

Jalgaon News : मी आधी वारकरी आहे त्यानंतर मग राजकारणी आहे. कीर्तनकारांची सेवा हीच माझी ऊर्जा आहे. जोपर्यंत माझ्या जीवात जीव आहे, तोपर्यंत मी वारकऱ्यांच्या सेवेसाठी काम करत राहील असे प्रतिपादन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले.
जळगाव येथे शनिवारी (ता. २५) श्री गुरु मोठे बाबा वारकरी सेवा ट्रस्टतर्फे जिल्हास्तरीय वारकरी पदाधिकारी मेळावा व संत पूजन सोहळा आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात गुलाबराव पाटील बोलत होते. यावेळी जिल्ह्यातील कीर्तनकारांमार्फत ट्रस्टतर्फे पालकमंत्री पाटील यांचा सन्मान करण्यात आला.
या कार्यक्रमात ट्रस्टचे अध्यक्ष व प्रेमी गजानन महाराज वरसाडेकर यांनी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्याकडे मागणी केली की, दरवर्षी मिळणाऱ्या कलाकार मानधन योजनेत ३०० कलाकारांना मानधन दिलं जावं, त्यापैकी ५० टक्के मानधन वारकरी संप्रदायातील पात्र कलावंतांना द्यावे. वारकरी संप्रदायातील कुटुंबासाठी आरोग्य शिबिरे जिल्ह्यातील पाच तालुक्यांनुसार तीन ठिकाणी आयोजित करावीत. वारकऱ्यांचा अपघात विमा काढण्यात यावा.
यावेळी गुलाबराव पाटील म्हणाले, मी आधी वारकरी आहे मग त्यानंतर राजकारणी आहे. त्यामुळे शासनासोबतच मी वैयक्तिकरीत्या वारकऱ्यांसोबत आहे. दरवर्षीच्या मानधन योजनेत ३०० कलावंतांना सामावून घेण्यासाठी आणि त्यात १५० वारकरी कलावंतांना मानधन देण्यासाठी मी कॅबिनेटमध्ये ठोस मागणी करणार आहे, तसेच पाच तालुके मिळून तीन ठिकाणी भव्य आरोग्य शिबिरे आयोजित करू. जिल्ह्यातील एक हजार वारकरी कीर्तनकारांचा विमा काढू असा शब्द यावेळी गुलाबराव पाटील यांनी दिला.
पाटील पुढे म्हणाले, जिल्ह्यातील वारकरी व कीर्तनकार मेळावा हा समाजासाठी संघटनात्मक सशक्तीकरणाचा नवा अध्याय असून, राजकारणापलीकडे पात्र आणि गरजू व्यक्तींना मदत करणे, हेच माझे धर्मकार्य आहे. प्रत्येक तालुक्यात वारकरी भवन उभारण्यासाठी देखील मी प्रयत्नशील आहे. कीर्तन हे समाज परिवर्तनाचे मंदिर आहे, आणि कीर्तनकार हे त्या मंदिराचे पुजारी आहेत, वारकऱ्यांचे कुटुंब संकटात असताना शासन त्यांच्या सोबत आहे.
यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य प्रताप पाटील, ह.भ.प. गोविंद महाराज, रवींद्र हरणे महाराज, पांडुरंग महाराज आवरकर, प्रतिभा सोनवणे, समाधान भोजेकर महाराज यांच्यासह असंख्य वारकरी उपस्थित होते.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.