बोगस दिव्यांग प्रमाणपत्रे व भत्ते घेतल्याप्रकरणी रत्नागिरीतील तीन प्राथमिक शिक्षक तडकाफडकी निलंबित.
तुकाराम मुंढेंच्या आदेशांनंतरही नाशिकच्या मालेगाव येथील अंधशाळा सुरू असल्याचा धक्कादायक खुलासा.
या विरोधाभासी कारवाईमुळे मुंढेंचा पुढील निर्णय काय असेल याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष.
Malegaon News : राज्यातील काही ठिकाणी बनावट दिव्यांग ओळखपत्रावरून वातावरण तापले असतानाच दिव्यांग कल्याण विभागाचे सचिव तुकाराम मुंढे यांनी बोगस दिव्यांगांविरोधात धडक कारवाईचा मोर्चा उघडा आहे. रत्नागिरीत शासनाची दिशाभूल करणाऱ्या 3 प्राथमिक शिक्षकांना तडकाफडकी निलंबित करण्यात आले आहे. तर या निलंबना मागे बनावट दिव्यांग प्रमाणपत्रे तसेच इतर विविध प्रकारचे भत्ते लाटल्याचा प्रकार असल्याचे समोर आले आहे. या कारवाईमुळे एकीकडे शिक्षण खातं हादरलं असतानाच मात्र दुसरीकडे मुंडेंच्या आदेशाला केराची टोपली दाखवण्याचा प्रकार नाशिकमध्ये उघडकीस आला आहे. येथे मुंडे यांनी स्पष्ट आदेश देऊनही मालेगाव येथील अंधशाळा आजही सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. यामुळे आता मुंडे कोणता निर्णय घेतात याकडे राज्याचे लक्ष लागले आहे.
राज्यात एकीकडे चुकीच्या तपासणी अहवालांच्या आधारे यूडीआयडी कार्ड मिळवून वैश्विक दिव्यांग ओळखपत्र (यूडीआयडी) घेतल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आले आहेत. याचा वापर करून शासकीय, निमशासकीय नोकरीतील आरक्षणासह विविध शासकीय योजना, आर्थिक सवलती आणि इतर लाभ बोगस लाभार्थी आजही घेत आहेत.
अशांवर कारवाई करण्यासाठी दिव्यांग कल्याण विभागाने पावले उचलली असून मुंडे यांनी तसे आदेशच सर्व विभागांना दिले आहेत. त्याप्रमाणे कोकणात बनावट दिव्यांग प्रमाणपत्रे तसेच इतर विविध प्रकारचे भत्ते लाटणाऱ्या 3 प्राथमिक शिक्षकांवर कारवाई करण्यात आली आहे. त्यांच्यावर निलंबनाची कारवाई झाल्याने शिक्षण खात्यात खळबळ उडाली आहे.
अशातच मुंडे यांच्या आदेशाला नाशिकच्या मालेगावात मात्र हरताळ फासत थेट केराची टोपली दाखवल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. येथील त्रिवणीदेवी तुळशीराम पाटोदिया निवासी अंधशाळेची मान्यता रद्द करण्याचे स्पष्ट आदेश मुंडे यांनी दिले होते. मान्यता रद्द करून शाळा सुरू ठेवल्यास तत्काळ सील करत गुन्हा दाखल करण्याचे आदेश मुंडे यांनी दिले होते.
मात्र ती आजही सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. यामुळे आता प्रशासनानेच डोळेझाक करत शासनाच्या आदेशालाच केराची टोपली दाखविल्याचा गंभीर आरोप होताना दिसत आहे. त्रिवणीदेवी तुळशीराम पाटोदिया निवासी अंधशाळेबाबत सामाजिक कार्यकर्ते विठोबा द्यानद्यान यांनी जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण अधिकाऱ्यांकडे तक्रार करत गंभीर आरोप केले होते.
त्यांनी २७ डिसेंबर २०२३ मध्ये याबाबत प्रशासनाकडे अर्ज केला होता. त्याप्रमाणे शाळेने कागदोपत्री ५० विद्यार्थी आणि सुमारे २४ कर्मचारी दाखवून शासनाची आर्थिक फसवणूक केल्याचे म्हटले होते. तसेच त्या शाळेत प्रत्यक्षात फक्त सात विद्यार्थी असल्याचा दावाही त्यांनी केला होता. त्या आरोपांची चौकशी केल्यानंतर जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण अधिकाऱ्यांनी मान्यता रद्द करण्याचा प्रस्ताव आयुक्तांकडे पाठवला होता.
अहवालाच्या आधारे ३ मे २०२५ मध्ये अंधशाळेची मान्यता रद्द करण्यात आली होती. त्यानंतर संस्थाचालकांनी मंत्रालयात अपील केले होता. ज्याला सचिव मुंडे यांनी फेटाळत निवासी अंधशाळेची मान्यता रद्द करण्याचे स्पष्ट आदेश दिले होते. सोबतच मुंडे यांनी जर ही शाळा ३० ऑक्टोबर नंतर शाळा सुरू राहिल्यास ती सील करण्यासह गुन्हा दाखल करण्याचे स्पष्ट आदेशही त्यांनी दिले होते.
पण आता त्यांच्या या आदेशानंतरही ही शाळा सुरूच असल्याचे समोर आले आहे. तर आदेशानंतरही या शाळेवर प्रत्यक्षात कोणतीही ठोस कारवाई करण्यात आलेली नाही. त्यामुले आता प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित केले जात असून आर्थिक लाभासाठी स्थानिक प्रशानासनाने मुंढेंच्या आदेशाला केराची टोपली दाखवल्याची चर्चा सुरू झाली आहे.
Q1. रत्नागिरीत कोणावर कारवाई झाली आहे?
➡️ बनावट दिव्यांग प्रमाणपत्रे व भत्ते लाटल्याप्रकरणी तीन प्राथमिक शिक्षक निलंबित करण्यात आले.
Q2. ही कारवाई कोणी आदेशित केली?
➡️ दिव्यांग कल्याण विभागाचे सचिव तुकाराम मुंढे यांनी.
Q3. नाशिकमधील कोणता प्रकार वादात आहे?
➡️ मालेगाव येथील अंधशाळा मुंढेंचे आदेश असूनही सुरू असल्याचा आरोप.
Q4. या प्रकरणाचा शिक्षण खात्यावर काय परिणाम झाला?
➡️ शिक्षण खाते हादरले असून चौकशीचा फेरा वाढण्याची शक्यता आहे.
Q5. पुढे काय निर्णय अपेक्षित आहे?
➡️ आदेश न पाळणाऱ्या संस्था व अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई होऊ शकते.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.