

Girish Mahajan Reacts to the Mangesh Chavan-Sumit Patil Controversy : जळगाव जिल्हा बँकेच्या निवडणुकीतील उमेदवार सुमित पाटील व आमदार मंगेश चव्हाण यांच्यात झालेली शााब्दीक चकमक जिल्ह्यात चर्चेचा विषय बनली आहे. सुमित पाटील यांचा अर्ज आपल्या सांगण्यावरुनच आधी अवैध त्यानंतर पुन्हा वैध करण्यात आल्याची कबुली मंगेश चव्हाण यांनी दिली. त्यावरुन सुमित पाटील यांनी मंगेश चव्हाण यांच्यावर टीका करत अपशब्द वापरले. या सर्व घडामोडींवर आता भाजपचे नेते व जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
महाजन हे जळगाव येथे पत्रकारांशी बोलत होते. ते म्हणाले, शिवसेनेचे आमदार किशोर पाटील यांचे पुत्र सुमित पाटील यांनी आमदार मंगेश चव्हाणांबाबत जे वक्तव्य केले, ते अतिशय चुकीचे आहे. सुमित पाटलांनी अशाप्रकारे चव्हाण यांचे नाव घेऊन खालच्या दर्जाच्या शब्दात बोलायला नको होते. त्यांचे बोलणे चुकीचे व अयोग्य आहे, असून यासंदर्भात आपण किशोर पाटील यांच्याशी बोलणार असल्याचे मंत्री महाजनांनी सांगितले.
जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत अर्ज माघारीच्या प्रक्रियेनंतर देखील वातावरण गरम आहे. महायुतीच्या १२ जागा बिनविरोध झाल्या असल्या तरीही मंगेश चव्हाण यांच्यासमोर चाळीसगावातून शिवसेनेच्या उमेदवारांनी अर्ज कायम ठेवल्याने तिथे निवडणूक होणार आहे.
त्यावरुनच दोन दिवसांपूर्वी आमदार मंगेश चव्हाण यांनी नाराजी व्यक्त केली. ते म्हणाले, राजकारणात एखादी भूमिका घेताना शब्द पाळावा लागतो. उमेदवारी अर्ज छाननीवेळी आपणच अधिकाऱ्यांना फोन करून सुमित पाटलांचा अर्ज बाद करण्यास सांगितले होते. मात्र, नेत्यांच्या बैठकीत एकदा भूमिका ठरल्यानंतर गुलाबभाऊ, गिरीशभाऊंनी माझ्याच फोनवरून अधिकाऱ्याशी बोलत सुमितचा अर्ज वैध ठरविला. त्याठिकाणी आमच्या उमेदवाराने माघारही घेतली. मात्र, चाळीसगावमध्ये तसे झाले नाही. मंगेश चव्हाण यांचे भाषण सुरु असताना त्याचवेळी सुमित पाटील यांनी तडकाफडकी उठून सभात्याग केला. त्यानंतर माध्यमांशी बोलताना आमदार चव्हाणांबद्दल अपशब्द वापरत टीका केली होती.
सुमीत पाटील यांच्या वक्तव्यावर मंगेश चव्हाण यांनी आपण किशोर पाटील यांच्याशी बोलू असं म्हटलं होतं. आता मंत्री गिरीश महाजन यांनी देखील सुमित पाटील हे आमदार चव्हाणांबाबत चुकीचे बोलले आहेत. आपण याविषयावर किशोर पाटील यांच्याशी बोलणार असल्याचं म्हटलं आहे. चाळीसगावची लढाई ही काही अटीतटीची नाही. आमदार चव्हाणांना ८५ मते मिळणार असतील तर ७५ मिळतील असे महाजन म्हणाले.
चव्हाणांच्या वक्तव्यांची सारवासारव
आमदार चव्हाणांनी सुमीत पाटील यांचा अर्ज आपण बाद केल्याचे म्हटल्याबाबत विचारल्यावर मंत्री महाजन म्हणाले की, मंगेश चव्हाण काय म्हणाले मी ऐकलं नाही, पण अशाप्रकारे अधिकाऱ्यांवर दबाब आणू शकत नाहीत. तांत्रिक अडचणीने सुमित पाटलांचा अर्ज बाद झाला. ते अपिलात गेले व तेथे अर्ज वैध झाला. आम्ही कोणीही अधिकाऱ्यांना फोन केलेला नाही. असे सांगत आमदार चव्हाणांनी केलेल्या वक्तव्याची सारवासारवही त्यांनी केली.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.