Nashik News : बदलापूर येथील अत्याचाराच्या घटनेनंतर राज्यातील वातावरण गेल्या काही दिवसापासून चांगलेच तापले आहे. या प्रकरणावरून विरोधकांनी राज्य सरकारला कोंडीत पकडले आहे. गेल्या चार ते पाच दिवसापासून विरोधकांकडून आक्रमकपणे आंदोलन केले जात आहेत.
नाशिक येथील कार्यक्रमाप्रसंगी बोलताना राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी नाशिक पोलिसांनी सकारात्मक बदल घडवला असून कायदा आणि सुव्यवस्था आहे, हे पोलिसांनी दाखवून दिले असल्याचे वक्तव्य करीत त्यांच्या कामगिरीचे कौतुक करीत पाठ थोपटली आहे.
गेल्या काही दिवसापासून कुठलीही घटना घडल्यानंतर गृहमंत्री आणि पोलिसांना शिव्याच खाव्या लागतात. थँक्स लेस हा जॉब आहे, त्यांना अवार्ड मिळत नाही. पोलिसांमध्येही माणूस असून चांगल्याला चांगले आणि वाईटाला वाईट म्हटले पाहिजे. नाशिक पोलिसांनी सकारात्मक बदल घडवला आहे. कायदा आणि सुव्यवस्था आहे हे पोलिसांनी दाखवले. स्टार्सचे स्वागत आणि सत्कार करण्याचं भाग्य लाभल्याने आनंद झाला, हा अभिमानाचा क्षण आहे, अशा शब्दांत गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाशिकमधील एका कार्यक्रमप्रसंगी भावना व्यक्त केल्या.
पोलिसांचे जीवन मोठे चॅलेंजिंग जॉब झाला आहे. पूर्वी कायदा सुव्यवस्था ठेवण्यासाठी वेगवेगळ्या गोष्टी वापराव्या लागत होत्या. व्हाईट कॉलर क्राईम व्हायला लागल्या आहेत. जमीन, ड्रग्स असे विषय आता आले आहेत. 100 वर्षे जुने कायदे होते. मात्र, मोदी आणि अमित शाह यांनी कायदे बदलले, असेही फडणवीस यांनी यावेळी सांगितले.
‘डायनॅमिक प्लॅटफॉर्म’ तयार
वाढलेल्या आर्थिक गुन्ह्यांना जलद गतीने रोखण्यासाठी महाराष्ट्र पोलीस विभागाने एक ‘डायनॅमिक प्लॅटफॉर्म’ तयार करून सर्व सोशल मीडिया कंपन्या आणि बँकांना एकत्रित आणले आहे. या प्लॅटफॉर्मचं काम सध्या प्रगतीपथावर असून कोणताही आर्थिक गुन्हा झाल्यास तो तात्काळ डिटेक्ट होईल, अशी व्यवस्था उभारण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले.
पोलीस आयुक्तालयांना दिल्या ‘फॉरेन्सिक व्हॅन्स’
याशिवाय घडलेल्या गुन्ह्यांचा प्रभावी तपास करण्यासाठी आणि फॉरेन्सिक कॅपॅसिटी वाढवण्यासाठी ‘फॉरेन्सिक व्हॅन्स’ पोलीस आयुक्तालयांना देण्यात आल्या आहेत, अशी माहितीही यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी दिली.पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी पुढाकार घेऊन देशातील 100 वर्ष जुन्या ब्रिटिशकालीन कायद्यात बदल करून नवीन कायदे अस्तित्वात आणले. या सुधारित नवीन कायद्याला प्रगत तंत्रज्ञानाची जोड देण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले.
महिलांच्या सुरक्षेसाठी ‘दामिनी पथक’ सुरु
महिलांच्या सुरक्षेसाठी प्रत्येक युनिटमध्ये ‘दामिनी पथक’ सुरु केले आहे. वेगवेगळ्या अॅप्स आणि नंबरच्या मदतीने महिलांना या सेवा तात्काळ पुरवण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. शाळांमध्ये पोलीस दीदी ‘गुड टच बॅड टच’चं मुलींना प्रशिक्षण देत आहेत. त्यासोबतच ‘भरोसा सेल’च्या माध्यमातून महिलांना मदत केली जात असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.