रक यांनी पालिका निवडणुकीत तटस्थ राहण्याची भूमिका घेतल्याचे दिसते. त्यांनी निवडणुकीच्या रिंगणातूनच माघार घेतली.
त्यानंतर तीन दिवसाच्या अंतराने दर्शन आहेर यांनी शिवसेनेत प्रवेश करत जिल्हा परिषदेतील न्यायडोंगरी गटात आपली जागा निश्चित केली. त्यामुळे भुजबळ विरुद्ध कांदे या राजकीय संघर्षात अखेर अॅड. अनिल आहेर यांनी सुहास कांदे यांच्या बाजूने झुकत नवे राजकीय गणित उभे केले आहे.
हे सर्व पाहता एक गोष्ट स्पष्ट होते की, काँग्रेसने नांदगाव तालुक्यात टिकवलेले अस्तित्व आता सर्वात मोठ्या परीक्षेला सामोरे जाणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.