

Maharashtra News : अमेरिका-इस्रायल आणि इराण युद्धाचे भारतात त्यातल्या त्यात महाराष्ट्रात देखील तीव्र पडसाद उमटताना दिसत आहे. युद्धामुळे अनेक विमानसेवा रद्द झाल्याने विविध कारणांसाठी विदेशात गेलेले नाशिक, मालेगाव, धुळे, जळगाव यासह महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील अनेकजण तिथेच अडकले आहेत. त्यांना ना परतीचे तिकीट मिळत आहे ना, ना व्हिसा वाढवण्याची प्रक्रिया पूर्ण होत आहे.
पुण्यासह राज्यातील अनेक पर्यटक दुबईत अडकून पडले आहेत. 'आम्ही येथे सुरक्षित असलो तरी, सरकारने आम्हाला प्राधान्य देऊन लवकरात लवकर मायदेशी परत आणावे,' अशी विनंती या पर्यटकांनी केली आहे. सध्या पुण्यातील सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे. कारण पुणे शहर हे शिक्षणाचे माहेरघर असल्याने येथे मोठ्या संख्येने इराणी विद्यार्थी वास्तव्यास आहेत. तसेच नाशिकमध्ये द्राक्ष-कांदा निर्यात ठप्प झाली असून मुंबईत सुक्या मेव्याचे दर दुप्पट-तिप्पट झाले आहेत.
अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्यातील युद्ध अधिकच भडकलं असून तणाव वाढला आहे. या युद्धाचे पडसाद आता मध्य-पूर्व आशियापर्यंत मर्यादित न राहता संपूर्ण जगभर पडू लागले आहे. महाराष्ट्रालाही या युद्धाचा फटका बसताना दिसून येत आहे. युद्धाच्या तणावपूर्ण परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या 'होर्मुझ सामुद्रधुनी' (Strait of Hormuz- SOH) या जलमार्गावरील वाहतूक अधिकृतपणे बंद करण्यात आली आहे. संबंधित प्रादेशिक अधिकाऱ्यांनी सुरक्षेच्या कारणास्तव हा निर्णय घेतल्याचे सांगितले जाते. या निर्णयामुळे जागतिक सागरी व्यापारावर तात्पुरता परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. विशेषतः उत्तर महाराष्ट्रातून होणारी केळी आणि कांद्याची निर्यात पूर्णपणे ठप्प झाली आहे. भारताच्या कच्च्या तेलाच्या आयातीपैकी सुमारे ४० टक्के ते ५० टक्के तेल होर्मुझच्या सामुद्रधुनीतूनच येते. हा मार्ग बंद झाल्याने तेलाचे दर वाढून भारतात पेट्रोल आणि डिझेलच्या किमती वाढू शकतात. त्याची झळ महाराष्ट्रालाही बसणारच आहे.
महाराष्ट्रातील निर्यातीला, पर्यटनाला आणि जीवनावश्यक वस्तूंच्या पुरवठा साखळीला या युद्धाचा फटका बसला आहे. यामुळे अनेक व्यवहार ठप्प झाले असून कोट्यवधींचे नुकसान होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. महाराष्ट्राची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईतील बाजारपेठेवरही या युद्धाचे परिणाम होण्याची भीती निर्माण झाली आहे.
पुणे हे शिक्षणाचे माहेरघर असल्याने, येथे इराणी विद्यार्थ्यांची मोठी संख्या आहे. सध्याच्या युद्धजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर, पुणे पोलिसांनी खबरदारीचे पाऊल उचलत शहरातील सुरक्षा व्यवस्था अधिक कडक केली आहे. शहरातील प्रमुख धार्मिक स्थळे, गर्दीची ठिकाणे आणि संवेदनशील परिसरांमध्ये कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. सुरक्षिततेसोबतच, पुणे पोलिसांच्या विशेष शाखेने पुण्यात राहणाऱ्या इराणी विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधून त्यांना सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले आहे. ज्या विद्यार्थ्यांच्या व्हिसाची मुदत संपत आली आहे, त्यांना ती वाढवून मिळण्यासाठी आवश्यक ती कायदेशीर मदत आणि मार्गदर्शन पोलीस प्रशासन करणार आहे, अशी माहिती समोर आली आहे.
रमजानच्या काळात नाशिकचे द्राक्ष आणि कांद्याला मोठी मागणी असते. पण युद्धामुळे निर्यात थांबल्याने शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान होत आहे. तसेच दुबईमध्ये भारतीय शेतमालाचे दर या युद्धामुळे एका रात्रीत तिपटीने वाढले आहेत. मात्र, विस्कळीत झालेल्या पुरवठा साखळीमुळे निर्यातदारांना या संधीचा फायदा घेता येत नसल्याचे चित्र आहे. मुंबईतील घाऊक बाजारपेठेत सुक्या मेव्याच्या किमतीत प्रचंड वाढ झाली आहे. तसेच जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमती १० टक्क्यांनी वाढल्या आहेत. या युद्धाचे चटके भारतालाही बसण्याची शक्यता असून तेलाच्या वाढत्या दरांनी भारत होरपळण्याची शक्यता व्यक्त केली जाऊ लागली आहे.
दुबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरील सर्व उड्डाणे पुढील आदेशापर्यंत स्थगित करण्यात आल्याची माहिती मिळत असल्याने महाराष्ट्रातून होणाऱ्या उच्च प्रतीच्या हिरव्या व पालेभाज्यांच्या दैनंदिन निर्यातीवर तातडीचा परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.