

Jalgaon Municipal Corporation Controversy : जळगाव महापालिकेच्या रविवारी (दि.२२) झालेल्या विशेष महासभेत शिवसेना (उबाठा) गटाच्या नगरसेवकाने आपण सत्ताधारी पक्षाचा सदस्य नसून गरीब नगरसेवक असल्याचे सांगताना केलेल्या वक्तव्यामुळे सभागृहात जोरदार गोंधळ निर्माण झाला. या प्रकाराची गंभीर दखल घेत महापौर दीपमाला काळे यांनी संबंधित नगरसेवकाची कानउघाडणी केली आणि त्यांना सभागृहातून बाहेर जाण्याचे आदेश दिले.
महासभेत शहरातील विविध विकासकामांवर चर्चा सुरू असताना मूळ व वाढीव हद्दीच्या सुधारित प्रारूप विकास आराखड्याला प्रसिद्धी देण्याचा विषय चर्चेला आला. याचदरम्यान शिवसेना ठाकरे गटाचे नगरसेवक इब्राहिम पटेल यांनी 'गरीब की बीबी सबकी भाभी' असे वक्तव्य केल्याने सभागृहात वाद निर्माण झाला. या विधानावरून भाजप नगरसेवक विजय बांदल आणि शरद तायडे यांच्यासह पटेल यांच्यात जोरदार शाब्दिक चकमक झाली. दोन्ही गटांकडून आरोप-प्रत्यारोप सुरू झाल्याने काही काळ सभागृहातील वातावरण तणावपूर्ण बनले.
आपली भूमिका मांडताना शिवसेना ठाकरे गटाचे नगरसेवक इब्राहिम पटेल यांनी महिलांबाबत केलेल्या वक्तव्यामुळे मोठा वाद निर्माण झाला.'माझ्याकडे प्रभागातील नागरिक कामांसंदर्भात येतात आणि विचारणा करतात. मात्र, मी गरीब नगरसेवक असून सत्ताधारी पक्षाचा प्रतिनिधी नाही. त्यामुळे आमच्या कामांना प्राधान्य दिले जात नाही,' अशी खंत व्यक्त करताना पटेल यांनी 'गरीब की बीवी सबकी भाभी होती है...' असे वादग्रस्त विधान केले.
पटेल यांच्या या वक्तव्यावर शिवसेना (शिंदे गट) आणि भाजपच्या नगरसेवकांनी आक्षेप घेतला. तसेच महापौर दीपमाला काळे यांनी देखील संबंधित वक्तव्यावर आक्षेप नोंदविला.यावेळी भाजप नगरसेवक विजय बांदल हे इब्राहिम पटेल यांच्या अंगावर धाऊन गेल्याचं सांगण्यात आलं. या प्रकारामुळे महापालिकेच्या महासभेत चांगलाच गोंधळ उडाला.
महापौर दीपमाला काळे यांनी यावेळी नगरसेवक इब्राहीम पटेल यांच्यासह विजय बांदल यांनाही दहा मिनिटांसाठी सभागृहाच्या बाहेर जाण्याचे आदेश दिले. अखेर, दोन्ही नगरसेवक सभागृहाच्या बाहेर गेल्यानंतर पुन्हा एकदा महासभा सुरळीत सुरू झाली. मात्र, झालेल्या प्रकाराची जळगाव शहरातील राजकीय वर्तुळात आणि नागरिकांमध्येही जोरदार चर्चा रंगली आहे.
महासभेत झालेला हा वाद केवळ सभागृहापुरता मर्यादित न राहाता सभागृहातून बाहेर पडल्यानंतरही त्याचे पडसाद उमटले. महापालिकेच्या कार्यालयातही भाजप आणि ठाकरे गटाच्या नगरसेवकांमध्ये पुन्हा शाब्दिक वाद झाला. भाजपचे नगरसेवक विजय बांदल आणि ठाकरे गटाच्या नगरसेवकांमध्ये जोरदार वादावादी झाल्याने कार्यालयातील वातावरणही तापलं होतं.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.