

Dhule Politics : धुळे जिल्ह्याला हादरवून टाकणाऱ्या रावसाहेब पाटील व त्यांचा मुलगा वैभव पाटील या पिता-पुत्रांच्या निर्घृण खून प्रकरणाचा निकाल गुरुवारी (ता. १२) जिल्हा न्यायालयाने सुनावला. या हत्येतील मुख्य सूत्रधार माजी नगराध्यक्ष बाजीराव पवार याच्यासह ११ आरोपींना दुहेरी जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली. जिल्हा सत्र न्यायाधीश जयश्री पुलाटे यांनी हा निकाल दिला. या निकालाने आरोपींना व त्यांच्या नातेवाईकांना ढसाढसा रडू कोसळले.
धुळे शहरातील देवपूर परिसरात ८ जून २०१८ ला सायंकाळी सहाच्या सुमारास रावसाहेब पाटील व त्यांचा मुलगा वैभव पाटील या पिता-पुत्राचा खून झाला होता. यामागे जुने राजकीय आणि वैयक्तिक वैमनस्य कारणीभूत होते. बाळापूर ग्रामपंचायतीच्या २०१५ मध्ये झालेल्या निवडणुकीत रावसाहेब पाटील यांनी बाजीराव पवार याच्या पॅनलच्या विरोधात काम केले होते. त्याचा राग असल्याने बाजीराव पवार व साथीदारांनी सुपारी देऊन बाप-लेकाचा खून केल्याचा आरोप सिद्ध झाला. घटनेच्या दिवशी आरोपींनी रावसाहेब पाटील यांच्या स्कॉर्पिओ गाडीला अडवून कुकरी, तलवार आणि कोयत्याने पिता-पुत्रांवर वार केले. यात दोघांचाही मृत्यू झाला.
याप्रकरणी देवपूर पोलिस ठाण्यात १३ जणाविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल झाला होता. जिल्हा न्यायालयाने या खटल्यात एकूण १३ पैकी ११ आरोपींना विविध कलमान्वये दोषी ठरवून दुहेरी जन्मठेप आणि प्रत्येकी दहा हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. या निकालामुळे पीडित कुटुंबाला न्याय मिळाल्याची भावना आहे. धुळे न्यायालयात गुरुवारी या खटल्याचा निकाल असल्याने नातेवाईकांसह नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.
दुहेरी २८ वर्षांच्या जन्मठेपेची शिक्षा सुनावताना, हा खटला सुरू असताना, आरोपींनी आठ वर्षांची शिक्षा भोगल्यामुळे उर्वरित २० वर्षे त्यांचा मुक्काम कारागृहात असणार आहे.
यांना झाली शिक्षा
मुख्य सूत्रधार माजी नगराध्यक्ष बाजीराव ऊर्फ सुभाष सजन पवार, भूपेश ऊर्फ भूपेंद्र वाल्मीक पाटील, हर्शल ऊर्फ दादू रवींद्र पाटील, जयराज श्यामकांत पाटील, हृषीकेश श्यामकांत पाटील, दर्शन अंबादास परदेशी, भगवान नानाभाऊ अहिरे, आप्पा ऊर्फ अर्जुन भगवान अहिरे, गौरव बाजीराव ऊर्फ सुभाष पवार, भूषण बाबूराव कापकर आणि भूषण निंबा पगारे या ११ आरोपींना दुहेरी जन्मठेपेची शिक्षा सुनावली. यासोबत संदीप ऊर्फ विकी दिलीप वेलीस याला इतर आरोपींना पळून जाण्यास मदत केल्याबद्दल पाच वर्षांची सक्तमजुरी सुनावली. तसेच बेकायदेशीर जमाव, घातक शस्त्रे बाळगणे आणि रस्ता अडवणे यांसारख्या विविध कलमान्वये आरोपींना एक महिना ते एक वर्षापर्यंतची सक्तमजुरी सुनावली. या सर्व शिक्षा एकत्रितपणे भोगायच्या आहेत. (Nashik News)
एकाची निर्दोष मुक्तता
या प्रकरणातील आरोपी वैभव ऊर्फ सोनू अरुण पवार याची पुराव्याअभावी सर्व आरोपातून निर्दोष मुक्तता झाली आहे. निर्दोष सुटलेल्या व सक्तमजुरीतील आरोपीबाबत उच्च न्यायालयात दाद मागणार असल्याचे ॲड. तवर यांनी सांगितले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.