Shalarth ID Scam : शिपाई निघाला एजंट, शासकीय तिजोरीतून दोन कोटी लाटले; हायकोर्टाने जामीन फेटाळल्याने अटक अटळ

Bombay High Court Rejects Amol Kulkarni’s Anticipatory Bail : मी तर केवळ वरिष्ठांच्या सांगण्यावरून काम करणारा शिपाई आहे, असे सांगणाऱ्या अमोल कुलकर्णीचा हायकोर्टाने जामीन फेटाळला आहे.
Shalarth ID Scam | Bhausaheb Chavan
Shalarth ID Scam | Bhausaheb ChavanSarkarnama
Published on: 
Updated on: 

Shalarth ID Scam: शिक्षण विभागातील बहुचर्चित शालार्थ आयडी घोटाळ्यात बनावट कागदपत्रांच्या आधारे १७ शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या मागील तारखेतील नियुक्त्या दाखवून शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाने अमोल कुलकर्णी याचा अटकपूर्व जामीन फेटाळून लावला.

जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर तालुक्यातील अंतुर्ली येथील एम. एफ. तराळ विद्यालयात कुलकर्णी हा शिपाई होता. मी तर केवळ वरिष्ठांच्या सांगण्यावरून काम करणारा शिपाई आहे, असा बचाव करणाऱ्या अमोल कुलकर्णीला दणका देत उच्च न्यायालयाचे न्यायाधीश माधव जे. जामदार यांनी त्याचा जामीन फेटाळला. तपासात कुलकर्णी हा केवळ शिपाई नसून संस्थाचालकांचा एजंट म्हणून काम करत शिक्षकांकडून पैसे उकळत असल्याचे उघड झाले आहे.

नाशिक विभागातील विविध शैक्षणिक संस्थांमध्ये शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्यांमध्ये अनियमितता झाल्याचा आरोप आहे. जळगाव जिल्ह्यातील एम. एफ. तराळ विद्यालयातील १७ शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्यांबाबतही आरोप करण्यात आले आहेत. या नियुक्त्या २०२४ मध्ये झाल्या असताना त्या २०१४ ते २०१७ या कालावधीत झाल्याचे दर्शवून दोन कोटी रुपयांहून अधिक वेतन थकबाकीची मागणी करण्यात आल्याचे तपासात उघड झाले आहे.

Shalarth ID Scam | Bhausaheb Chavan
Godavari Aarti Controversy : गिरीश महाजनांसमोरच खडाजंगी, राष्ट्रपतींच्या उपस्थितीत होणाऱ्या गोदावरी आरतीवरुन वाद‌

तपासादरम्यान विद्यालयाचे तत्कालीन मुख्याध्यापक रामदास एस. पाटील यांनी दिलेल्या जबाबाचाही न्यायालयाने विचार केला. नियुक्तीच्या प्रस्तावांशी संबंधित कागदपत्रांवर स्वाक्षरी करण्यास त्यांनी नकार दिल्याचे त्यांच्या जबाबात नमूद आहे. आपण केवळ ऑगस्ट २०१४ ते मार्च २०१८ या कालावधीतच मुख्याध्यापक होतो, त्यामुळे संबधित कागदपत्रांवर सह्या करण्यास नकार दिल्याचे त्यांनी जबाबात सांगितले. तसेच, नियुक्त झालेल्या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांकडून संशयित कुलकर्णी हा पैसे गोळा करीत असल्याची बाब तपासात समोर आल्याचे न्यायालयाच्या आदेशात नमूद करण्यात आले आहे.

संशयित शिपाई पदावर कार्यरत असून, वरिष्ठांच्या आदेशाचे पालन करीत असल्याचा युक्तिवाद त्याच्या वतीने करण्यात आला. मात्र, उपलब्ध कागदपत्रे, साक्षीदारांचे जबाब आणि तपासातील कथित भूमिकेचा विचार करून उच्च न्यायालयाने अटकपूर्व जामीन देण्यास पुरेसा आधार नसल्याचे स्पष्ट करीत अर्ज फेटाळला. त्यामुळे त्याची अटक अटळ आहे. या निर्णयामुळे शालार्थ आयडी घोटाळा प्रकरणातील तपासाच्या दृष्टीने महत्त्वाची घडामोड घडली.

संशयित अमोल कुलकर्णी केवळ शिपाई म्हणून काम करत नव्हता .नियुक्तीच्या कागदपत्रांवर स्वाक्षऱ्या मिळविणे, नियुक्त कर्मचाऱ्यांकडून पैसे गोळा करणे अशी भूमिका कुलकर्णी बजावत असल्याचे तपासात समोर आल्याचे आदेशात नमूद आहे. त्याच्यावर शालार्थ आयडी घोटाळ्यात बनावट व मागील तारखेच्या नियुक्त्या दाखवून वेतनाची थकबाकी मिळविल्याचा गंभीर आरोप आहे.

Shalarth ID Scam | Bhausaheb Chavan
Sanjana Patil : आईला कॅन्सर, त्यामुळे नगरपंचायतीत येता येत नाही ; खडसेंच्या आरोपांवर नगराध्यक्षा संजना पाटलांचा खुलासा

९६ पदांचा घोटाळा

नाशिक विभागातील विविध शाळांमध्ये अनियमितता झाल्याचा आरोप आहे. २०२२ ते २०२४ या कालावधीत झालेल्या नियुक्त्या यापूर्वीच्या कालावधीत झाल्याचे दाखवून बनावट कागदपत्रांच्या आधारे शासनाकडून वेतनाची थकबाकी मिळविल्याचा संशयितांकडून करण्यात आला होता. या प्रकरणात एकूण ९६ शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्यांचा संदर्भ न्यायालयाच्या आदेशात नमूद आहे. त्यात एकट्या अंतुर्ली येथील एम. एफ. तराळ विद्यालयात १७ बोगस नियुक्त्या दाखवून २ कोटी रुपयांहून अधिक रकमेचा अपहार करण्यात आला आहे, असे निष्पन्न झाले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com