

Ahilyanagar news : सोशल मीडियावर चर्चेत आलेल्या ‘कॉक्रोच जनता पार्टी’वर राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी अप्रत्यक्ष निशाणा साधला आहे.
इंटरनेटच्या माध्यमातून पक्ष चालवणे आणि प्रत्यक्ष राजकारण करणे या दोन पूर्णपणे वेगळ्या गोष्टी असल्याचे सांगत, राजकीय पक्षांनी या नव्या डिजिटल ट्रेंडला घाबरण्याचे कारण नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
अहिल्यानगर येथे आयोजित शब्दगंध साहित्य संमेलनानिमित्त माध्यमांशी संवाद साधताना मंत्री भरणे यांनी ‘कॉक्रोच जनता पार्टी’बाबत स्पष्ट भूमिका मांडली. यावेळी आमदार संग्राम जगताप (Sangram Jagtap) हेही उपस्थित होते.
“राजकीय कार्यकर्ता म्हणून काम करणे, लोकांमध्ये राहून संघर्ष करणे आणि सोशल मीडियाच्या (Social Media) माध्यमातून लोकप्रियता मिळवणे यात मोठा फरक असतो. अनेक कष्टातून राजकीय पक्ष उभे राहतात. त्यामुळे ‘कॉक्रोच जनता पार्टी’मुळे प्रस्थापित पक्षांना धोका निर्माण होईल, असे वाटत नाही,” असे भरणे म्हणाले.
त्यांनी पुढे म्हटले की, “आजचा तरुण काहीतरी नवीन करण्याच्या शोधात असतो. सोशल मीडियावर वेगळी ओळख निर्माण करण्याचा प्रयत्न होतो. मात्र प्रत्यक्ष निवडणुकीतच हे स्पष्ट होईल की या डिजिटल लाटेमागे खरोखरच जनाधार आहे की फक्त सोशल मीडिया ट्रेंड.”
खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर राज्यात डिझेल तुटवडा असल्याच्या चर्चांवरही मंत्री भरणे यांनी भाष्य केले. “राज्यात डिझेलचा कोणताही तुटवडा नाही. सातबारा दाखवल्याशिवाय डिझेल मिळणार, अशा चर्चा पूर्णपणे अफवा आहेत,” असे त्यांनी स्पष्ट केले.
अफवांमुळे राज्यात डिझेल खरेदीत तब्बल 20 टक्क्यांनी वाढ झाल्याचे सांगत त्यांनी शेतकऱ्यांना गैरसमज करून रांगा लावू नयेत, असे आवाहन केले. “जर कोणी डिझेलसाठी सातबारा मागत असेल, तर संबंधितांवर कठोर कारवाई केली जाईल,” असा इशाराही त्यांनी दिला.
कांद्याचे उत्पादन कमी करण्याबाबत विचारलेल्या प्रश्नावर मंत्री भरणे यांनी थेट उत्तर देणे टाळले. “पत्रकारांच्या प्रश्नातच उत्तर दडलं आहे,” असे सूचक वक्तव्य त्यांनी केले. कांद्याच्या बाजारभावाचा प्रश्न हा पणन विभागाशी संबंधित असला तरी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, दोन्ही उपमुख्यमंत्री आणि संपूर्ण मंत्रिमंडळ शेतकऱ्यांना चांगला भाव मिळावा यासाठी प्रयत्नशील असल्याचे त्यांनी सांगितले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.