

Ahilyanagar ZP school news : अहिल्यानगर जिल्हा परिषदेत बनावट दिव्यांग शिक्षक आणि दिव्यांग नसून ते लपवणाऱ्या कर्मचाऱ्यांमुळे चांगलाच गदारोळ सुरू आहे. गेल्या महिन्यात तब्बल अठरा कर्मचाऱ्यांकडे बनावट दिव्यांगत्व प्रमाणपत्र आढळले होते. त्यांच्यावर निलंबनाबरोबर फौजदारी कारवाई करण्यात आली होती.
त्यानंतर पुन्हा तीन जणांचे अहवाल आले आहेत. त्यांचे दिव्यांगत्व खूप कमी असल्याने, त्यांना नोटिसा बजावल्या आहेत. जिल्हा परिषद प्रशासनाकडून या तीन शिक्षकांवर, काय कारवाई होते, याकडे आता लक्ष लागलं आहे.
दिव्यांग प्रमाणपत्र 40 टक्क्यांपेक्षा कमी आढळल्यानंतर ते दिव्यांगत्त्व ग्राह्य धरले जात नाही. काही शिक्षकांचे (Teachers), तर शून्य ते दहा टक्क्यांपर्यंत आढळल्याने खळबळ उडाली आहे. नव्याने आढळलेले तीनही शिक्षक आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा जिल्हा परिषदेचे वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे. त्यांचा खुलासा मागवल्यानंतर त्यांच्यावर पुढील कारवाई होणार आहे.
अहिल्यानगर (Ahilyanagar) जिल्हा रुग्णालयाने 106 दिव्यांग कर्मचाऱ्यांची तपासणी दोन महिन्यांपूर्वी केली होती. त्याचा अहवाल आल्यानंतर त्यातील 18 जणांचे दिव्यांगत्व 40 टक्क्यांपेक्षा कमी सापडले. मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी यांनी त्यांच्याकडून खुलासा मागविल्यानंतर कारवाई सुरू केली आहे.
यातील काहींनी लाभ घेतला नसल्याने ते बचावले, तर काहींचे अहवाल आलेले नाहीत. एकंदरीत आतापर्यंत पंधरा जणांवर कारवाई करण्यात आली. जिल्हा परिषदेने 41 अल्पदृष्टी दिव्यांगांना तपासणीसाठी नाशिक आरोग्य उपसंचालक कार्यालयाकडे पाठवले होते. त्याचा अहवाल आता प्राप्त झाला आहे. त्यानंतर ही कारवाई सुरू झाली आहे.
महाराष्ट्रात सरकारी नोकरी मिळवण्यासाठी बोगस (बनावट) दिव्यांग प्रमाणपत्र सादर करणाऱ्या 316 हून अधिक अधिकारी-कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. खऱ्या दिव्यांग व्यक्तींचा हक्क हिरावून घेतल्यामुळे, तसेच 40% पेक्षा कमी दिव्यांगत्व असताना किंवा बोगस कागदपत्रांच्या आधारे पदे मिळवल्याच्या तक्रारींमुळे ही कठोर कारवाई सुरू आहे.
दिव्यांग विभागाचे तत्कालीन मुख्य सचिव तुकाराम मुंढे यांनी दिव्यांगांचे हक्क हिरावून घेणाऱ्या सरकारी सेवेतील बनावट दिव्यांगांवर ही कारवाई सुरू केली आहे. तुकाराम मुंढे यांची आता पु्न्हा बदली झाली आहे. आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन विभागाचे सचिव म्हणून, त्याची 31 मार्चला बदली करण्यात आली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.