

Ahmednagar News : मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली मराठा आरक्षणाचा लढा राज्यात तीव्र होत आहे. राज्यातील प्रत्येक गावापर्यंत हा लढा पोहाेचत आहे. या लढ्याला आता तीव्र धार येऊ लागली आहे. मराठा समाजाच्या संघटनांमधील कार्यकर्ते एकत्र येत स्थानिक नेत्यांची कोंडी करत आहेत. यामुळे राजकीय नेत्यांची चांगलीच डोकेदुखी वाढली आहे. नगर जिल्ह्यातील कोपरगावमधील नाटेगाव आणि करंजी गावातील मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी आरक्षण मिळत नाही, तोपर्यंत एकाही राजकीय नेत्याला गावात प्रवेश नाही, असा फलक लावला आहे.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
हा फलक लक्षवेधी ठरत असला, तरी स्थानिक नेत्यांची डोकेदुखी वाढवणारा ठरला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार हे 24 ऑक्टोबरला दसऱ्याच्या दिवशी कोपरगाव तालुक्यात दौऱ्यावर येत आहेत. त्यात या फलकाचे लोण कोपरगाव तालुक्यात वेगाने पसरत आहे. अजित पवार (Ajit Pawar) यांच्या दौऱ्यावर याचा परिणाम होणार नाही, याची काळजी अजित पवार गटाच्या आमदार आणि कार्यकर्त्यांनी घेतली आहे. तशी धास्तीदेखील घेतली आहे.
'चुलीत गेले नेते चुलीत गेला पक्ष, मराठा आरक्षण एकच आमचे लक्ष', अशा मजकुराबरोबर स्थानिक नेत्यांचा निषेध असल्याचे फलक लावण्यात आला आहे. याचबरोबर या फलकावर 'आजवर लढलो मातीसाठी, एकदा लढा जाती'साठी हे मनोज जरांगे पाटलांचे वाक्य फलकावर लिहिले आहे. नाटेगाव आणि करंजी गावात लागलेला हा फलक समाजमाध्यमांवर वेगाने व्हायरल होत आहे. हा फलकामुळे स्थानिक नेत्यांची चांगलीच कोंडी झाली आहे. तसेच चर्चेला उधाण आले आहे. 'मान-मर्यादा राखून गावात प्रवेश करावा', असा सूचक इशारादेखील या फलकावर देण्यात आला आहे.
मराठा आरक्षणाचे (Maratha Reservation) आंदोलन राज्यभर तीव्र होत आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या राज्यभर सभा सुरू आहेत. गावपातळीवर जाऊन ते आरक्षण का गरजेचे आहे, हे ते स्वतः सांगत आहेत. यातून त्यांचा पाठिंबा वाढत आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार हे कोपरगाव दसऱ्याच्या दिवशी येत असल्याने या फलकावरील मजकुरावर अधिक चर्चा रंगली आहे.
Edited by : Amol Jaybhaye
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.