Ahmednagar News : अहमदनगर जिल्ह्यातील सहकार क्षेत्रात सध्या शरद पवार यांचे नाव आणि त्यांच्याशी निगडीत असलेल्या विविध गोष्टींची खुमासदार चर्चा रंगली आहे. यातल्या यात शरद पवार यांच्या टायमिंगवर वेगवेगळे किस्से चवीनं सांगण्याची चढाओढ सुरू आहे. कारणही तसंच आहे.
भाजपच्या अधिपत्याखाली असलेल्या अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेचे विशेष लेखापरीक्षकांमार्फत तपासणीचा आदेश विभागीय सहनिबंधकांनी दिले आहेच. हा आदेश समोर येताच गेल्या आठवड्यात शरद पवार यांनी नगर सहकारी बँक विषयी व्यक्त केलेल्या चिंतेवर चर्चा सुरू झाली आहे. तसंच शरद पवार यांच्या टायमिंगची देखील चर्चा आहे.
नगर जिल्हा सहकारी बँकेच्या कामकाजात अनियमितता आणि गंभीर स्वरूपाचे दोषांची चर्चा सुरू आहे. नाशिक येथील विभागीय सहनिबंधकांनी बँकेशी निगडीत 19 मुद्द्यांचे लेखापरीक्षण करण्याचा आदेश दिला आहे. ही बँक भाजपच्या (BJP) ताब्यात आहेत. भाजपचे नेते मंत्री राधाकृष्ण विखे यांच्या नेतृत्वाखाली या बँकेवर भाजपचे माजी आमदार शिवाजी कर्डिले अध्यक्षपदी विराजमान आहेत. शिवाजी कर्डिले यांचे तसे सर्व राजकीय पक्षांची संबंध आहेत. बँकेच्या कामकाजाविषयी सहकार विभागाकडे पूर्वी अनेक तक्रार होत्या. त्यावरूनच नाशिकच्या सहनिबंधकांनी बँकेच्या तपासणीचा आदेश दिला आहे.
दरम्यान, मुंबईत एका कार्यक्रमात शरद पवार (Sharad Pawar) यांनी नगर जिल्हा सहकारी बँकेच्या कारभाराविषयी चिंता व्यक्त केली होती. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आमदार बाळासाहेब थोरात यांच्याकडे ही चिंता व्यक्त केली होती. शरद पवार यांचे हे वाक्य भाजप मंत्री राधाकृष्ण विखे यांना झोंबली होती. मंत्री विखे यांनी तशाचपद्धतीने शरद पवार यांना प्रत्युत्तर दिले होते. राज्याच सहकार अस्तित्व संपुष्टात आले आहे. नगर जिल्ह्यातील कार्यक्षेत्रासाठी आम्ही सक्षम आहोत, असे विखे यांनी म्हटले होते.
शरद पवार आणि राधाकृष्ण विखे यांच्या नगरच्या सहकार क्षेत्रावरून सुरू असलेल्या आरोपांमध्ये खासदार नीलेश लंके यांनी देखील उडी घेतली होती. यातच नाशिकच्या सहनिबंधकांनी 19 मुद्यांसह विशेष लेखापरीक्षणाचा आदेश दिल्याने खळबळ उडाली आहे. श्रीगोंद्यातील कर्मयोगी कुंडलिकराव जगताप सहकारी साखर कारखान्यासह पद्मश्री विठ्ठलराव विखे-पाटील साखर कारखान्यास मर्यादा डावलून कर्जाचे वाटप केल्याचा ठपका आहे. या कारखान्यांची कर्जाची मर्यादा संपलेली असतानाही अनुक्रमे 325 कोटी आणि 378 कोटींचे कर्ज दिले गेले. तसाच प्रकार अकोल्यातील अगस्ती सहकारी साखर कारखान्याच्या बाबतीत देखील झाला असून कारखान्याला 378 कोटींचे कर्ज दिले आहे. यावरून बँकेच्या कारभारावर शंका उपस्थित केली जात आहे.
लोकनेते मारुतराव घुले-पाटील, मुळा सहकारी साखर कारखाना, वृद्धेश्वर सहकारी साखर कारखाना व कर्मवीर भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्यांना देखील, असेच कर्जाचे वाटप करण्यात आले आहे. अशोक सहकारी साखर कारखान्याची स्टॅम्प ड्युटी वसुली न करताच कर्जाचे वाटप केले आहे. सहकारमहर्षी शिवाजीराव नागवडे सहकारी साखर कारखान्याला देखील नोंदणीकृत गहाणखत न करताच कर्जाचे वाटप करण्यात आले. कारखान्यांबाबत मर्यादा ओलांडून केलेले कर्जाचे वाटप, सीडीएस संगणक प्रणालीतील घोळ, बँकेची शेती कर्जाची थकबाकीसह विविध 19 मुद्द्यांवरून प्रभारी विशेष लेखापरीक्षक डी. आर. पाटील यांच्यामार्फत तपासणी केली जाणार असून, पाटील यांनी माहिती घेण्यास सुरवात केली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.