

Nashik MLC Election : नाशिक विधान परिषद निवडणुकीत अपक्ष उमेदवार गोकुळ गीते यांचा ऐतिहासिक विजय झाला आहे. महायुतीचे शिवसेनेचे अधिकृत उमेदवार नरेंद्र दराडे यांचा तब्बल १०९ मतांच्या फरकाने त्यांनी पराभव केला आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे यांच्यासाठी हा निकाल जबर धक्का ठरला आहे.
शिवसेना शिंदे गटाचे अधिकृत उमेदवार नरेंद्र दराडे या निवडणुकीत पराभूत झाले आहेत. या पराभवानंतर दराडे यांनी आपल्यासोबत मोठा दगाफटका झाल्याचे म्हटले आहे. असे असताना एकनाथ शिंदे यांनी मात्र वेगळीच चाल खेळायला सुरुवात केली आहे. एकनाथ शिंदेंनी त्यासाठी प्लॅन बी रेडी ठेवल्याचं दिसत आहे.
गोकुळ गीतेंना शिवसेनेत घेण्यासाठी एकनाथ शिंदे यांनी हालचाली सुरु केल्या आहेत. गोकुळ गिते यांना तशी ऑफरच शिंदेंकडून देण्यात आल्याचे खात्रीलायक माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे आता नाशिकमधील घडामोडींकडे अवघ्या राज्याचे लक्ष लागले आहे.
शिवसेना मंत्री उदय सामंत यांनी गोकुळ गीते यांच्या विश्वासू सहकाऱ्याला फोन करून गीतेंना शिवसेनेत येण्याची ऑफर देण्यात आल्याचे सांगितले जात आहे. गोकुळ गीते यांचे मित्र असलेल्या नाना गामने यांना मंत्री उदय सामंत यांनी फोन केला आहे. गोकुळ गिते यांना त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीसाठी मुंबईत बोलावून घेतलं आहे.
गोकुळ गीते यांच्यासाठी ओझर विमानतळावर एकनाथ शिंदे खास विमान पाठवणार आहे. त्यांना एकनाथ शिंदेंनी मुंबईत बोलावून घेतलं आहे. दुपारी २ वाजेनंतर गोकुळ गिते आपल्या पत्नी उज्वला यांच्यासह काही मित्रांसोबत मुंबईला जाणार असल्याचे वृत्त आहे. तशी माहिती नाना गामणे यांनी देखील माध्यमांशी बोलताना दिली आहे.
गोकळ गीते यांना शिवसेना पुरस्कृत करावे, अशी मागणीच उदय सामंत यांनी केल्याचे समजत असून त्यानुसार अपक्ष निवडून आलेले गोकुळ गिते आता एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेत प्रवेश करण्याची दाट शक्यता आहे.
गोकुळ गिते यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यास त्यांचे बंधू गणेश गिते यांच्यावर येणारं म्हाडा प्रकरणातील आगामी संकट टळू शकतं अशीही चर्चा नाशिकच्या राजकीय वर्तुळात दबक्या आवाजात सुरु झाली आहे.
याशिवाय गोकुळ गितेंनी दगाफटका केल्याचा शिक्का देखील पुसला जाईल. त्यामुळेच गोकुळ गिते शिंदे सेनेची वाट धरु शकतात. गोकुळ गिते यांना शिवसेनेत घेऊन जाण्यासाठी नाशिकमधील एका शिवसेना आमदाराने पुढाकार घेतल्याचे सांगितले जात आहे.
नाशिक विधान परिषद निवडणूक निकाल व पडलेली मते खालील प्रमाणे
एकूण मतदान : 619
झालेले मतदान : 618
अवैध मते : 13
विजयासाठी आवश्यक कोटा : 303
गोकुळ गीते विजयी
गोकुळ गीते : 357
नरेंद्र दराडे : 248
प्रसाद हिरे : 00
अवैध : 13
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.