

Nashik Politics : उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेसचे इगतपुरी -त्र्यंबकेश्वर मतदारसंघाचे आमदार हिरामण खोसकर यांचे पुत्र वामन खोसकर यांच्या अडचणी वाढल्या आहेत.
वामन खोसकर यांच्यावर एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेचे त्र्यंबकेश्वर तालुकाप्रमुख रविंद्र भोये यांनी शिवीगाळ करून जीवे ठार मारण्याची धमकी दिल्याचा आरोप केला आहे. यासंदर्भात रविंद्र भोये यांनी नाशिक ग्रामीण पोलिसांकडे लेखी तक्रार केली आहे. त्यामुळे महायुतीमधील शिवसेना-राष्ट्रवादी या दोन्ही पक्षांमधील स्थानिक पातळवरील वाद चव्हाट्यावर आला आहे.
आमदार हिरामण खोसकर यांचे चिरंजीव वामन खोसकर यांची एक कथित शिवीगाळ आणि धमकीची ऑडिओ क्लिप सध्या सोशल मिडीयावर व्हायरल झाली आहे. मात्र, या क्लिपची सरकारनामा कोणतीही पुष्टी करत नाही. भोये यांनी तक्रारीत केलेल्या आरोपांची पोलिसांकडून चौकशी झाल्यानंतरच या प्रकरणातील वस्तुस्थिती समोर येणार आहे.
रविंद्र भोये यांनी नाशिक ग्रामीण पोलिसांकडे वामन खोसकर यांच्या विरोधात तक्रार केली आहे. वामन खोसकर यांनी आपल्याला शिवीगाळ करत जीवे ठार मारण्याची धमकी दिल्याचा आरोप भोये यांनी केला आहे. त्र्यंबकेश्वर तालुक्यात सुरू असलेल्या कथित गैरप्रकार आणि भ्रष्टाचाराविरोधात आपण आवाज उठवत असल्याने आपल्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न केला जात असून धमक्या दिल्या जात असल्याचा आरोप भोये यांनी केला आहे.
बैठका घेण्याचे अधिकार हे आमदारांना असतात. पंरतु प्रत्यक्षात आमदार पुत्र वामन खोसकर हे बैठका घेऊन ग्रामसेवकांना धमकी देतात. मला मदत करू नये म्हणून त्रास दिला जातो असा आरोप रविंद्र भोये यांनी केला आहे.
तसेच त्र्यंबकेश्वरमध्ये मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार केला जात असल्याचा आरोप करत या प्रकरणाविरोधात आपण आवाज उठवत असल्याचा दावा भोये यांनी केला आहे. पंरतु आपला आवाज दाबण्यासाठी आमदार पुत्र वामन खोसकर यांच्याकडून आपल्याला धमक्या दिल्या जात असल्याचा आरोप भोये यांनी केला आहे.
या प्रकरणात रविंद्र भोये यांनी आमदार हिरामण खोसकर आणि त्यांचे पुत्र वामन खोसकर यांच्यावर कायदेशीर कारवाई करून गुन्हा दाखल करण्याची मागणी केल्याने खळबळ उडाली आहे. त्यामुळे याप्रकरणात नाशिक ग्रामीण पोलीस काय भूमिका घेतात हे पाहावे लागणार आहे. हिरामण खोसकर राष्ट्रवादीचे आमदार आहेत तर, भोये हे शिवसेनेचे पदाधिकारी आहेत. दोन्ही पक्ष राज्यात सत्तेत असले तरी स्थानिक पातळीवरील संघर्ष चव्हाट्यावर आल्याचे चित्र आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.