Eknath Khadse Politics: मुक्ताईनगर येथील अवैध मुरूम उपसा हा राजकीय वादाचा विषय झाला आहे. याप्रकरणी अवैध उपसा करणाऱ्या व्यावसायिकांना संरक्षण दिल्याचा गंभीर आरोप पोलिसांवर होत आहे. त्यात आता नव्या राजकीय वादाची भर पडली आहे.
माजी मंत्री एकनाथ खडसे आणि भाजपचे आमदार चंद्रकांत पाटील यांच्यात नव्या राजकीय वादाला तोंड फुटले आहे. यासंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते खडसे यांनी आमदार चंद्रकांत पाटील यांच्यावर गंभीर टीका केली आहे. अवैध व्यावसायिकांना संरक्षण दिल्याचा आरोप त्यांनी केला.
मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात आमदार चंद्रकांत पाटील यांच्या सूचनेवरून माजी मंत्री खडसे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एकनाथ खडसे हे गुंड आणि गुन्हेगार आहेत. त्यांच्याकडून यंत्रणेला बदनाम करण्याचा प्रयत्न होतो, असा आरोप आमदार पाटील यांनी केला होता.
मुक्ताईनगर येथे मोठ्या प्रमाणावर अवैध मुरूम उपसा होत आहे. त्यामध्ये काही राजकीय कार्यकर्तेही सक्रिय आहेत. या व्यावसायिकांकडून शासन आणि पोलीस यंत्रणेचा वापर होत असल्याचे बोलले जाते. यावरूनच या नेत्यांमध्ये जुंपली आहे.
आमदार पाटील यांना माजी मंत्री खडसे यांनी थेट आव्हान दिले आहे. मी गुंड किंवा गुन्हेगार असल्याची टीका हास्यास्पद आहे. आमदार पाटील हे राजकीय देशातून गुन्हेगारांना पाठीशी घालण्याचा प्रयत्न करीत आहेत. वादग्रस्त पोलीस निरीक्षकावर आमदार पाटील यांचे एवढे प्रेम कशामुळे? असा प्रश्न त्यांनी केला.
मी गेली ४५ वर्ष राजकारणात सक्रिय आहे. त्यातील ३५ वर्ष मी विरोधी पक्षात काम केले. सामान्यांच्या प्रश्नावर सरकारला धारेवर धरणे हे माझे कामच आहे. त्याला भाजप आमदार पाटील गुन्हेगारी म्हणतात याचे आश्चर्य वाटते.
मी गुन्हेगार किंवा गुंड असतो तर माझ्या राजकीय कारकिर्दीत आजवर शेकडो गुन्हे दाखल झाले असते. यापूर्वी माझ्यावर गुन्हा दाखल करण्याचे प्रयत्न नक्कीच झाले असते. मात्र अवैध मुरूम उपसा करणाऱ्या विरुद्ध आवाज उठवल्याने आमदार पाटील यांना राग का आला? असा चिमटा खडसे यांनी घेतला.
सावदा येथे मोठ्या प्रमाणावर अवैध मुरूम उपसा होतो आहे. त्यातून सरकारच्या खनिज कराची लूट होत आहे. याबाबत सावदा येथील सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल पाटील यांनी गुन्हा दाखल केला नाही. त्याचा जाब विचारला असता अडीच महिनेच काय गुन्हा दाखल होण्यास अडीच वर्षेही लागू शकतात, असे वादग्रस्त वक्तव्य त्यांनी केले. आमदार पाटील त्याचे समर्थन करतात का? असे खडसे म्हणाले.
मुक्ताईनगरच्या राजकारणात खडसे आणि आमदार पाटील एकमेकांचे कट्टर विरोधक आहेत. कोणत्याही विषयावरून त्यांच्यात आरोप प्रत्यारोप होतात. आता थेट पोलिसात गुन्हा दाखल करण्यापर्यंत हे प्रकरण केले आहे. त्यामुळे हे राजकारण कोणत्या वळणावर जाते याची उत्सुकता आहे.
-----
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.